कूटनितीच्या प्राचीन युद्धतंत्राचे पालन करत छत्रपति शिवरायांनी विजयाची एक मोहोर दख्खनेवर उमटवली. एका नव्या साम्राज्याचा पाया निर्माण केला. पण ह्या सर्वांसोबत चोख लष्करी व्यवस्था, दुर्गमदुर्ग बांधणी आणि कोशबल यांची योग्य सांगड घातली. शिवरायांचे राज्यकारभार विषयक नेमके धोरण काय होते??? याबाबत काही जाबते आपण आधीच्या भागात पाहिले आहेतच. आता आपण बघूया त्यांचे परराष्ट्रीय धोरण काय होते? त्यांनी 'अरिमित्र विचक्षणा' कशी केली होती. स्वराज्य सुरवातीपासूनच चहुकडून शत्रुपक्षाने घेरलेले होते आणि राज्याला अंतर्गत शत्रू देखील खूप होते. ह्या दृष्टीने राजांनी परराष्ट्रीय धोरण कसे ठरवले आणि कसे राबवले हे समजून घेणे महत्वाचे आहे. त्या आधी अरिमित्र म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. अरि म्हणजे शत्रू किंवा जवळ ज्याचे राज्य तो. तर मित्र म्हणजे अर्थात सुहृदय. कौटिल्य अरिमित्राचे ६ प्रकार सांगतो. १. सहज शत्रू - राजाचे नातलग आणि सिमेलगतचे राष्ट्र. २. कृत्रिम शत्रू - आपल्या विरोधात जाउन इतर राज्यांना सुद्धा विरोध करण्यास भाग पाडणारा. ३. सहज मित्र - सिमेलगतचे राष्ट्र सोडून अन्य राज्यांचा राजा. ४...