मिर्झा राजा जयसिंह आणि पुरंदरचा तह

औरंगजेबाने मुरब्बी व विश्वासू सेनापती मिर्झा राजा जयसिंह याची दक्षिणेत नेमणूक केली. शिवाजी महाराज त्यावेळी बिदनूर राज्यातील बसरुरच्या स्वारीवर गेले होते. त्यांनी हे समृध्द बंदर लुटले (फेब्रुवारी १६६५). परतताना गोकर्ण महाबळेश्वर, कारवार येथून ते दक्षिण कोकणात आले असताना जयसिंह हा मोठ्या सैन्यानिशी पुण्यात पोहोचला आहे (३ मार्च १६६५ रोजी), अशी बातमी त्यांना लागली.
जयसिंहाने महाराजांची पूर्णपणे नाकेबंदी करण्याचे धोरण आखले. मोहिमेची सूत्रे संपूर्णपणे आपल्या हाती ठेवली. यात कुणाकडूनही हस्तक्षेप होऊ नये, अशी त्याने औरंगजेबाला अट घातली. शिवाय किल्ले आणि किल्लेदार यांजवर आपले नियंत्रण राहावे आणि माणसे फोडण्यासाठी व मोहिमेसाठी लागणारा पैसा सुभ्याच्या खजिन्यातून काढण्याची परवानगी असावी, या अटी जयसिंहाने बादशहाकडून मान्य करून घेतल्या. जयसिंहाच्या मोहिमेविषयीचा फार्सी पत्रव्यवहार उपलब्ध आहे. त्यातून तत्कालीन घटनांचे तपशीलवार उल्लेख आढळतात. महाराजांचा मैदानी प्रदेश मोगलांच्या ताब्यात होता. मोगलांनी कल्याण-भिवंडीपासून पुरंदरपर्यंत सीमेवर चौक्या आणि ठाणी बसविली होती. जयसिंहाने ठिकठिकाणी प्रबळ लष्करी तुकड्या ठेवल्या आणि त्यांना जागरुक राहण्याचे आदेश दिले.
जयसिंहाचा दुय्यम सेनापती दिलेरखान याने पुरंदरला वेढा घातला. जयसिंहाने आदिलशहा, पोर्तुगीज आणि लहानमोठे जमीनदार यांना शिवाजीला मदत करू नये असे बजावले. आदिलशाहीतील अनेक सरंजामदार त्याने आपल्याकडे ओढले. दहा ते पंधरा हजार सैनिकांच्या स्वतंत्र तुकड्या करून त्यांनी शिवाजीचा प्रदेश उद्ध्वस्त करावा, अशा आज्ञा दिल्या. त्यामुळे प्रजा हैराण होऊन गावे सोडून कोकणात आणि अन्यत्र जाऊ लागली. महाराजांनी जयसिंहाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण शरणागती पत्करल्याशिवाय बोलणे नाही, ही भूमिका त्याने घेतली.
मोगलांनी निकराचा हल्ला करून पुरंदरजवळचा रुद्रमाळचा किल्ला ताब्यात घेतला (१४ एप्रिल १६६५). तो जाऊ देऊ नये आणि पुरंदर हाती यावा अशी त्यांची योजना होती. दिलेरखान सासवड येथे ठाण मांडून राहिला. मोगलांनी बुरुजांच्या उंचीचे दमदमे तयार केले (३० मे १६६५). त्यांवर तोफा चढवून किल्ल्यावर मारा करण्याचा त्यांचा हेतू होता. मराठे व मोगल यांच्या रोज चकमकी झडत. महाराजांनी किल्ल्यात मदत पाठविण्याचे प्रयत्न केले; पण ते पुरंदरच्या शिबंदीला कमी पडत होते. मोगल शेवटी पुरंदर घेणार अशी चिन्हे दिसू लागली. शिवाय जयसिंहाने प्रबळ लष्करी पथके मराठ्यांच्या मुलखात पाठवून तो बेचिराख करण्याचे सत्र सुरू केले. पुरंदरच्या युद्धात मुरारबाजी देशपांडेसारखा पराक्रमी सेनापती कामी आला. तेव्हा शिवाजी महाराजांनी एकदंर परिस्थितीचा विचार करून शेवटी चाणाक्षपणे व दूरदृष्टीने तह करण्याचे ठरविले. त्यांचा हेतू राज्य आणि शक्य तितके किल्ले वाचवावे, हा होता. ११ जून १६६५ रोजी शिवाजी महाराजांनी जयसिंहाची भेट घेतली. संपूर्ण शरणागती पत्करून मिळेल त्यावर समाधान मानावे, ही जयसिंहाची मागणी. कोणत्याही परिस्थितीत युद्ध थांबवावे, हा महाराजांचा हेतू. अखेर पुरंदरच्या तहाच्या वाटाघाटी होऊन अटी ठरल्या. त्या अशा :
(१) महाराजांनी मोगलांना २३ किल्ले आणि वार्षिक चार लाख होन उत्पन्नाचा किंवा महसुलाचा मुलूख द्याव.
(२) उरलेले १२ किल्ले आणि वार्षिक एक लाख होनाचा मुलूख बादशहाशी राजनिष्ठ राहण्याच्या अटीवर आपल्याकडे बाळगावा. (३) मुलगा संभाजी याला पाच हजाराची बादशाही मनसब देण्यात येईल.
(४) महाराजांना मनसबीची आणि दरबारात हजर राहण्याची माफी देण्यात येईल; पण दक्षिणेत मोगल सांगतील ती कामगिरी आपण करू, असे आश्वासन त्यांनी द्यावे.
(५) विजापूरच्या मोहिमेत सहकार्य करण्याची एक अट होती. त्या मोबदल्यात घाटावरचे विजापूरचे पाच लाख होनाचे प्रांत शिवाजींनी जिंकून घ्यावेत आणि कोकणातील मुलूख सांभाळावेत व त्या मोबदल्यात वर्षाला तीन लाख होन या हिशोबाने चाळीस लाख होनाच्या खंडणीचा बादशाही खजिन्यात भरणा करावा. आदिलशहाचा कोकणातील मुलूख आपल्या ताब्यात आहे. त्याचे उत्पन्न चार लाख होनाचे आहे, असे महाराजांनी कळविले.
शिवाजी महाराजांनी मोठय़ा नाखुशीने हा तह स्वीकारला. शिवाजींचा संपूर्ण कोंडमारा केला, तर ते विजापूरशी हातमिळवणी करतील, हा धोका जयसिंहाला दिसत होता. घाटावरचा मुलूख आम्ही तुम्हाला देऊ, अशी बोलणी विजापूरने शिवाजी महाराजांशी सुरू केली होती. म्हणून जयसिंहाने शिवाजी महाराजांना १२ किल्ले आणि आदिलशाही मुलूखाचे आश्वासन देऊन त्यांना गुंतवून ठेवले.
पुरंदरच्या अटींनी औरंगजेब संतुष्ट झाला नाही; कारण जयसिंहाने शिवाजीचा नाश करण्याची संधी घालविली, असे त्याचे मत होते. तहातील अटींनुसार मोगलांनी पुणे, कल्याण आणि भिवंडी हे प्रांत शिवाजी महाराजांकडून घेतले. त्याचे महाराजांना मनस्वी दुःख झाले; पण कोकणातील आणि घाटावरील काही किल्ले व प्रदेश महाराजांनी टिकवून ठेवण्यात यश मिळविले.
रंगजेबाने विजापूरही जिंकून घ्यावे, अशी जयसिंहाला आज्ञा केली. शिवाजी महाराजांना बरोबर घेऊन तो विजापूरवर चालून गेला. मातब्बर प्रधान मुल्ला अहमद हा मोगलांकडे गेला असतानाही विजापूरकरांनी लढण्याची शर्थ केली (जानेवारी १६६६). निकराच्या लढायांत जयसिंहाला माघार घ्यावी लागली आणि भीमा ओलांडून सोलापूर गाठावे लागले.
या मोहिमेत शिवाजी महाराजांना कपटकारस्थानाने ठार मारण्याचा बेत दिलेरखानाने जयसिंहाला सांगितला, असे जयसिंहाच्या छावणीतील इटालियन प्रवासी निकोलाव मनुची (१६३९१७१७) म्हणतो. तेव्हा जयसिंहाने ही सूचना फेटाळली आणि शिवाजी महाराजांनी पन्हाळगडावर हल्ला करावा असे सुचवले. नेताजी पालकर वेळेवर न आल्यामुळे महाराजांचा हा हल्ला अयशस्वी झाला (१६ जानेवारी १६६६). शिवाजी महाराजांच्या नाराजीमुळे नेताजी प्रथम विजापूरला मिळाला आणि जयसिंहाने त्याची मनसब वाढविल्यावर मोगलांकडे गेला व पुढे त्यास औरंजेबाने मुस्लिम करून (१७ मार्च १६६७) अफगाणिस्तानात पाठविले. त्याचे नाव मुहम्मद कुलीखान असे ठेवण्यात आले.
जंजिऱ्याचे सिद्दी हे मूळचे विजापूरचे चाकर; पण जयसिंहाने त्यांना १६६५ नंतर मोगलांच्या आश्रयाखाली आणले. कोकणातील आपल्या अधिकारावर ही आक्रमण आहे, असे शिवाजी महाराजांना वाटू लागले. शिवाय विजापूरच्या मोहिमेत जयसिंहाची फजिती झाली होती. तेव्हा शिवाजी महाराज विजापूरशी युती करतील, अशी शंका जयसिंहाला आली. शिवाजीला औरंगजेबाने आग्र्यास बोलावून घ्यावे, असे त्याने बादशहास सुचविले. त्याप्रमाणे औरंगजेबाचा हुकूम आला. आग्र्याला जाण्यास ते राजी नव्हते; पण जयसिंहाने त्यांची समजूत घातली आणि पुरंदरच्या तहातील काही अटी सैल होऊ शकतील, असे सूचित केले. शिवाय मुलगा रामसिंह तुमच्या सुरक्षिततेची आग्र्यामध्ये पूर्ण काळजी घेईल, अशीही हमी जयसिंहाने दिली. आग्र्याला जाऊन बादशाहाची भेट घ्यावी, असे महाराजांनी ठरविले. मोजका सरंजाम आणि संभाजी यास घेऊन महाराज आग्र्यास जाण्यास निघाले (५ मार्च १६६६).
SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment