शिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली;

उरले फक्त इंग्रजी शहाणपण.
सुरत बंदरात अनेक युरोपियन व्यापारी कंपन्या होत्या। त्यातच इंग्लीश ईस्ट इंडिया कंपनी होती। त्यांची फार मोठी वखार होती. जॉर्ज ऑक्झींडेन हा त्यांचा यावेळी (इ. १६६४ ) प्रमुख होता. सर्व युरोपियन व्यापारी कंपन्यांनी , महाराजांचा हा अचानक हल्ला आलेला पाहून महाराजांपुढे पटकन नमते घेतले आणि ते खंडण्या देऊन मोकळे झाले. पण जॉर्ज ऑक्झींडेनने अजिबात ‘ खंडणी देणार नाही ‘ असा निर्धार केला. हे त्याचे धाडस भयंकरच होते. मराठ्यांच्यासारख्या कर्दनकाळ शत्रूला असा कडवा निर्धारी नकार देणे म्हणजे मरण ओढवून घेणेच होते. महाराजांनी तीन वेळा या जॉजॅकडे माणूस पाठवून खंडणीची मागणी केली. त्याचा ठाम नकारच. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे , इंग्रजांची खास इंग्लीश माण्से येथे किती होती ? फक्त ४० अधिक १६० स्थानिक सुरतवाली नोकरमंडळी. सर्व मिळून दोनशे. तरीही जॉर्ज वाघासारखा वागत होता. त्याची वखार म्हणजे बळकट किल्ला नव्हता. वखारीला कंपाऊंड वॉल होती. लढावू तर नव्हता. तरीही जॉर्जचे एवढे बळ ? ते बळ त्याच्या मनात होते. म्हणूनच मनगटातही होते. दोनशे लोकांच्यानिशी तो वखारीच्या रक्षणाकरिता युद्धाला सज्ज होता.
महाराजांनी जॉर्जला निर्वाणीचा खंडणीसाठी खलिता पाठविला आणि मुकाट्याने खंडणी न द्याल तर राजापुरात दीड वर्षापूवीर् आम्ही तुमच्या इंग्रजी वखारीची काय अवस्था करून टाकली ते आठवा! असा इशारा दिला। तरीही जॉर्जने निर्धार सोडला नाही. उलट जबाब दिला की , ‘ पुन्हा तुमचा वकील खंडणीसाठी आमच्याकडे आला , तर त्याला ठार मारू. ‘
अखेर महाराजांनी आपली एक सैनिकी तुकडी हल्ला करण्यासाठी इंग्रजांवर पाठविली। जॉर्जने कडवा प्रतिकार केला. काही मराठे ठार झाले आणि महाराजांनी हल्ला थांबविला. चक्क माघार घेतली. ते ही योग्यच होते. कारण महाराज सुरतेत युद्ध करायला आलेले नव्हते. त्यांचे उद्दिष्ट स्पष्ट आथिर्क होते. तसं पाहिलं तर दोनशे (त्यात बिनलढावू माणसेच जास्त) वखाररक्षकांचा बिमोड करायला महाराजांपाशी सैन्य नव्हतं का ? पण आत्ता लढाईत वेळ आणि बळ खर्च करून किती नफा वा तोटा होईल याचा विचार महाराजांनी केला. इंग्रजांचे बळ होते , निश्चय आणि निष्ठा.
महाराजांना सुरतेत प्रत्येक तास आणि क्षण महत्त्वाचा आणि अपुरा वाटत होता। इंग्रज खंडणी न देता विजयी ठरले. जॉर्ज ‘ हिरो ‘ ठरला.
सुरत शहराच्या उत्तर दिशेस गस्तीवर ठेवलेल्या मराठी स्वारांनी अचूक बातमी महाराजांना सुरतेत पोहोचविली की , ‘ मोगलांचा सरदार महाबतखान हा मोठी फौज घेऊन पाटणहून सुरतेवर तडफेने येत आहे। महाराजांना ही बातमी समजताच त्यांनी लूट सुरक्षित नेण्यासाठी ताबडतोब सुरतेतून निघण्याची आज्ञा दिली. कारण महाबतखानाशी यावेळी युद्ध करणे परवडणारेही नव्हते आणि उद्दिष्टही नव्हते. उद्दिष्ट होते , लूट सहीसलामत स्वराज्यात नेण्याचे. महाराज इंग्रजांपुढंही भित्रे नव्हते. आता महाबतखानापुढेही भित्रे नव्हते. ते हिशेबी आणि धोरणी होते.
दि। १० जाने. १६६४ या दिवशी सकाळी सुमारे साडेदहा वाजता महाराजांची सेना आणि सुरतेची संपत्ती सुरत सोडून निघाली आणि स्वराज्याच्या वाटेस लागली. सुरतेतून बाहेर पडताना बऱ्हाणपूर दरवाजापाशी महाराज घोड्यावरून क्षणभर सुरत शहराकडे वळले आणि म्हणाले , ‘ बहुता दिवसांची इच्छा किती होती की , औरंगजेब बादशाहांची सुरत वसूल करावी. ती आज पूर्ण झाली. ‘ यावेळी इस्ट इंडिया कंपनीतील एक इंग्रज अँथनी स्मिथ हा ( याला मराठ्यांनी कैद केले होते , नंतर सोडून दिले.) बऱ्हाणपूर वेशीपाशी उभा होता. त्याने हे सर्व पाहिले आणि नंतर लिहून ठेवले.
महाराज स्वराज्याच्या मार्गाला लागले। महाबतखान पाटण्याहून वेगाने येत होता. पण तो , महाराज निघून गेल्यानंतर सात दिवसांनी (दि. १७ जाने. १६६४ ) सुरतेला पोहोचला. या सात दिवसांत सुरतेची भयंकर बदसुरत झाली होती. आता सुरतेचा मोगली संरक्षक सुभेदार इनायतखान हा निर्धास्त झाला होता. तो महाबतखानच्या स्वागतास गेला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप गदीर् होती. कोणी दु:खाने व्याकूळ होते , बहुतेक सारे इनायतवर संतापलेले होते. त्यानेच शहर वाऱ्यावर सोडून सुरतेच्या किल्ल्यात दडी मारली होती. तोच खान आता महाबतखानाच्या स्वागतास सामोरा चालला होता. त्याच्या वागण्याबोलण्यात वा चेहऱ्यावर अपराधीपणाचा लेशही नव्हता. पूर्ण निर्लज्ज. याचवेळी इंग्रज जॉर्ज ऑक्झींडेन हाही महाबतखानास सामोरा आला. महाबतखानास सुरतेत घडलेल्या एकूण सर्व हकीकती तपशीलवार समजलेल्या होत्या. हा खान इनायतनावर कमालीचा नाराज झाला होता. पण साफसाफ बोलावे अशी ती वेळ नव्हती. त्याने इनायतला काहीच न बोलता , जॉर्जचे हादिर्क कौतुक केले , ‘ तुम्ही इंग्रजांनी एवढ्या मोठ्या शत्रूशी ताठ मानेने जाबसाल केला याचे खरोखच आश्चर्य आणि कौतुक वाटते ‘ अशा आशयाचा शब्दात जॉर्जचे गुणगौरव करीत खानाने त्याला एक उत्कृष्ट घोडा आणि एक अत्यंत मौल्यवान रत्नजडीत तलवार भेट म्हणून देऊ केली. तेव्हा जॉर्ज अतिशय नम्रतेने म्हणाला की , ‘ मी काय विशेष केले ? मी माझे कर्तव्य केले. माझ्या राष्ट्राकरिता (इस्ट इंडिया कंपनीकरिता) अत्यंत दक्षतेने आणि कठोरपणे वागलो. ‘ महाबतखानाने तरीही त्याचे कौतुक करीत आपल्या मौल्यवान आहेराचा स्वीकार करण्याची जॉर्जला विनंती केली. तेव्हा जॉर्ज म्हणाला , ‘ मला स्वत:ला काहीही नको. माझ्यासाठी काही करणारच असाल , तर एकच करा. आपले वजन दिल्ली दरबारात आहे. तर आपण औरंगजेब बादशहांस शब्द टाकून आमच्या इस्ट इंडिया कंपनीला जरूर त्या सवलती मिळवून द्या.
यावर अधिक काही बोलण्याची गरज आहे का ? हे कंपनीवाले इंग्रज याच सुरत शहराचे , यानंतर फक्त ९० वर्षांनी ( इ. १७५५ सुमारास) पूर्ण मालकी हक्काचे सत्ताधीश झाले.
-बाबासाहेब पुरंदरे
SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment