शिवाजी महाराजांनी मोगलांना दिलेले किल्ले परत घेण्यास सुरुवात केली. तानाजीने केलेला सिंहगडावरील अचानक हल्ला त्याच्या हौतात्म्यामुळे अविस्मरणीय ठरला (४ फेब्रुवारी १६७०). या लढाईत तानाजी आणि राजपूत किल्लेदार उदेभान हे दोघेही ठार झाले. पुढील सहा महिन्यांत मराठ्यांनी पुरंदर, रोहिडा, लोहगड, माहुली (शहापूरजवळ) इ. किल्ले घेतले. पुरंदरचा किल्लेदार रजीउद्दीन हा मराठ्यांच्या ताब्यात आला (८ मार्च १६७०). मराठ्यांनी चांदवड लुटले आणि मोगल खजिना हस्तगत केला. हत्ती व घोडे ही लूटही त्यावेळी त्यांना मिळाली. माहुलीच्या किल्ल्यावरील मराठ्यांचा पहिला हल्ला किल्लेदार मनोहरदास याच्या दक्षतेमुळे फसला; पण दुसऱ्या हल्ल्यात (जून १६७०) मराठ्यांनी किल्लेदार अल्लाहवीर्दीखान याला ठार मारून किल्ला ताब्यात घेतला. माहुलीवरील पहिल्या हल्ल्यानंतर महाराजांनी कल्याण, भिवंडीवर हल्ला चढविला. तेथे निकराचा लढा होऊन कल्याण-भिवंडीचा प्रदेश महाराजांच्या हातात पडला. तसेच महाराजांचे सैन्य दक्षिणच्या सुभ्यात चहूकडे पसरले. त्यांनी वऱ्हाड आणि पूर्व महाराष्ट्र येथील प्रदेशांवर आक्रमणे केली. खेड्यापाड्यातून मराठे चौथाई वसूल करू लागले...
Chhatrapati Shivaji Maharaj photos and history.