Skip to main content

८. अफझलखानवध – एक मंत्रयुद्ध

afzal-khan-vadh


अफझलखानाचा वध ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अत्यंत जोखमीची आणि तितकीच रोमहर्षक कामगिरी. ती करतांना राजांनी केलेली सिद्धता कौटिल्याने अर्थशास्त्रात सांगितलेल्या सूत्रांप्रमाणेच आहे.

१. फितूर चंद्ररावाला ठार करून जावळी कह्यात घेणारे शिवराय !

     जावळी शिवरायांच्या आयुष्यातील भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्याही एक अत्यंत महत्त्वाचे ठिकाण ! एका बाजूला सह्याद्री, तर दुसर्‍या बाजूला महाबळेश्‍वरचा डोंगर अशा खाचेत वसलेल्या जावळीला घनदाट जंगलाचे चिलखत होतेच. कृष्णाजी बाजीच्या चंद्रराव पदाला पाठिंबा देऊन राजांनी १६४७ मध्ये जावळीच्या राजकारणात प्रवेश केला होता. राजांच्या राज्यविस्ताराची लालसा जाणून आदिलशहाने वाईवर १६४९ ला अफझलखानाची वाईचा सुभेदार म्हणून नेमणूक केली होती. त्यानंतर अनेक राजकारणे होऊन आदिलशहाने १६५५ मध्ये अफझलखानाला वाईतून बोलावून कर्नाटकच्या मोहिमेवर पाठवले. पुढे १६५६ च्या आसपास कृष्णाजी उपाख्य चंद्रराव मोरे राजांचे उपकार विसरला. राजांच्या मुलखात मस्ती करू लागला. राजांनी समजावण्याचा केलेला प्रयत्न व्यर्थ ठरला. १५ जानेवारी १६५६ या दिवशी राजांनी जावळीवर स्वारी करून हा नैसर्गिक आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध प्रदेश राज्याला जोडला. पुढे फितुरी करणार्‍या चंद्ररावाला ऑगस्ट मासात ठार केले आणि खर्‍या अर्थाने जावळी राजांची झाली.

२. प्रत्यक्ष औरंगजेबालाही कारागृहात डांबणारा अत्यंत पराक्रमी; परंतु तेवढाच क्रूर आणि अहंकारी अफझलखान !

      महाबळेश्‍वरच्या पश्‍चिमेला असलेल्या भोरप्या डोंगरावर राजांनी प्रतापगड बांधला. भविष्यातील एका फार मोठ्या युद्धनाट्यासाठी प्रतापगड तयार झाला. बड्या बेगमेने छत्रपती शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी धर्मवेड्या, अत्यंत पराक्रमी, आदिलशहावर आत्यंतिक निष्ठा असलेल्या, क्रूर, अहंकारी अशा अफझलखानाची नियुक्ती केली. खानाच्या शिक्क्यातून खानाचा अहंकार जाणवत असे. त्याने शिक्क्यावर लिहिले होते –
     गर्र अर्ज कुनद सिपहर अअला, फजल फुजला व फजल अफजल
अझ हर मुल्की बजाए तसबीह आवाझ आयद अफजल अफजल
अर्थ : उच्च स्वर्गाला उत्तम माणसांची उत्तमता आणि अफझलखानाची उत्तमता यांची तुलना करून दाखवण्याची इच्छा झाली, तर प्रत्येक ठिकाणाहून जपमाळेतील (नामाच्या) आवाजाऐवजी अफझल अफझल असे शब्द येतील.
    त्याचा हा अहंकार सार्थ होता. बीदर कल्याणी भागात लढतांना त्याच्यामुळे प्रत्यक्ष औरंगजेबावर कैदैत पडण्याची वेळ आली होती; पण औरंगजेबाने खान महंमदाला आपल्या बाजूला वळवून घेऊन स्वत:ची सुटका करून घेतली; मात्र हे कळताच अफझलखान ती मोहीम तशीच टाकून विजापूरला परतला. त्याचा राग दूर करण्यासाठी बड्या बेगमेने खान महंमदाला परत बोलावले आणि विजापुरात शिरता शिरता त्याची हत्या केली. असे अनेक पराक्रम अफझलखानाच्या नावावर होते. हा खान भोसले घराण्याचा मात्र द्वेष करत होता. शहाजीराजांना बेड्या घालून विजापूरला नेणारा, राजांचा मोठा भाऊ संभाजी याच्या मृत्यूला कारण ठरलेला अफझलखानच होता.
     राजांविरुद्धची मोहीम खानाने एप्रिल १६५९ मध्ये चालू केली. असे सांगतात की, ही मोहीम चालू होण्यापूर्वी अफझलखानाने विजापूरमध्येच असलेल्या त्याच्या अवलिया गुरूची भेट घेतली; पण त्या गुरूला अफझलखानाचे मुंडकेविरहित धड दिसले होते. त्याने आशीर्वाद देण्याऐवजी अफझलखानाला यश येणार नाही, असे सांगितले. त्यानंतर अफझलखान चिंता, नैराश्य यांनी पछाडला गेला. त्याच अवस्थेत त्याने आपल्या अनेक स्त्रियांसमवेत काही दिवस भोग आणि विलासात काढले अन् शेवटच्या दिवशी या सर्व स्त्रियांना ठार केले. (वेध महामानवाचा, डॉ. श्रीनिवास सामंत, पृ. ७२, शिवाजी हिज लाइफ अँड टाइम, ग. भ. मेहेंदळे, पृ. २०१). या सगळ्यावरून अफझलखानाची मानसिक अवस्था लक्षात येते.

३. कौटिल्याने सांगितलेले गुण असल्याने राजकीय जीवन आणि व्यक्तीगत जीवन यांची सरमिसळ होऊ न देणारे शिवराय !

     अफझलखानाचा पहिला मुक्काम विजापुराजवळ तोरवे गावी पडला आणि खानाला पहिला अपशकुन झाला. त्याचा निशाणाचा फत्तेलष्कर हत्ती तडकाफडकी मेला. आदिलशहाने आपला खास बिनीचा हत्ती लगोलग खानाकडे पाठवला. मोहीम चालू राहिली, तरी शकुनापशकुन मानणार्‍या त्या काळातील लोकांवर याचा कसा आणि किती परिणाम झाला असू शकेल, त्याचा अंदाज करता येतो. खानाचा हत्ती मेला हा अपशकुन मानला, तर इकडे राजांची पत्नी सईबाईसाहेब यांना भाद्रपद कृष्ण पक्ष चतुर्दशी, ५ सप्टेंबर १६५९ या दिवशी देवाज्ञा झाली. तसे पहाता हा मोठा अपशकुन मानायला हवा; पण राजाचे जे विविध गुण कौटिल्याने दिले आहेत, त्यानुसार निश्‍चयी स्वभाव, देश, काल आणि पुरुष यांचे प्रयत्न यांनी साध्य होणार्‍या कार्याला प्राधान्य देणारे असे छत्रपती शिवाजी महाराजे असल्याने त्यांनी आपले राजकीय जीवन आणि व्यक्तीगत जीवन यांची सरमिसळ होऊ दिली नाही.

४. राजाचा देवतांशी असलेला संपर्क सांगून शत्रूसैन्यात भीती उत्पन्न करावी, या कौटिल्याच्या सूत्राचा वापर करणारे शिवराय !

     खानाशी लढतांना शिवाजी महाराजांनी मंत्रयुद्धाचा प्रयोग केला. मंत्रयुद्ध म्हणजे कारस्थाने रचणे ! तिकडे अफझलखानाला अपशकुन होत होते आणि इकडे राजांना मात्र शुभशकुन झाला. प्रत्यक्ष देवी स्वप्नात येऊन राजांना म्हणाली, हे वत्सा, त्याला तलवारीच्या जोराच्या वाराने भूमीवर पाड. हे दैत्यशत्रो, सध्यासुद्धा तुळजापूर सोडून तुझ्या साह्यर्थच मी स्वत: जवळ आले, असे समज. (अणूपुराण – कविंद्र परमानंद, सभासदाची बखर, उद्धृत श्री छत्रपती शिवाजी महाराज, पूर्वार्ध, वा. सी. बेंद्रे, पृ. अनुक्रमे १८९, १७५).
    सभासदकारांच्या मते दुसर्‍या दिवशी राजांनी जिजाऊसाहेब, गोमाजी नाईक पानसंबळ, कृष्णाजी नाईक हंकी, मोरोपंत आणि निळोपंत, नेताजी पालकर अशा मातब्बर लोकांना स्वप्न सांगून अफझलखानाला धुळीस मिळवण्याचा हेतू स्पष्ट केला; पण तरीही या सर्वांच्या मनात कार्यसिद्धीविषयी शंका होती, असे दिसते. यावर राजांनी भारतीय युद्धनीतीतील सर्वांत शेवटचा पर्याय सुचवला. ते म्हणाले, सला केलियाने प्राणनाश होईल. युद्ध करिता जय जाहलियाने उत्तम आणि मेलियानेही कीर्ती आहे. याजकरता युद्ध करावे. यानंतर आपला मृत्यू झाला, तरी पुढची सर्व तजवीज करून राजांनी निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
     अर्थशास्त्रात ईश्‍वरी साहाय्याचा उपयोग युद्धात कसा करून घ्यावा, हे कौटिल्य पुन:पुन्हा सांगतो. दुर्गलम्भोपाय या तेराव्या अधिकरणात, विजिगीषू परग्राममवाप्तुकाम: सर्वज्ञदैवतसंयोगख्यापनाभ्यां स्वपक्षमुद्धर्षयेत् परपक्षं चोद्वेजयेत। (१३.१.१) येथे संदर्भ शत्रूची राजधानी घेण्याचा आहे. शत्रूची राजधानी घ्यायची असेल, तर विजिगीषूने आपले सर्वज्ञत्व आणि आपला देवतांशी असलेला संपर्क या गोष्टी घोषित करून स्वत:च्या लोकांना उल्हासित करावे आणि शत्रूच्या लोकांना घाबरवून सोडावे. याच अधिकरणात पुढे ७ ते १० या सूत्रांमध्ये कौटिल्य सांगतो, भविष्यकथन करणारे, शकुन सांगणारे, मुहूर्त पहाणारे आणि गुप्तहेर इत्यादींनी राजाच्या सर्वज्ञतेची आणि दैवतसंयोगाची गोष्ट स्वत:च्या देशात पसरवावी. शत्रूच्या देशात त्यांनी विजिगीषूला देवतांचे दर्शन होत असल्याचे आणि दिव्य कोश अन् दिव्य सैन्य प्राप्त झाल्याचे सांगावे. राजाची सर्वज्ञता आणि देवता संपर्क याविषयीचा उल्लेख दहाव्या अधिकरणात कूटयुद्धाच्या ठिकाणीही येतो. असाच उल्लेख याच अधिकरणातील वेगवेगळ्या व्यूहरचनांच्या अध्यायात येतो. त्या ठिकाणी आपल्या राजाचा देवतांशी असलेला संपर्क सांगून शत्रूसैन्यात भीती उत्पन्न करावी, असे कौटिल्याचे मत आहे (१०.६.४८-५०). राजांची ईश्‍वरनिष्ठा अखंड मान्य करूनही मंत्रयुद्धातील देवता संपर्क या उपायाचा उपयोग शिवरायांनी केलाच नसेल, असे ठामपणे सांगता येत नाही.

५. अफझलखानाला येण्यासाठी मुख्य मार्ग स्वच्छ करणारे; पण इतर छोट्या वाटा बंद करून त्याच्या सैन्याची कोंडी करणारे शिवराय !

     पुढे खान राजांच्या भेटीला येणार, हे निश्‍चित झाल्यावर राजांनी आणखी एक गोष्ट केली. खानासारखी मोठी व्यक्ती येणार म्हटल्यावर त्यांचा योग्य तो मानसन्मान ठेवला पाहिजे; म्हणून वाई ते प्रतापगड हा अवघड रस्ता आपल्यासाठी आम्ही सुघड करून देतो, असे पंतांनी खानाला सांगितले. खानाला यात काहीही चुकीचे वाटले नाही. राजांनी वाई ते प्रतापगड या रस्त्यावरची झाडे तोडून मार्ग स्वच्छ करवला; पण त्याच वेळी त्या तोडलेल्या फांद्यांनी इतर छोट्या वाटा बंद केल्या. कौटिल्य सांग्रामिक या दहाव्या अधिकरणात अगदी हीच सूचना करतो. शत्रुणामापाते कूपकूटावपातकण्टकिनीश्‍च स्थापयेत् । (१०.१.१२) शत्रू येण्याच्या मार्गावर विहिरी, झाकलेले खड्डे, काटेरी तारा टाकाव्यात. राजांच्या संदर्भात शत्रू येऊन पोहोचला होता. आता तो परत जाऊ नये, याची तजवीज करायची होती; म्हणून राजांनी मुख्य मार्ग स्वच्छ केला; पण इतर छोट्या वाटा बंद करून टाकल्या. कोणत्याही परिस्थितीत शत्रूला संपवण्याची सर्व सिद्धता राजांनी केली आणि विकारी नाम संवत्सर, शके १५८१, गुरुवार, १० नोव्हेंबर १६५९ या दिवशी भर दुपारी राज्याचा एक मोठा शत्रू संपवला. आपल्या पित्याच्या अपमानाचा आणि भावाच्या मृत्यूचा सूड घेतला गेला. न भूतो न भविष्यति, असा विजय राजांना मिळाला. या विजयामुळे राजांचा दरारा सर्वत्र पसरला. राजे एक शूर, मुत्सद्दी आणि विजिगीषू व्यक्तीमत्त्व म्हणून मान्यता पावले.
– आसावरी बापट (संदर्भ : दैनिक लोकसत्ता – १७ एप्रिल २०१५)

९. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात सांगितल्याप्रमाणे दूत आणि गुप्तहेर यांचा योग्यरित्या वापर करणारे छत्रपती शिवराय !

    अफझलखान युद्धात दोन व्यक्ती अत्यंत महत्त्वाच्या होत्या. एक म्हणजे दूत आणि दुसरा गुप्तहेर ! अर्थशास्त्रात मंत्रयुद्धामध्ये दूताचे अनन्यसाधारण महत्त्व सांगितले आहे. उद्धृतमन्त्रो दूतप्रणिधि:। (१.१६.१), म्हणजे सल्लामसलतीने निर्णय घेतल्यानंतर दूताची कामगिरीवर योजना करावी.
    राजांनी खानाला सामोरे जाण्याचा निर्णय घेतल्यावर गोपिनाथपंतांसमवेत बसून दोघांनी शपथ घेतली. तेव्हा राजांनी खानाकडून आलेल्या पंताजींना खानाचा हेतू विचारला. तुम्हाला मारण्याचा खानाचा हेतू आहे, असे सांगून पंतांनी राजांना हिंमत असेल, तर खानास जावळीस आणण्याची सिद्धता दर्शवली. अर्थशास्त्रात दूत म्हणून सांगितलेली सारी कर्तव्ये गोपिनाथपंतांनी पूर्ण केली. दूतप्रणिधि: या अध्यायात शत्रूगोटात गेल्यावर दूताने करावयाची कार्ये सांगतांना कौटिल्य म्हणतो, पत्रे पाठवणे, तहाच्या अटींचे पालन करणे, मित्र मिळवणे, फितुरीस प्रोत्साहन देणे, दोन मित्रराष्ट्रांत भेद उत्पन्न करणे, शत्रूचे बांधव आणि मौल्यवान वस्तू यांचा अपहार करणे इत्यादी (१.१६.३३-३४).
     गोपिनाथपंतांनी राजांकडे शत्रूच्या वैभवाची इत्थंभूत वार्ता आणली. हे वैभव प्रतापगडावर कसे आणले गेले, याची सुंदर गोष्ट परमानंदांच्या अणूपुराणांत आहे. ते म्हणतात, या आलेल्या पाहुण्यांना शिष्टाचारास अनुसरून देणग्या दिल्या पाहिजेत. त्यासाठी राजांनी खानाच्या छावणीतीलच व्यापार्‍यांना आवताण दिले. अफझलखानाच्या आज्ञेवरून ते व्यापारी राजांकडे गेले. राजांनी त्यांच्याकडून सर्व रत्ने घेतली आणि त्या व्यापार्‍यांनाही आपल्याजवळ ठेवून घेतले. परमानंद पुढे म्हणतात, पुष्कळ लोभाच्या आशेने आपण पर्वतशिखरावर सर्व बाजूंनी कोंडले गेलो आहोत, हे त्यांनी ओळखले नाही. अगदी अशाच प्रकारे राजांनी आग्यात असतांना १५ सहस्रांचे हत्ती खरेदी केले होते आणि त्याचे पैसे दिले नसल्याची बातमी मुहम्मद अमीन खानने औरंगजेबाला दिली होती.
     राजनीतीमध्ये गुप्तहेरांचे महत्त्व कौटिल्याइतके आधुनिक काळात आपल्याकडे मानले आहे का, याविषयी शंका यावी, अशी परिस्थिती अनेकदा दिसते. कौटिल्य मात्र संस्था आणि संचारी मिळून नऊ प्रकारच्या गुप्तहेरांचा उल्लेख करतो. संपूर्ण गुप्तहेर खाते कसे उभे करावे आणि त्यांनी कोणकोणत्या वेशांत कार्य करावे, याची विस्तृत चर्चा अर्थशास्त्रात येते. यात इतर विविध वेशांसमवेत सिद्ध, तापस, भिक्षुकी या वेशांना कौटिल्य महत्त्व देतो. एकेका बातमीसाठी तो तीन-तीन गुप्तहेर नियुक्त करावे, त्यांनी अत्यंत वेगाने बातम्या आणाव्यात, अशा अनेक गोष्टी सांगतो. हेरखात्याची गुप्तता ही कौटिल्यासाठी फार महत्त्वाची आहे; म्हणून तो न चान्योन्यं संस्थास्ते वा विद्यु: (१.१२.१२) थोडक्यात या हेरसंस्था किंवा सर्व हेरांमध्ये एकमेकांशी कोणताही संपर्क नसावा, यावर भर देतो.
     शिवाजीची गुप्तहेर व्यवस्था अगदी याच धर्तीवर कार्य करतांना दिसते. बहिर्जी नाईक सोडल्यास अगदी क्वचित त्याच्या गुप्तहेरांविषयी माहिती मिळते; पण शत्रूच्या पावलापावलाची बित्तंबातमी राजांना अत्यंत वेगाने मिळत असे. राजांच्या प्रत्येक मोहिमेत गुप्त असलेल्या हेरांचे महत्त्व अढळ आहे. अफझलखानाच्या मोहिमेतसुद्धा अर्थातच प्रत्येक बातमी राजांकडे येत होती. बहिर्जी नाईकविना दुसरा एक हेर खानाच्या छावणीत फकिराच्या वेशात होता. त्याचे नाव नानाजी प्रभु मोसेगावकर !
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात

Comments

Popular posts from this blog

५. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ब्राह्मणांचे स्थान !

‘काही वर्षांपूर्वी जेम्स लेन नावाच्या पाश्‍चात्त्य लेखकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राविषयी एक आक्षेपार्ह पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे कलह निर्माण झाला आणि ब्राह्मण समाजाला टीकेचे लक्ष्य करण्यात आले. अलीकडेच पुण्यात जात्यंध मराठा संघटनांनी ब्राह्मणद्वेषाचा कळस गाठून लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मध्यरात्री हटवण्याचे दुष्कृत्य केले. ‘छत्रपतींच्या जीवनात ब्राह्मणांचे कोणते स्थान होते’, हे जर ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पाहिले, तर ‘छत्रपतींच्या नावाचा वापर करून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद वाढवणे’, ही ‘महाराजांची क्रूर थट्टा आहे’, ही गोष्ट लक्षात येईल ! या सूत्राच्या पुष्ठ्यर्थ ‘अखिल भारतीय मराठा विकास परिषदे’ने प्रकाशित केलेल्या ‘समाज जागृती पुस्तिके’तील निवडक लिखाण पुढे दिले आहे. कधी नव्हे एवढी आज हिंदुऐक्याची आवश्यकता निर्माण झाली असतांना हिंदु जातीजातींत विभागणे उचित ठरणार नाही, यासाठी लेख प्रसिद्ध करत आहोत. १. छत्रपतींच्या गुणांचे त्यांच्या हयातीत वर्णन करणारे पहिले तीन कवी ब्राह्मणच ! अ. ‘छत्रपती शिवाजी महाराज हयात असतांना त्यांच्या गुणांचे मुक्त...

छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती आणि शेतकऱ्यांविषयीचे धोरण.

(लेखात शिवाजी महाराजांचे अस्सल पत्र दिलेले आहे. सर्वांनी वाचावे हि आग्रहाची विनंती.) शिवाजी महाराजांनी जमिनीची पहिल्यांदा मोजणी आणि प्रतबंदी केली. प्रचितगड, राजापूर, रायगड, सुवर्णदुर्ग, अंजनवेल रत्नागिरी आणि विजयदुर्ग ह्या भागांतील प्रत्येकी दोन गावे निवडून तेथील उत्पन्नाचा तीन वर्षांचा अंदाज शिवाजी महाराजांनी काढला. मिळालेल्या माहितीच्या आधारावर महाराजांनी धाऱ्याचे दर निश्चित केले. धाऱ्यापैकी निम्मा हिस्सा महाराज धान्यरूपाने घेत आणि निम्मा हिस्सा पैश्याच्या रूपाने घेत. ज्या ज्या तालुक्यांत धान्याचा जो भाव असेल तो भाव जमेस धरून त्याच्या आधारे रोकड साऱ्याची आकारणी महाराज करीत असत. भात आणि ताग यांचे जमिनीचे १२ वर्ग पाडण्यात आले होते. अव्वल हि पहिली प्रत, दुय्यम हि दुसरी, सिम हि तिसरी, आणि चार सिम हि चौथी प्रत. पहिल्या प्रतीचे १२ मन, दुसऱ्या प्रतीचे १० मन, तिसऱ्या प्रतीचे ८ मन, आणि चौथ्या प्रतीचे साडेसहा मन. ( सोळा पायल्या = एक मण आणि वीस मनाचे - एक खंडी) वाचकांस बाकीच्या प्रतींची माहिती असावी म्हणून फक्त नावे सांगतो. ५. राउपल- झुडपांची जमीन, ६. खारवट- समुद्र व नदीच्या...

शिवरायांच्या इतिहासातील कुप्रसिद्ध रांझ्याच्या पाटलाचं गाव.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केलीकी महाराजांसोबत औरंगजेब, शाहिस्तेखान आणि अफजलखान व अनेक स्वराज्याचे शत्रू पक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात ,त्यात अजून एक नाव म्हणजे 'रांझे गावचा पाटील'. रांझे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत बदअमल केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्या वर खटला चालवून चौरंग केला. (चौरंग करणे म्हणजे हात पाय कलम करणे). या संदर्भाचे २८ जानेवारी १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले. महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मनाला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे, व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड-शिवापूर गावा पासून अवघ्या ३ की.मी. वर असलेले सह्याद्रीच्या कुशीतील छोटंसं रांझे गाव. रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते. मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते.मंदिरात...