छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती आणि शेतकऱ्यांविषयीचे धोरण.

(लेखात शिवाजी महाराजांचे अस्सल पत्र दिलेले आहे.
सर्वांनी वाचावे हि आग्रहाची विनंती.)
शिवाजी महाराजांनी जमिनीची पहिल्यांदा मोजणी आणि प्रतबंदी केली. प्रचितगड, राजापूर, रायगड, सुवर्णदुर्ग, अंजनवेल रत्नागिरी आणि विजयदुर्ग ह्या भागांतील प्रत्येकी दोन गावे निवडून तेथील उत्पन्नाचा तीन वर्षांचा अंदाज शिवाजी महाराजांनी काढला.
मिळालेल्या माहितीच्या आधारावर महाराजांनी धाऱ्याचे दर निश्चित केले. धाऱ्यापैकी निम्मा हिस्सा महाराज धान्यरूपाने घेत आणि निम्मा हिस्सा पैश्याच्या रूपाने घेत. ज्या ज्या तालुक्यांत धान्याचा जो भाव असेल तो भाव जमेस धरून त्याच्या आधारे रोकड साऱ्याची आकारणी महाराज करीत असत.
भात आणि ताग यांचे जमिनीचे १२ वर्ग पाडण्यात आले होते. अव्वल हि पहिली प्रत, दुय्यम हि दुसरी, सिम हि तिसरी, आणि चार सिम हि चौथी प्रत. पहिल्या प्रतीचे १२ मन, दुसऱ्या प्रतीचे १० मन, तिसऱ्या प्रतीचे ८ मन, आणि चौथ्या प्रतीचे साडेसहा मन. ( सोळा पायल्या = एक मण आणि वीस मनाचे - एक खंडी)
वाचकांस बाकीच्या प्रतींची माहिती असावी म्हणून फक्त नावे सांगतो. ५. राउपल- झुडपांची जमीन, ६. खारवट- समुद्र व नदीच्या काठावरील जमीन, ७. बाऊल- खडकाळ जमीन, ८. खुरी- दगडाळ जमीन, ९. खुरियत रुतु- द्विदल व ताग पिकविणारी जमीन, १०. तुरवत किंवा काठानी ११. मणूत- झाडांच्या मुळ्या असलेली जमीन, साफ न केलेली जमीन.
'वजत' म्हणजे नापीक जमीन. ह्या जमिनीवर साऱ्याची आकारणी करण्यात येत नसे. परंतु पुढे लागणीचे क्षेत्र वाढत जाऊन शेतकरी कोणतीही जमीन करू लागले तेंव्हा डोंगराळ व पड जमिनीतही लावणी झाली. सुरवातीस ह्या जमिनीवर सारा बसविण्यात आला नव्हता पण मागून माफक आकारणी करण्यास सुरवात करण्यात आली.
डोंगरावरील जमिनीची आकारणी बिघ्यावर न करता नांगरावर करण्यात आली. उदाहरणार्थ जमीन सहा-सात बिघे असेल तर फक्त एक बिघाच हिशोबात धरण्यात येई.
महत्वाचे म्हणजे जमिनीवरील साऱ्याची आकारणी केवळ तिच्या पिकाऊपणावरून नव्हे तर पिकाच्या जातीवरूनही करण्यात येई.
शिवाजी महाराजांनी कोकणात जमाबंदी कशी केली याची तपशीलवार माहिती आहे.
शिवाजी महाराज आण्णाजी द्त्तोसारख्या आपल्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशात म्हणतात, "शेतकऱ्याचे धान्य वेळच्या वेळी विकले जावे ह्याची विशेष काळजी घेतली जावी. वसूल हंगामशीर घ्यावा आणि साठवण करून विकरा असा करावा कि कि तो हंगामी व्हावा. जिन्नस पडून राहून वाया तर जाऊ नये आणि विकरा महाग व्हावा. या रीतीने नारळ, खोबरे, सुपारी, मिरे विकीत जाणे. येन जिन्नस महाग विकल्याने जो फायदा होईल त्याचा मजरा ( बक्षीस) शेतकऱ्याचा आहे असे समजणे."
इथून पुढे अत्यंत महत्वाचे आहे. सावध होऊन वाचावे.
शिवाजी महाराज पुढे असेही म्हणतात, " सुभ्यातील गावांतून फिरावे. ज्या गावी जाशील त्या गावच्या कुणब्यांना गोळा करावे. ज्याला जे शेत करावयास दिले ते करण्यास त्याजपाशी माणूस, बैल व दाणे असल्यास बरे. पण ज्यापाशी बैल- नांगर नाही व पोटास दाणे नाहीत त्याला रोख पैका देऊन बैल घेववावे व पोटास खंडी दोन खंडी दाणे द्यावे. त्याच्याने जेवढे शेत करवेल तेव्हढे त्याने करावे. पेस्तर साली त्याजपासून बैलाचे व गल्याचे पैके वाढी-दिढी न करता मुद्दलच हळू हळू त्याला शक्य होईल तितके वसूल करावे.
या कामी दोन लाख लारी (लारी चलनाविषयी लेखाच्या खाली कमेंट मध्ये अधिकची माहिती दिलेली आहे.) पावेतो खर्च आला तरी चालेल.
कुणब्यांकडे पड जमीन लावून दस्त जास्ती करून घ्यावा. ज्या रकमा कुळाला देणे शक्य होणार नाही त्या माफ कराव्या व तसे पुढच्या वर्षी साहेबास समजवावे. ( साहेब म्हणजे शिवाजी महाराज.) म्हणजे साहेब माफीची सनद देतील. येणेप्रमाणे कारभार करीत जाणे."
हे पत्र लिहिताना माझ्या अंगावर शहराच आला होता. पत्रातील शब्दा-शब्दात महाराज शेतकऱ्यांस जपताना दिसतात.
शिवाजी महाराज अत्यंत प्रजावत्सल - शेतीवत्सल होते हे ह्या वरील उताऱ्यावरून दिसून येईल.
शिवाजी महाराज शेतकऱ्यांस अतिशय दयाळूपणे वागवीत असत. आणि त्यांच्या कल्याणासाठी झटत असत. ह्याचा प्रत्यय येण्यासाठी तुम्हाला मी एक खुद्द शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या एका पत्राचा पुरावाच देतो.
पत्र अत्यंत महत्वाचे असल्याने आणि शिवाजी महाराजांनी लिहिलेले असल्याने मनात न वाचता थोडे मोठ्याने वाचावे म्हणजे समजण्यास सोपे जाईल.
हे पत्र शिवाजी महाराजांनी प्रभावळीच्या सुभेदाराला लिहिलेले आहे.
पत्र सुरु:
श्री शंकर
शके १५९८ भाद्रपद शुद्ध ८
( म्हणजे इसवी सन ५ सप्टेंबर १६७६ )
राजश्री रामजी अनंत सुभेदार
मामले प्रभावळी
प्रति राजश्री शिवाजीराजे दंडवत.
" तुला पूर्वी फर्माविले आहे. ऐसियासी चोरी न करावी. इमाने इतबारे साहेब काम करावे.
अशी तू क्रियाच केली आहेस. तेणेप्रमाणे शेतकऱ्याच्या एका भाजीच्या देठासही मन न दाखविता रास्त व दुरुस्त वर्तन ठेवणे. लावणी संचनि ज्या वेळी करावयाची त्यावेळी करणे.
मुलखांत बटाईचा (बटाई म्हणजे आपली जमीन स्वतः न करता दुसऱ्याला करायला देणे.) तह चालत आहे. त्या प्रमाणे रयतेचा वाटा रयतेस पावे व राजभाग आपणास येई ते करणे.
ताकीद:- रयतेवर काडीचा जाच वैगैरे केलिया साहेब तुजवर राजी नाही ऐसे बरे समजणे.
दुसरी गोष्ट कि रयतेपासून येन जीनसाचे नक्त ( रोकड-पैसा ) घ्यावा ऐसा हुकूम नाही. ऐन जिनसाचा ऐन जीनसच वसूल घेऊन जमा करीत जाणे."
पत्र समाप्त.
आपले राजे आपल्या शेतकऱ्यांस किती जपत असत हे वरील पत्रावरून सिद्ध होते. ह्या मातीचे पूर्वजन्मीचे भाग्य थोर ऐसा राजा ह्या महाराष्ट्र भूमीस लाभला.
आता महत्वाचे:
वरील माहिती समजून घेतली असता काही निष्कर्ष निघतात ते असे.
हल्ली जमीन महसूल केवळ पैश्याच्या रूपाने सरकार घेते हि हल्लीची पद्धत तेंव्हा शिवकाळात नव्हती. शिवकाळातील पद्धत दुहेरी होती. सरकारच्या आताच्या पद्धतीचा सरकारचा फायदा असा कि सरकारी अधिकाऱ्यांना धान्य बाळगून ठेवावे लागत नाही व धान्याची नासाडीही होत नाही. परंतु शेतसाऱ्याचे हप्ते ठराविक महिन्यांत असल्याने त्यावेळेस शेतकऱ्यास येईल त्या भावाने धान्य विकावे लागते व बहुदा ते स्वस्तच विकण्याची वेळ शेतकऱ्यावर येते. ह्यात शेतकऱ्याचे नुकसान होते.
पण शिवकाळात मात्र शेतसारा हा अर्धा धान्य रूपाने आणि अर्धा द्रव्यरूपाने घेत असल्यामुळे रयतेस ती पद्धती हितावह अशीच होती. मात्र सारा म्हणून घेतलेले धान्य गावगन्ना पेवांत व अंबरांत (थोडक्यात धान्य कोठारांत ) साधवून ठेवावे लागे. आणि धान्याला पावसाळ्यात भाव आला म्हणजे ते विकणे सरकारला फायदेशीर होई.
ह्यात महत्वाची आणखी एक सोय अशीही होती कि दुष्काळात रयतेपाशी खायला काहीही राहिले नाही व तिला उपाशी मरण्याची पाळी आली म्हणजे हेच धान्य रयतेला वाढी- दाढीने वा केवळ परत करण्याच्या बोलीने देऊन रयतेचे प्राणरक्षण करता येई.
शेतकऱ्यांस विहीर खणणे, बी बियाणे खरेदी करणे, ताली धरणे यासाठी जरूर तेंव्हा धान्य व जरूर तेंव्हा द्रव्यही शिवाजी महाराज देत असत.
शेतसारा म्हणून एकंदर उत्पन्नापैकी धान्याचा वाटा किती घ्यावा हे त्या जमिनीचा दर्जा आणि धान्याचा प्रकार पाहून शिवाजी महाराजांनी ठरविले होते.
सर्वात महत्वाचे म्हणजे शिवाजी महाराजांनी नारळ आणि सुपारी शेतकऱ्याने काय भावाने विकावी याचे दर ठरवून दिलेले होते. हे जिन्नस व्यापाऱ्यांना विकताना सरकारी अधिकारी त्या जागी हजर असलाच पाहिजे असा नियमच होता.
ह्या अधिकाऱ्याने त्या विक्रीच्या व्यवहारातून सरकारी जकात वसूल करावी असा नियम होता. अर्थात हे उत्पन्न द्रव्यरूपाने मिळत असे. पण कित्येक शेतकरी रोकड रक्कम न देता जिन्नसच सरकारास देत. मग ह्या जिन्नसांची विक्री तो सरकारी अधिकारी करत असे आणि येईल ती रक्कम सरकारजमा करत असे.
मालाची विक्री हि ठरलेल्या भावानेच करावी लागत असे. पण काही शेतकरी कमी दराने आपला माल व्यापाऱ्यांना विकत असत त्या कारणाने सरकारी उत्पन्नास धोका पोहचे. तो न पोहचावा यासाठी ठराविक दरानेच नारळ आणि सुपारी विकली जाईल अशी सरकारी अधिकारी काळजी घेत असत.
शिवाजी महाराजांचे जमीनसुधारणेकडे कटाक्षाने लक्ष असे. जमिनीस पाण्याची सोय कायमस्वरूपी केल्याशिवाय पीक हमखास व चांगले येणार नाही याची जाणीव शिवाजी महाराजांस होती.
शिवाजी महाराज लढायांच्या धामधुमीमुळे अत्यंत व्यस्त जरी असले तरी जसा त्यातून वेळ मिळे तसा वेळ ते ह्या कामांसाठी काढत असत.
पुण्याजवळच्या खेड- शिवापूर येथे शिवाजी महाराजांचे बालपणाचे काही दिवस गेले होते. ह्या शिवपुरास शिवाजी महाराजांनी आमराई लावली होती आणि ओढ्याला धरणही बांधले होते.
ह्याची साक्ष लक्ष्मण पाटील वलद रावजी पाटील कामथे, मौजे कोंढवे बुद्रुक कार्यात मावळ प्रांत पुणे याने शके १७११ त दिलेल्या जबानीवरून तुम्हास येईल.
ह्या जबानीत तो म्हणतो, " शिवाजीमहाराज शिवपुरास येऊन बाग आमराई लावण्याकरिता धरणाचे काम लावले. ते समई भोवरगांवचे पाटील जमा झाले. पण धरणाचे पाणी निघावयास एक मोठा धोंडा आड येत होता. त्यामुळे पाणी निघेना. म्हणून येसाजी पाटील तेथे कामावर होता त्यास महाराजांनी आज्ञा केली कि "आम्ही स्वारीहून येतो तो पावेतो; हर इलाज करून एव्हढा मोठा धोंडा फोडून काढून पाण्यास वाट करणे.”
ऐसी आज्ञा करून महाराजांची स्वारी गेल्यावर मागे येस पाटलाने हर इलाज करून धोंडा फोडून पाण्यास वाट सुरळीत करून दिली.
मग पुढे महाराजांची स्वारी आल्यावर काम पाहिले व धोंडा फोडून वाट कोणी केली? म्हणून पुसिले.
तेंव्हा सभोवते लोक होते, त्यांनी अर्ज केला कि, येस पाटील कोंडवेकर याने आज्ञेप्रमाणे हे काम केले.
तेंव्हा महाराज मेहेरबान होऊन येस पाटलास बक्षीस देऊ लागले. येस पाटील तेंव्हा महाराजांस म्हणाला कि " बक्षीस नगदी दिले तर खाऊन जाईल. त्या पेक्षा इनाम जमीन देविली पाहिजे."
त्याजवरून महाराजांनी येस पाटील यास जमीन इनाम करून दिल्ही. "

शेतकऱ्यास खऱ्या अर्थाने बळीराजा करून "माझ्या शेतकऱ्याची गवताची काडी सुध्दा कोणाकडे गहाण पडता कामा नये” असे उदात्त विचार शिवाजी महाराजांनी ह्या महाराष्ट्रभूमीस घालून दिले.
पण आज आपण काय पाहतो?
ह्याच शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या ह्याच महाराष्ट्रात आज शेतकऱ्याची गवताची काडी तर सोडा पण संपूर्ण घरदार, बायका-पोरसुध्दा कर्जरूपाने सावकाराकडे, बँकांकडे गहाण पडली आहेत.
बँकेचे अधिकारी खुशाल कर्ज माफ करण्यासाठी ह्या शेतकऱ्याच्या पत्नीस शरीर सुखाची मागणी करताना जेंव्हा ह्या महाराष्ट्रात दिसतात तेंव्हा 'अश्या अधिकाऱ्यांस भर चौकात नागडे उभे करून त्याची चामडी सोलून काढून त्यात मीठ-मिरची भरावी आणि त्याला आठ दिवस तसेच उपाशी चौकात बांधून ठेवावे..' असे क्रोधात्मक सर्वांस वाटणे स्वाभाविकच आहे.
कारण हे संस्कार ह्या महाराष्ट्राचे नाहीत. हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या असंख्य जाती-धर्माच्या मावळ्यांनी आपले रक्त शिंपून तयार केलेला आहे. तो जपावा त्याचा बळीराजा जपावा.
लेखाच्या शेवटी माझ्या शेतकरी बंधुभावांस एकच कळकळीने सांगेल कि 'आपल्या घरात काय पिकत ह्यापेक्षा बाजारात काय विकत' ह्याचा विचार मनात ठेऊन शेती करावी. ह्यानेच तुमची आर्थिक भरभराट होईल. सरकार जर हमीभाव ठरवत नसेल तर शेतकऱ्यांनी एकीने ( लक्षात ठेवा एकीने) हमीभाव ठरवावा. पण तोट्यात जाऊन आणि राजकीय नेत्यांच्या आश्वासनांवर विसंबून शेती करू नये.
संकट शिवाजी महाराजांवर काय कमी आली? पण म्हणून शिवाजी महाराजांनी 'आपण आता आत्महत्याच करूयात..' हा विचार कधीही आपल्या आणि आपल्या प्रजेच्या मनास शिवूनही दिला नाही.
अत्यंत त्रीव्र संघर्ष करून त्यांनी प्रत्येक संकटावर आपल्या अफाट बुद्धिकौशल्याने विजय मिळविला.
गुजरातचा शेतकरी आत्महत्या करतो का?
पंजाबचा शेतकरी आत्महत्या करतो का?
तामिळनाडूचा शेतकरी आत्महत्या करतो का?
राजस्थानचा शेतकरी आत्महत्या करतो का?
उत्तरप्रदेश-बिहारचा शेतकरी आत्महत्या करतो का?
नाही ना? मग ते का आत्महत्या करत नाहीत ह्याचा अभ्यास करावा.
दुष्काळ नावाच्या सुल्तानाला न घाबरता हर एक उपायाने शिवाजी महाराज जसे म्हणत असत अगदी तसेच "रात्रन्दिनी आम्हास युद्धाचा प्रसंग" म्हणत सामना करावाच लागेल.
लक्षात ठेवा ‘जो लढतो तोच अंतिम विजयी होतो.’
श्री भवानी शंकर चारी तत्पर
सतीश शिवाजीराव कदम
निरंतर
SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment