शिवचरित्रमाला भाग ८

‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस!’
शहाजीराजे विजापूरात स्थानबद्धच होते। (दि. १६ मे १६४९ पासून पुढे) या काळात शिवाजीराजांना आदिलशाहच्या विरुद्ध काहीही गडबड करणं शक्य नव्हतं. त्यांच्या महत्त्वाकांक्षा थबकल्या होत्या. पण गप्प बसणं हा त्यांचा स्वभावधर्मच नव्हता. त्यांनी ओळखलं होतं की , आदिलशाह , जंजिऱ्याचा सिद्दी , गोव्याचे फिरंगी , अन् दिल्लीचे मोघल हे आपले वैरी. पण यांच्यापेक्षाही दोन भयंकर शत्रू आपल्या जनतेच्या मनात घुसून बसलेले आहेत. त्यांना कायमचं हुसकून काढलं पाहिजे. त्यातील एका शत्रूचं नाव होतं आळस. आणि दुसऱ्याचं नाव होतं अज्ञान.
या दोन्ही शत्रूंना शिवाजीराजांनी आपल्या स्वराज्याच्या सीमापार पिटाळलं होतं। ते स्वत: अखंड परिश्रम करीत होते. विश्रांती म्हणजेच आळस. ती त्यांना सोसवतच नव्हती. त्यांचे हेर कोकणातील दऱ्याखोऱ्यांत आणि सागरी किनाऱ्यावर हव्या आणि नको अशा गोष्टींचा शोध घेत होते. कारण पुढची मोठी झेप कोकणावर घालायची होती. याच काळात त्यांचं लक्ष पुण्याच्या आग्नेयेस अवघ्या दहा मैलांवरती असलेल्या कोंढवे गावावर गेले. कोंढाणा ते भुलेश्वर या डोंगररांगेच्या उत्तरणीवर हे कोंढवं वसलेलं होतं. तेथूनच बोपदेव घाटातून कऱ्हे पठारात जाण्याचा प्राचीन रस्ता होता. या घाटाच्या पायथ्याशीच कोंढवे गावाला प्यायला पाणी नाही अशी ल्हायल्हाय अवस्था उन्हाळ्यात कोंढण्याची होत होती.
शिवाजीराजांनी या कोंढव्याच्या जवळ अचूक जागा शोधून धरण बांधायचं ठरविलं। जो काही पाऊस थोडाफार पडतो. त्याचं पाणी बंधारा घालून अडवायचं. कमीतकमी खर्चात अन् उत्तम अभ्यासपूर्वक केलं , तर हे होतं. राजांनी तसंच करायचं ठरविलं. स्वत: जाऊन धरणाच्या जागेची पाहणी केली. जागा निवडली. उत्तमच पण जिथं बंधारा घालायचा तिथंच एक प्रचंड धोंड उभी होती. ही धोंड फोडणं आवश्यकच होतं. हे अतिकष्टाचं काम राजांनी कोंढाण्यातल्याच येसबा कामठे नावाच्या एका तरुण मराठ्याला सांगितलं आणि त्यानं ही धोंड फोडून काढली.
धरणाचं काम सुकर झाले। खर्चही बचावला. राजे स्वत: धरणाच्या जागी आले आणि निहायत खूश झाले. येसबानं जीव तोडून धोंड फोडली होती. राजांनी येसबाला कौतुकाची शाबासकी दिली. कौतुकानं ते येसबाला रोख रक्कम बक्षिस म्हणून देऊ लागले. राजा सुखावला होता. माझ्या स्वराज्यातली तरुण पोरं जीवापाड कष्ट करीत आहेत याचा त्याला आल्हाद वाटत होता. पण तो येसबा! राजांची रोख बक्षिसी घेईचना. तो म्हणाला , ‘ पैसे खर्च होऊन जातील. मला कायमची धान्य पिकवायला जरा जमीन द्याल का ?
‘ राजे अधिकच भारावले। येसबाला आलेली ही दृष्टी फारंच चांगली होती. घरसंसार चांगला फुलावा यासाठी चार दिवसांची चंगळबाजी न करता कायम कष्टाचं साधन येसबा पसंत करीत होता. राजांनी ताबडतोब होकार दिला. त्यांनी येसबाला चारवीत जमीन दिली. येसबाच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या मनात एक नवाच अभिमान फुलला की , माझ्या स्वराज्यात , माझ्या राजानं , माझ्या कुटूंबाच्या कायम हितासाठी मला वावर दिलं. आता कष्ट करू. भरल्या कणगीला टेकून पोटभर हक्काची भाकर खाऊ.
राजा अशा नजरेचा होता। दिवाळीत उटणं लावून आंघोळ घालावी अन् मळ धुवून काढावा तसा राजानं कोणाला काही , कोणाला काही काम सांगून त्यांचा आळस आणि अज्ञान धुवून काढायचा दिवाळसणच मांडला. राजानं माणसं कामाला लावली. ज्यांना ज्याची गरज असेल , त्यांना राजानं ‘ ऐन जिनसी ‘ मदत चालू केली. रोख रक्कम उधळली जाते. ज्या कामासाठी रक्कम घ्यायची ते काम करण्याऐवजी माणसं नको तिथं उधळपट्टी करतात. कामं बोंबलतात. अविवेकी माणसं उगीच लगीन करतात. उगीच देवळं बांधत सुटतात. देवाला काय हे असलं आवडतंय व्हय ? राजांनी रोकड कर्ज आणि वतनं इनामं देणं कधी सुरूच केलं नाही. जिजाऊसाहेबांनी पुण्यात प्रथम आल्यावेळी गरजवंतांना आपले संसार आणि उद्योगधंदे सजविण्यासाठी ‘ ऐन जिनसी ‘ मदत केली. तोच हा पायंडा राजे चालवित होते.
रहाटवड्याच्या रामाजी चोरघ्याला शेतात विहीर बांधायला नाही का अशीच मदत केली। यातनं रयतेत कुणाकुणाच्या पूवीर्च्या जखमा राजे भरूनही काढीत होते. तुम्हास्नी ठाऊ नसल. मी सांगतो. कोंढण्याच्या या येसबा कामठ्याच्या संसाराला फार मोठी जखम झाली होती ती कशी ? पूवीर् कोंढाण्याच्या किल्लेदारानं बादशाहीत या येसबाच्या थोरल्या भावावर खोटे नाटे आळ घेऊन त्याला ठार मारलं होतं. कामठ्यांच्या घरातली लक्ष्मी विधवा झाली होती. काही गुन्हा नसताना असं आभाळ कोसळलं. कसं सावरायचं ? कुणी सावरायचं ?
शिवाजीराजांनी सावरायचं। येसबा कामठ्याचं कोसळलेलं घरकुल शिवबानं सावरलं. हे असं सावरलं किसनदेवानं गोवर्धन पर्वत सावरला तसं सावरलं. आपल्या बोटावर सावरलं. पण अवघ्या गवळ्यांच्या काठीचा आधार त्या पर्वताला मिळालाच की!
-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment