औरंगजेबाने मुरब्बी व विश्वासू सेनापती मिर्झा राजा जयसिंह याची दक्षिणेत नेमणूक केली. शिवाजी महाराज त्यावेळी बिदनूर राज्यातील बसरुरच्या स्वारीवर गेले होते. त्यांनी हे समृध्द बंदर लुटले (फेब्रुवारी १६६५). परतताना गोकर्ण महाबळेश्वर, कारवार येथून ते दक्षिण कोकणात आले असताना जयसिंह हा मोठ्या सैन्यानिशी पुण्यात पोहोचला आहे (३ मार्च १६६५ रोजी), अशी बातमी त्यांना लागली. जयसिंहाने महाराजांची पूर्णपणे नाकेबंदी करण्याचे धोरण आखले. मोहिमेची सूत्रे संपूर्णपणे आपल्या हाती ठेवली. यात कुणाकडूनही हस्तक्षेप होऊ नये, अशी त्याने औरंगजेबाला अट घातली. शिवाय किल्ले आणि किल्लेदार यांजवर आपले नियंत्रण राहावे आणि माणसे फोडण्यासाठी व मोहिमेसाठी लागणारा पैसा सुभ्याच्या खजिन्यातून काढण्याची परवानगी असावी, या अटी जयसिंहाने बादशहाकडून मान्य करून घेतल्या. जयसिंहाच्या मोहिमेविषयीचा फार्सी पत्रव्यवहार उपलब्ध आहे. त्यातून तत्कालीन घटनांचे तपशीलवार उल्लेख आढळतात. महाराजांचा मैदानी प्रदेश मोगलांच्या ताब्यात होता. मोगलांनी कल्याण-भिवंडीपासून पुरंदरपर्यंत सीमेवर चौक्या आणि ठाणी बसविली होती. जयसिंहाने ठिकठिकाणी प्रबळ लष्कर...
Chhatrapati Shivaji Maharaj photos and history.