‘असे घडवा’ हे शिवाजीराजांचा इतिहास सांगतो || chhatrapati shivaji maharaj history always tell "do as like"

आजचा विषय संपूर्ण राजकीयच आहे. शिवाजी राजे हे राजकारणीच होते व त्यांचे चरित्र म्हणजे सर्वस्वी राजकारणच आहे. परंतु इतरांचा इतिहास व शिवाजीचा राजांचा इतिहास यांत फरक आहे. इतरांचे इतिहास इतिहासजमा झाले, शिवाजी राजांचा इतिहास अजून कामाला येतो. म्हणूनच आपण ‘शिवजयंती’ साजरी करतो. प्रतापगडचे उदाहरण घेतले, तर शिवाजी अद्याप अनेकांना सतावतो हेही दिसते. इतरांचे इतिहास ‘इतिहासात असे घडले’ एवढेच सांगतात, पण शिवाजी राजांचा इतिहास ‘असे घडायला पाहिजे व असे घडवा’ हे सांगतो.
भारतात ब्रिटिश राजवट आली, त्यावेळी विचित्र परिस्थिती होती. राष्ट्रीय जागृती नव्हती. वरचा सुशिक्षित वर्ग स्वामिनिष्ठ नागरिक होता. त्यावेळी इंग्रजांनी जो मराठय़ांचा इतिहास लिहिला त्यात मराठय़ांची केवळ बदनामी होती. ‘कुठून तरी विस्कटलेला पालापाचोळा एकत्र आला आणि त्याला आग लागून भडका उडाला’ असे मराठय़ांच्या इतिहासाचे चित्र त्यांनी रंगविले. पण आग कशी लागली? आणि भडका कोणाचा उडाला?
त्यानंतर हळूहळू राष्ट्रीय जागृती झाली. लोकमान्य टिळकांनी ‘शिवजयंती उत्सव’ सुरू केला. देशात ब्रिटिशविरोधी वारे वाहू लागले. मग आमची मंडळी जागृत झाली. राजवाडे, साने, पारसनीस उभे राहिले. त्यांनी मराठय़ांचा खरा इतिहास लिहायला सुरुवात केली. पण हा इतिहास लिहिताना ‘हे सर्व घडले कसे?’ याच्यावर आमच्यात मतभेद निर्माण झाले. काही मंडळींनी तर ‘अफजलखानाचा वध’वर निष्कारण शेकडो पाने खर्ची घातली. तो मेला की त्याला मारला? मारणे बरोबर होते की नाही? त्यांत साधनशुचिता होती की नाही? एक ना हजार प्रश्न आणि चर्चा. ‘साध्य बुडाले तरी चालेल पण साधनशुचिता पाहिजे’, असे म्हणणारी मंडळी आजदेखील आहेत. अरे, ही चर्चा कशाला पाहिजे? मारला, स्वराज्यासाठी मारणे आवश्यक म्हणून मारला. त्यात काय बिघडले? परंतु ‘स्वराज्य बुडाले तरी हरकत नाही पण साधनशुचिता पाहिजे’, असे म्हणणारे निघाले म्हणजे मोठे कठीण होऊन बसते.
या सर्व इतिहासाकडे पाहण्याचा मात्र आमचा कम्युनिस्ट दृष्टिकोन आहे. एक म्हणजे इतिहास हा चक्रासारखा फिरतो असे काही मंडळी म्हणतात. म्हणून त्याची पुनरावृत्ती होते असे ते म्हणतात. पण इतिहास वरवर जरी चक्रासारखा दिसला तरी प्रत्येक वेळेला तो पुढे पुढे जातो, त्याच्यात प्रगती होते हा पहिला दृष्टिकोन. ‘काही काही दिवसांनी एक एक सत्पुरुष जन्माला येतो आणि तो इतिहास घडवतो’, असे काही म्हणतात. ते बरोबर नाही. समाजाला ज्या वेळी ज्याची जरूर असते त्या वेळी तो तसा पुढारी निर्माण करतो. परिस्थिती निर्माण झाली की गुण निर्माण होतात. म्हणून परिस्थिती अधिक गुण, समाजाची जरुरी अधिक त्याचे व्यक्तिमत्त्व मिळून पुढारी तयार होतो, हा आमचा दुसरा दृष्टिकोन. ब्रिटिशांच्या वेळी सुरुवातीला जसे राजनिष्ठ लोक निर्माण झाले तसे मोंगलांच्या काळात झाले. काही लोक औरंगजेबाला ‘सत्पुरुष’ म्हणायला लागले. तो सूत काढीत नव्हता पण हाताने टोप्या तर शिवत होता. आणि काही लोक व्यक्तिश: आचरणाने सत्पुरुष असतात पण प्रसंगी गोळ्या घालतात हे तुम्हाला माहीतच आहे.
शिवाजीचा दृष्टिकोन जातीय नव्हता, हिंदू-मुसलमानांचा नव्हता. कराने नाडलेल्या शेतकऱ्यांसाठी त्याने कायदे केले. शेतकऱ्यांना संरक्षण दिले, म्हणून ते शिवाजीभोवती-स्वराज्याभोवती जमा झाले. मधली पिळवणूक, मधले अडते नष्ट केले, म्हणून शेतकऱ्यांनी त्याला पाठिंबा दिला. स्वराज्य कशासाठी असते? केवळ झेंडावंदनासाठी? मग झेंडा राहतो वर आणि झेंडय़ाची काठी बसते पाठीत. शिवाजीचे स्वराज्य तसे नव्हते. ते खरेखुरे स्वराज्य होते. लोक त्याला हिंदवी स्वराज्य म्हणू लागले. म्हणून शिवाजीच्या कार्याचा जे जातीयवादी अर्थ लावतात ते चूक आहेत. मुसलमानांचा बीमोड होऊन हिंदूंचे राज्य झाले असा त्याचा अर्थ नव्हे. नाथे समूह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाइस व भारतीय आयुर्विमा मंडळ यांच्या सहकार्याने आणि जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड व तन्वी हर्बल्स यांच्या मदतीने राज्यातील आठ केंद्रांवर लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धा होत आहे.
शिवाजीने सांगितले, ‘सर्व जण स्वराज्याच्या एकीत या, पण काहींनी मानले नाही. त्यांनी एकीत येण्याचे नाकारले. तो म्हणाला, ‘स्वराज्याच्या एकीत आला नाहीत, फाटाफूट केलीत, कापून काढू, एकीत या, नाहीतर मरा.’ तेव्हा काही लोक म्हणाले, ‘अरे, हा शिवाजी मारकुटा आहे, िहसक आहे, लोकशाही मानेल की नाही, शंका वाटते’. पण शिवाजीने तिकडे दुर्लक्ष करून आपले कार्य चालूच ठेवले. त्याने जातगोत, पक्ष पाहिला नाही, सर्वाना सांगितले, ‘आपला शत्रू एक. ध्येय एक- मोंगलांना मारणे’ अशी स्वराज्यासाठी एकीची हाक त्याने दिली. तेव्हा सर्व जण एकीत आले.
शिवाजीने धर्म राखला पण धर्माधता आणली नाही, कुळांना संरक्षण दिले पण कुळींचा बडेजाव माजवला नाही. स्वराज्याची एकी केली आणि प्रतिगाम्यांची फळी फोडून काढली. त्याने मराठी ही राजभाषा केली. भाषेचा लढा हा जीवनाचा लढा आहे. शिवाजीने जनतेची, जीवनाची भाषा घेतली. स्वराज्याबरोबरच स्वभाषा साधली. तेव्हा ‘शिवकार्याचे स्वरूप’ लक्षात घेताना स्वराज्य, स्वराज्याची एकी, स्वराज्यातील जनतेचे हित, स्वराज्याची भाषा, स्वराज्याच्या रक्षणासाठी यंत्र व तंत्रज्ञान, त्यासाठी लागणारे कारखाने व या कारखान्यांची किल्ली ज्या कामगार वर्गाच्या हाती तो कामगारवर्ग हे सर्व बरोबर घेऊन आपण पुढची वाटचाल केली पाहिजे, हेच शिवाजीच्या शिकवणुकीचे सार आहे.
SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment