Skip to main content

शिवचरित्रमाला भाग ३१

हौसेने स्वराज्य सजवावे.
दारिद्य कोणाच्या वाट्याला आलं तर ते दु:खदायकच आहे. त्यानं प्रयत्नाला देव मानून उत्तम व्यवहारे धन जोडावे संसार गोड करावा. हौसेनं करावा. ज्याला हौस नाही त्यानं संसार आणि राज्यकारभार करूच नये.
अन् दारिद्याचा अभिमान धरणं हा तर गुन्हा आहे. शिवाजीराजांनी माणसांना कष्ट करण्याची चटक लावली. हौस निर्माण केली. म्हणूनच शिवकालीन पत्रात आणि शिवकालीन काही कवींच्या काव्यात सहज उल्लेख येऊन जातात की , ‘ हे राज्य श्रींच्या आशीर्वादाचं आहे ‘ ‘ राज्येश्रींचे राज्य म्हणजे देवताभूमी. ‘ एका विरकत बैराग्यानं तर म्हटलं की , ‘ अशुद्ध अन्न सेवो नये ‘ अशुद्ध अन्न म्हणजे ? अयोग्य , पापी , भ्रष्टाचारी मार्गाने मिळविलेली धनधान्य दौलत. तिचा उपभोग घेऊ नये. श्रमाने मिळवावे. श्रम म्हणजे देवपूजा. आम्हाला केवढी मोठी माणसं इतिहासात मिळाली पाहा! शिवाजीराजांसारखा विरक्त , उपभोगशून्य छत्रपती. चक्रवतीर्. जिजाऊसाहेबांच्यासारखी ‘ कादंबिनीव जगजीवनदान हेतू: ‘ असलेली आई , राजमाता. नव्हे स्वराज्यमाता आम्हाला या मराठी मातेनं दिली. या मायलेकरांच्या जीवनांत चंगळमंगळ अन् उधळपट्टी केल्याची एकही नोंद , उल्लेख गवसत नाही.
कादंबिनीव म्हणजे योगिनीप्रमाणे. धर्मपुरुष आम्हाला लाभले तेही सोन्यामोत्यांना ‘ मृत्तिकेसमान ‘ मानणारे श्रीतुकाराम महाराजांसारखे तोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी , जोवरी देखिला नाही दृष्टी तुकाराम. या शिवकाळातील सारेच संतसत्पुरुष असे होते. मठ करून ताठा करणारे नव्हते. जनतेच्या भाबड्या श्रद्धेचा उपयोग करून ‘ इस्टेटी ‘ निर्माण करणारे नव्हते. म्हणूनच रयत सुसंस्कारांच्या अभ्यंग स्नानात नहात होती. याचा अर्थ इथं शिवाजीराजांच्या पाच-दहा वर्षांच्या स्वराज्यकाळात अगदी स्वर्गलोक अवतरला असंही नव्हे. समाजाची गती ही सावकाशच असते. स्वराज्यपूर्व काळातील इथलं लोकजीवन किती केविलवाणं होतं. पण स्वराज्य वाढू लागल्यापासून तेच जीवन बदलत गेलं. माणसा खावया अन्न नाही अशी अवस्था असलेला मराठी मुलुख स्वराज्यात भरल्या कणगीला टेकून पोटभर भाकरतुकडा खाऊ लागला होता.
इ. स. १६६१ ची कोकण मोहिम संपवून महाराज राजगडास परतले. प्रतापगड ते पन्हाळगड या भयंकर कठीण युद्धकाळातून महाराज अगदी तावून सुलाखून बाहेर पडले होते. अजून शाहिस्तेखान पुण्यात होताच. स्वराज्याचे हेर पुण्यावरती घिरट्या घालीतच होते. त्याचे मोठे यश म्हणजे उंबरखिंडीत केलेला कारतलबखानचा दणदणीत पराभव. पण याच साऱ्या घाईगदीर्तून वेळ काढून महाराजांनी गडावर जखमनाम्याचा दरबार भरविला. जखमनामा म्हणजे ज्यांनी ज्यांनी युद्धात कामगिऱ्या केल्या त्या कर्तबगारांचे भर दरबारात भरघोस कौतुक. याच काळात अज्ञानदास उर्फ आगीनदास नावाचा एक नामवंत शाहीर मराठी मुलुखांत गाजतगर्जत होता. या कौतुकाच्या दरबारात महाराजांनी युक्तिबुद्धिवंतांचे छान कौतुक केले या शाहीराचेही. जेधे नाईकांना त्यांनी मानाचे तलवारीचे पहिले पान दिले. वकिलांना ओंजळी ओंजळीने होन आणि शेलापागोटी दिली. युद्धात जे खचीर् पडले त्यांच्या बायकापोरांना ‘ अडीचसेरी ‘ म्हणजे पेन्शन दिले. कोणालाही उणे पडू दिले नाही.
आज आपणही पाहतो ना! आपले राष्ट्रपती अशाच राष्ट्रवीरांना , लोकसेवकांना , कलावंतांना आणि संशोधकांना गौरवाची मानचिन्हे दिल्लीत सन्मानपूर्वक देतात. अशोकचक्र , परमवीरचक्र आणि आमच्यातील महामानवांना भारतरत्न अशासारखे शिरपेंच अर्पण करतात. महाराजांनीही आपल्या कतृत्त्ववंतांचं भरघोस कौतुक केलं नेहमीच.
अशाच काळात शाहिस्तेखानाच्या छावणीतून खानाचा भाचा नामदारखान हा कोकणातील पेण , पनवेलजवळच्या मिऱ्या डोंगर उर्फ मिरागड या किल्ल्यावर फौज घेऊन निघाला. राजगडावर खबरा आल्या. महाराजांना शिकारीची संधी आल्यासारखंच वाटलं असावं. ते महाडच्या बाजूने कोकणात उतरले. मिरागड उत्तरेस आहे आणि महाराजांनी मिऱ्या डोंगरावर हल्ला करणाऱ्या नामदारखानाला आणि त्याच्या शाही फौजेला अचानक हल्ला करून असं झोडपून काढलं की , जणू लोहार तापून लाल झालेल्या लोखंडावर दणादणा घाव घालतो तसं. नामदारखान आपल्या पूर्वपरंपरेप्रमाणे पळून गेला. सारी मोगली मोहिम साफ फसली. ही मोहिम इ. स. १६६२ च्या प्रारंभी झाली. नक्की तारीख सापडत नाही. या मोहिमेत स्वत: महाराज रणांगणावर झुंजत होते. महाराजांच्या या अविश्रांत परिश्रमांना काय म्हणावे ? महाराजांना विश्रांती सोसत नव्हती. त्यांच्या संपूर्ण जीवनात खास विश्रांतीकरता ते एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी दोनचार महिने जाऊन राहिल्याची नोंद सापडत नाही. स्वराज्यसाधनाची लगबग त्यांनी कैसी केली ?

Comments

Popular posts from this blog

शिवरायांच्या इतिहासातील कुप्रसिद्ध रांझ्याच्या पाटलाचं गाव.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केलीकी महाराजांसोबत औरंगजेब, शाहिस्तेखान आणि अफजलखान व अनेक स्वराज्याचे शत्रू पक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात ,त्यात अजून एक नाव म्हणजे 'रांझे गावचा पाटील'. रांझे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत बदअमल केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्या वर खटला चालवून चौरंग केला. (चौरंग करणे म्हणजे हात पाय कलम करणे). या संदर्भाचे २८ जानेवारी १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले. महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मनाला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे, व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड-शिवापूर गावा पासून अवघ्या ३ की.मी. वर असलेले सह्याद्रीच्या कुशीतील छोटंसं रांझे गाव. रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते. मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते.मंदिरात...

५. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ब्राह्मणांचे स्थान !

‘काही वर्षांपूर्वी जेम्स लेन नावाच्या पाश्‍चात्त्य लेखकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राविषयी एक आक्षेपार्ह पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे कलह निर्माण झाला आणि ब्राह्मण समाजाला टीकेचे लक्ष्य करण्यात आले. अलीकडेच पुण्यात जात्यंध मराठा संघटनांनी ब्राह्मणद्वेषाचा कळस गाठून लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मध्यरात्री हटवण्याचे दुष्कृत्य केले. ‘छत्रपतींच्या जीवनात ब्राह्मणांचे कोणते स्थान होते’, हे जर ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पाहिले, तर ‘छत्रपतींच्या नावाचा वापर करून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद वाढवणे’, ही ‘महाराजांची क्रूर थट्टा आहे’, ही गोष्ट लक्षात येईल ! या सूत्राच्या पुष्ठ्यर्थ ‘अखिल भारतीय मराठा विकास परिषदे’ने प्रकाशित केलेल्या ‘समाज जागृती पुस्तिके’तील निवडक लिखाण पुढे दिले आहे. कधी नव्हे एवढी आज हिंदुऐक्याची आवश्यकता निर्माण झाली असतांना हिंदु जातीजातींत विभागणे उचित ठरणार नाही, यासाठी लेख प्रसिद्ध करत आहोत. १. छत्रपतींच्या गुणांचे त्यांच्या हयातीत वर्णन करणारे पहिले तीन कवी ब्राह्मणच ! अ. ‘छत्रपती शिवाजी महाराज हयात असतांना त्यांच्या गुणांचे मुक्त...

मिर्झा राजा जयसिंह आणि पुरंदरचा तह

औरंगजेबाने मुरब्बी व विश्वासू सेनापती मिर्झा राजा जयसिंह याची दक्षिणेत नेमणूक केली. शिवाजी महाराज त्यावेळी बिदनूर राज्यातील बसरुरच्या स्वारीवर गेले होते. त्यांनी हे समृध्द बंदर लुटले (फेब्रुवारी १६६५). परतताना गोकर्ण महाबळेश्वर, कारवार येथून ते दक्षिण कोकणात आले असताना जयसिंह हा मोठ्या सैन्यानिशी पुण्यात पोहोचला आहे (३ मार्च १६६५ रोजी), अशी बातमी त्यांना लागली. जयसिंहाने महाराजांची पूर्णपणे नाकेबंदी करण्याचे धोरण आखले. मोहिमेची सूत्रे संपूर्णपणे आपल्या हाती ठेवली. यात कुणाकडूनही हस्तक्षेप होऊ नये, अशी त्याने औरंगजेबाला अट घातली. शिवाय किल्ले आणि किल्लेदार यांजवर आपले नियंत्रण राहावे आणि माणसे फोडण्यासाठी व मोहिमेसाठी लागणारा पैसा सुभ्याच्या खजिन्यातून काढण्याची परवानगी असावी, या अटी जयसिंहाने बादशहाकडून मान्य करून घेतल्या. जयसिंहाच्या मोहिमेविषयीचा फार्सी पत्रव्यवहार उपलब्ध आहे. त्यातून तत्कालीन घटनांचे तपशीलवार उल्लेख आढळतात. महाराजांचा मैदानी प्रदेश मोगलांच्या ताब्यात होता. मोगलांनी कल्याण-भिवंडीपासून पुरंदरपर्यंत सीमेवर चौक्या आणि ठाणी बसविली होती. जयसिंहाने ठिकठिकाणी प्रबळ लष्कर...