छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी मराठेशाहीची मुहूर्तमेढ रोवली. त्याकामी महाराजांना जसे अनेक निष्ठावान मावळ्यांचे सहकार्य लाभले, तसेच भौगोलिक आणि पर्यावरणीय घटकांचेही सहकार्य मिळाले. त्यांनी पर्यावरणीय घटकांचा मराठेशाहीच्या उदय व विकासात उपयोग करून घेतला. त्यांच्या पर्यावरण नीतीमध्ये गडकोट, गनिमी कावा, आरमार उभारणी, जलव्यवस्थापन, वनसंपत्ती संवर्धन, दुष्काळ निर्मूलन अशा बाबींविषयी चर्चा करता येते. शिवरायांनी सह्याद्रीच्या डोंगररांगांवर तसेच कोकण किनारपट्टीवर अभेद्य असे दुर्ग निर्माण केले व जलदुर्ग बांधताना पर्यावरणाचा सखोल अभ्यास केलेला दिसतो. सिंधुदुर्ग या जलदुर्गाचे बांधकाम पाहिल्यावर शिवराय हे श्रेष्ठ दर्जाचे पर्यावरण तज्ज्ञ होते हे सिद्ध होते. १६६४ मध्ये कुरटे बेटावर शिवरायांनी सिंधुदुर्ग बांधून घेतला. तेथील पाण्यात आडवे तिडवे छुपे खडक असल्याने बेटाभोवती तीन कोसपर्यंत मोठ्या नौका येणे मुश्कील असे. पर्यावरणाच्या ज्ञानामुळे शिवरायांनी येथेच गड बांधला. या गडावर चोहोबाजूंनी खारे पाणी असताना तेथील दही बाव, साखर बाव व दूध बाव या तीन गोड्या पाण्याच्या विहिरी...