शिवचरित्रमाला भाग ४

शिवचरित्रमाला भाग ४
झडप बहिरी ससाण्याची…
विजापूरचा आदिलशाही सरदार फत्तेखान हा मोठ्या फौजेनिशी कऱ्हेपठारात (पुरंदर तालुका) शिरला। त्याचा तळ जेजुरीजवळच्या बेलसर गावाजवळ पडला। त्याला खात्रीच होती की , शिवाजीराजांचं बंड आपण लौकरात लौकर साफ मोडून काढू। त्यांनी आपल्या सैन्याचा एक विभाग शिरवळवर पाठविला. नीरा नदीच्या काठी शिरवळला एक भुईकोट किल्ला नव्या स्वराज्यात राजांनी कब्जा केलेला होता. त्याचं नाव ‘ सुभानमंगळ ‘. शाही फौज मोठी होती. तिने सुभानमंगळ एका घावातच जिंकला. मराठ्याचा हा स्वराज्यातील पहिला पराभव. शहाजीराजे विजापुरात कैदेत पडलेले. कोणत्याही क्षणी बादशहा शहाजीराजांना ठार मारू शकतो अशी परिस्थिती. पूवीर् असे सगळ्याच बादशहांनी अनेक लोक मारून टाकल्याच्या आठवणी ताज्या होत्या. कोणाचाही पाठिंबा नाही. अशा परिस्थितीत शिवाजीराजांची आणि जिजाऊसाहेबांची मन:स्थिती कशी झाली असेल ? लक्षात येते ती एकच गोष्ट की , इतक्या भयंकर आणि भीषण मृत्युचे तांडव दिसत असूनही ही मायलेकरं थोडीसुद्धा कचरली नाहीत। त्यांचा आत्मविश्वास जबर होता. राजे राजगडावर आपला डाव आखीत होते. त्यांनी फार-फार तर हजारभर मावळी सैन्यानिशी पुरंदरचा किल्ला गाठला. तो दिवस होता ८ ऑगस्ट १६४८ . पावसाचे दिवस. नीरेला पाणी. पुरंदरपासून अवघ्या बारा कि. मी. वर इशान्येला बेलसर गावाजवळ फत्तेखानाची छावणी होती. याच पुरंदरच्या दक्षिणेला दहा कि. मी. वर सुभानमंगळ होता. हा किल्ला अगदी नुकताच , कालपरवा एवढ्यात फत्तेखानी सैन्याने जिंकून घेतला होता. त्यावर आदिलशाही निशाण लागले होते. शिवाजीराजांनी रात्रीच्या काळोखात बेलसरजवळच्या शाही छावणीवर अचानक छापा घालण्याचा आणि शिरवळच्या सुभानमंगळावरही हल्ला करून तो किल्ला जिंकून घेण्याचा डाव आखला। प्रथम हल्ला सुभानमंगळवर , कावजी मल्हार या सरदाराबरोबर थोडं सैन्य देऊन त्याला पुरंदारावरून थेट शिरवळवर राजांनी सोडलं. या पावसाळ्यात कावजी वाटेत आडवी येणारी नीरा नदी ओलांडून सुभानमंगळवर हल्ला चढविणार होता. नदीला पूल नव्हता. नावा नव्हत्या. पोहूनच दक्षिणतीरावर जायचे होते. गेले. सुसरीसारखे मराठे गेले . किल्ला बेसावध होता , नव्हे निर्धास्त होता. कावजीने या किल्यावर मावळ्यांनिशी हल्ला चढविला. ते तटावर चढले. घुसले. प्रतिकार होत होता , पण मराठ्यांचा जोश आणि उग्र निर्धार किल्ल्यावरच तुटून पडला होता. युद्ध पेटले. हलकल्लोळ उसळला. मराठ्यांचा मारा भयानक होता. युद्धात शाही किल्लेदारच कावजी मल्हारने कापून काढला. आदिलशाही फौजेची अक्षरश: दाणादाण उडाली. मध्यरात्रीच्या अंधारात मराठ्यांनी प्रचंड विजय मिळविला. पुन्हा भगवा झेंडा सुभानमंगळवर फडकला. आधी झालेल्या पराभवानं खचून न जाता मावळ्यांनी शत्रूवर आग पाखडली. अचानक केलेल्या हल्ल्याचा हा परिणाम. किल्ला मिळाला.
कावजी मल्हार किल्याचा बंदोबस्त करून पुन्हा पुरंदरावर आला। सारं मराठी सैन्य या विजयानं अधिकच पेटून उठलं. शिवाजीराजांनी पुढच्याच मध्यरात्री बेलसरवर असाच थोड्याशा मावळ्यानिशी लपतछपत जाऊन एकदम हल्ला चढविला. यावेळी भगवा झेंडा एका मावळी तुकडीबरोबर होता. योजनेप्रमाणे राजांनी या मावळी तुकडीला हुकुम दिला होता की , तुम्ही ऐन लढाईत घुसू नका. आम्ही गनिमांवर हल्ला करतो. अजूनही फत्तेखानाचं सैन्य जे आहे ते आपल्यापेक्षा जास्तच आहे. जमेल तसा आम्ही त्यांचा फडशा पाडतो. पण छावणीत झोपलेले शाही हशम जर आमच्यावर मोठ्या बळांनं चालून आले तर आम्ही माघार घेऊ. तुमच्या झेंड्याच्या तुकडीच्या रोखाने येऊ. आपण सारेच पुन्हा पुरंदरवर पोहोचू. हे छापेबाजीचं म्हणजेच गनिमी काव्याचं तंत्र कायम विजय मिळेपर्यंत चालूच राहणार होतं। राजांनी बेलसरच्या छावणीवर या योजनेप्रमाणे एकदम छापा घातला. कापाकापी एकच कार्यक्रम , अत्यंत वेगानं मावळ्यांनी सुरू केला. शाही छावणीत गोंधळ उडाला. फत्तेखान जातीनं उठून मराठ्यांवर तुटून पडला. मराठे ठरल्याप्रमाणे माघार घेऊ लागले. हा पराभव नव्हेच ही युद्धपद्धती होती. गनिमी काव्याचं युद्ध एकाच लढाईत संपत नसतं. ते विजय मिळेपर्यंत महिनोन महिने सुद्धा चालूच राहतं. मराठी फौजा माघार घेत दौडीत सुटली। काही मराठेही युद्धात पडले। मराठे परत फिरले पण दुसऱ्या बाजूनं भगव्या झेंड्याची मराठी तुकडी उत्साहाच्या भरात शाही छावणीवर तुटून पडली. ही तुकडी नेमकी शाही सैनिकांच्या तडाख्यात सापडली. खुद्द झेंडेवाल्यावरच घाव पडला. त्याच्या हातातील भगवा झेंडा कोसळण्याचा क्षण आला. झेंडा पडणार ? नाही , नाही! कारण तेवढ्यात याच तुकडीतल्या बाजी कान्होजी जेधे या तरुण पोरानं एकदम पुढे सरसावून तो पडत असलेला झेंडा स्वत:च पकडला. बाकीचे मावळे लढतच होते. बाजी जेध्यानं त्यांना माघार घेण्याचा इशारा देत देत लढाई चालूच ठेवली होती. या शथीर्च्या धुमाळीत काही मावळे पडले. पण झेंडा सावरीत बाजी यशस्वीपणे माघारी फिरला. अन् आपल्या साथीदारांच्यानिशी अंधारात गुडूप झाला. ही झेंड्याची तुकडी रक्ताळली होती. पण झेंडा हातचा न जाऊ देता पुरंदर किल्यावर दाखल झाली. अपेक्षेप्रमाणे हा हल्ला राजांना चांगला जमला होता. झेंडा जात होता , तोही परत आलेला पाहून राजे हर्षावले. फत्ते झाली. राजांनी बाजी जेध्याचं शाबासकी गर्जून कवतिक केले. त्यांनी तिथेच त्याचा उल्लेख ‘ सर्जाराव ‘ असा केला. हीच बाजी जेध्यांची पदवी ठरली. आता खासा फत्तेखान तुडवून काढण्याचा राजांचा निर्धार दसपटीनं वाढला. आत्मविश्वास वाढला. पुरंदर किल्ला मराठी युद्धघोषणांनी दणाणत होता.
-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment