कैलास लेणी

भारतीय शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून वेरूळ लेण्यांकडे पाहिले जाते . हिंदू , बौद्ध आणि जैन संस्कृतीचे दर्शन घडविणारी शिल्पे या लेण्यांमधून आहेत . कळसापासून पायापर्यंत अशी निर्मिती झालेल्या कैलास लेणीतील कलाकुसर , कोरीव काम आश्चर्यकारक आहे . जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेल्या वेरूळला देश - विदेशातील लाखो पर्यटक भेट देतात ...औरंगाबाद शहरापासून ३० कि . मी . वरील खुलताबाद तालुक्यात वेरूळ आहे . प्राचीन व्यापारमार्गाच्या छेदस्थानी वसलेल्या आणि शतकानुशतके पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ख्याती असलेल्या वेरूळचा उल्लेख अरब आणि युरोपियन प्रवाशांच्या प्रवासवर्णनामध्ये ठळकपणे आढळतो . चंद्रकोरीसदृश्य आकाराच्या डोंगरकुशीत वसलेली वेरूळ लेणी दख्खन पठाराभिमुख , दक्षिणोत्तर रेषेत वेरूळच्या डोंगरात सुळ्याच्या सहाय्याने कोरून काढण्यात आली आहेत . बौद्ध लेणी क्रमांक एक ते १२ची निर्मिती इसवी सन पाच ते सातव्या शतकादरम्यान , हिंदू लेणी क्रमांक १३ ते २९ची निर्मिती इसवी सन आठ ते नवव्या शतकादरम्यान आणि जैन लेणी क्रमांक ३० ते ३४ची निर्मिती इसवी सन नऊ व ११व्या शतकादरम्यान करण्यात आली .
सरळ रेषेत वसलेल्या एकूण ३४ लेण्यांमध्ये बौद्ध चैत्य दालने , प्रार्थना गृहे , विहार किंवा आश्रम ; तसेच हिंदू आणि जैन मंदिरे यांचा समावेश आहे . पाचव्या शतकापासून ते अकराव्या शतकापर्यंत सुमारे ६०० वर्षे चाललेल्या येथील कोरीव लेण्यांमध्ये धूमर लेणे ( लेणी क्रमांक २९ ) वेरुळचे सर्वात प्राचीन असून , यातील प्रार्थना मंदिरात शिवलिंग आहे . या काळात बुद्ध , हिंदू , व जैन धर्माचे वर्चस्व होते . त्यामुळे या धर्मांच्या संस्काराचे प्रतिबिंब लेण्यातून उमटलेले दिसते . अप्रतिम अशा ३४ गुहांतील मूर्ती म्हणजे धार्मिक आणि कलात्मकतेने नटलेल्या उत्तुंग रचना आहेत . एकसंध प्रस्तरात अखंड पाषाणातील महाकाय कातळ कापून त्यांची निर्मिती झाली आहे . असे सांगितले जाते की , दोन लाख टन दगड याच्या निर्मितीकार्याच्या वेळी काढण्यात आला . ३४ लेण्यांमधील पहिल्या १३ बुद्धधर्मीयांचा , नंतरच्या १६ हिंदू धर्मीयांचा व उर्वरित पाच जैन धर्मीयांचा इतिहास दर्शविणाऱ्या आहेत . बुद्ध धर्माचा मानवतेचा व शांतीचा संदेश , हिंदूंचे कर्मकांडाचे व कथांचे महत्त्व , तर जैन धर्मीयांच्या अहिंसातत्त्वाचा व पौराणिक कथांचा विषय मोठ्या कलात्मकतेने व कौशल्याने कोरलेला आहे . या ३४ लेण्यांमधील ५ , ६ , १० , ११ , १४ , १५ , १६ , २१ , २९ व ३२ क्रमांकाच्या लेण्या अधिक देखण्या आहेत .
जगप्रसिद्ध आणि प्रभावशाली १६व्या क्रमांकाची कैलास लेणी भव्यता आणि एकात्मता याबाबत अजोड मानली जाते . जगातील सर्वात मोठी एकसंध वास्तू म्हणून प्रख्यात असलेले हे लेणे म्हणजे वास्तुकलेचा , शिल्पकलेचा एक अप्रतिम नमुना आहे . कैलास लेणी ही ' आधी कळस मग पाया ' अशी तयार झालेली आहे . वेरूळ लेण्यांचे खोदकाम कसे झाले असावे , याची कल्पना १६व्या क्रमांकाची कैलास लेणी पाहताना येते . प्रथम रूपरेषा आखल्यानंतर छतापासून खोदकामास सुरुवात झालेली दिसते . दगड अत्यंत तीक्ष्ण हत्यारांनी खोदले जायचे . प्राथमिक खोदकाम जरी कुदळीसारख्या मोठ्या हत्याराने केले गेले असले , तरीही नंतरचे नाजूक कोरीव काम मात्र छिन्नी व हातोड्याने केलेले दिसते . डोळ्याचे पारणे फेडणारी ही कलाकुसर आहे . शैल्य स्थापत्यशास्त्राच्या प्रगतीचे टप्पे या लेण्यात पहायला मिळतात . भारतीय शिल्पकलेचा हा सर्वोकृष्ट नमुना आहे . रामायण , महाभारतातील पौराणिक प्रसंग , शिव महात्म्य , विष्णू अवतार , लक्ष्मी , गंगा , यमुना , सरस्वतीचे चित्रण या लेणीत असून , ते लेणीचे देखणेपण वाढवतात .
वेरूळ येथील २१ क्रमांकाच्या लेणीत शिव - पार्वती विवाहाचा प्रसंग तर , २९ क्रमांकाच्या लेणीत शिवतांडव नृत्य दाखविले आहे . अर्धनारीनटेश्वरकडे दर्शनही येथे होते . ३२ क्रमांकाची लेणी अत्यंत आकर्षक आहे . याच्या छतावरही कोरीव शिल्पकला असून , तेथे कमलपुष्पं दाखविली आहेत . अजोड मूर्तीकलेचा अप्रतिम नमुना म्हणून वेरूळ लेणीकडे पाहिले जाते . जगप्रसिद्ध वेरूळ लेण्या पाहताना शिल्पकला व चित्रकलेचे दर्दी आपल्या प्राचीन काळात अस्तित्वात होते , याची प्रचीती येते . या लेण्यांच्या संवर्धनासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग अथक परिश्रम घेत आहे . रसायनांचा वापर करून , विविध उपचार करून ती सुरक्षित ठेवण्याबरोबरच तिला नवी झळाळी देण्याचे महत्त्वाचे काम करीत आहे . त्यामुळेच पुढच्या पिढीला हा हजारो वर्षांपूर्वीचा ठेवा पाहायला मिळत आहे .
युनेस्कोने सन १९८३मध्ये अजिंठा लेणी व वेरूळ लेणी जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे . वेरूळ लेणी आज संपूर्ण जगाला आकर्षित करीत आहे . भारत हा युनेस्को वारसामध्ये सभासद देश म्हणून स्थापनेपासूनच आहे . या अंतर्गत भारतातील एकूण २८ ठिकाणे ' जागतिक वारसा स्थळे ' म्हणून आजपावेतो नोंदली गेली आहेत . भारत देशातील वारसा स्थळांच्या यादीची सुरुवात १९८३पासून अजिंठा लेणी , वेरूळ लेणी ( औरंगाबाद ) आणि ताजमहाल ( आग्रा ) यांच्या नोंदीने झाली . परदेशी पर्यटकांना वेरूळ लेणी पाहण्यासाठी आकर्षित करण्याचे प्रयत्न होत आहेत . जपान सरकारच्या मदतीने विकास योजनाही राबविल्या जात आहेत . पर्यटकांना वेरूळ येथे रेल्वेची सुविधा नाही . त्याचाही परिणाम पर्यटनावर होत आहे . अजिंठा - वेरूळ लेण्या रेल्वेने जोडण्याचा विचार होण्याची गरज आहे . दर मंगळवारी वेरूळ लेणी बंद असते . याविषयी व्यापक जनजागृती करण्याची आवश्यकता आहे . परदेशांतल्या , तसेच देशातल्या अनेक पर्यटकांना मंगळवारी लेणी बंद असल्याची माहिती नसते . त्यामुळे येथे आल्यावर त्यांचा हिरमोड होतो . वाढत्या प्रदूषणाचा फटका मानवी शरीर , पशुपक्ष्यांचे जीवन व सागरी जलचरांना जितका बसतो आहे , तितकाच तो प्राचीन बांधकामे , मंदिरे व लेण्यांनादेखील बसतो . पुरातत्त्व संशोधकांनी यावर वेळीच उपाय केले नाहीत तर हा प्राचीन सांस्कृतिक वारसा नष्ट होईल , असा गंभीर इशारा दिला जात आहे . आपल्या देशात अशा प्राचीन सुंदर स्थळी पर्यटकांची नेहमी गर्दी असते ; पण म्हणावे तसे याकडे लक्ष दिले जात नाही . जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झालेल्या वेरूळच्या लेण्यांच्या संवर्धनासाठी भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाने , लेण्यातील सूक्ष्म तड्यांतून झिरपणारे पाणी थांबविण्यासाठी विदेशी तज्ज्ञांनी मोठे काम केलेे . भारतीय पुरातत्त्व व भूवैज्ञानिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिश्रम घेऊन लेणी संवर्धनाचे अनमोल कार्य केले आहे . वेरूळ हे जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ आहे . वाढते प्रदूषण आणि शेकडो वर्षांपासून उन पाऊस खाणाऱ्या येथील शिल्पकलांना धोका पोहचू नये , यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने विशेष काळजी घेतली आहे .
छायाचित्र - शिवम
#shivajimaharajhistory
SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment