अफझलखान-शिवाजी भेट व प्रतापगडचे युद्ध

याच सुमारास, आम्हाला परत केलेल्या कल्याण, भिवंडी आणि पुणे प्रांतातून शिवाजीला हाकलून लावा, असे दडपण मोगलांकडून विजापूरवर येऊ लागले. विजापूर दरबारने शिवाजी महाराजांविरुध्द अफझलखानाची रवानगी केली. इ.स. १६४९ पासून वाई परगणा अफझलखानाकडे मुकासा (जहागीर) म्हणून होता. त्यामुळे त्याला या प्रदेशाची माहिती होती. अफझलखान हा विजापूरहून एप्रिल १६५९ मध्ये निघाला आणि वाईस पोहोचला. वाटेत त्याने पंढरपूर येथे अत्याचार केले, अशा कथा पुढे प्रचारात आल्या. पंढरपूला त्याने जबर रकमा वसूल केल्या असाव्यात आणि धमकी व दहशतीचे वातावरण पसरून दिले असावे. यापूर्वी केव्हा तरी त्याने अशाच प्रकारे उपद्रव तुळजापूर येथेही दिला होता. बजाजी निंबाळकराची कैद आणि जबर दंड ही प्रकरणे याच काळातील होत.
विजापूरच्या सैन्यात पांढरे, खराटे, जाधव इ. मराठे सरदार होते. वाईला आल्यानंतर अफझलखानाने पुणे, कल्याण आणि भिवंडी प्रांतांचा ताबा घेण्यासाठी वरील मराठी सरदार आणि सिद्दी हिलाल यांना त्या प्रांतांत पाठवून दिले. त्या प्रांतांतील मराठे वतनदार, देशमुख, देशपांडे इत्यादींना महाराजांच्या विरुध्द उठविण्याचाही अफझलखानाने प्रयत्न केला.
हाराज या अडचणीत असतानाच सईबाई वारल्या (१६५९); तथापि ते विचलित झाले नाहीत. अफझलखानाच्या सैनिकी बलाची व कर्तृत्वाची त्यांना कल्पना होती. शिवाजीला कैद करावे किंवा जमल्यास ठार मारावे, असा आदेश घेऊनच अफझलखान हा विजापूरहून आला आहे, हेही त्यांना माहीत होते. हे लक्षात ठेवूनच त्यांनी आपला तळ प्रतापगडसारख्या दुर्गम स्थळी ठेवला आणि अफझलखानाचा प्रतिकार करण्याची भक्कम तयारी केली.
अफझलखानाचे बरेच सैन्य पुणे, कल्याण व भिवंडी प्रांतांत पसरले होते. त्यामुळे त्याच्या सैन्याची साहजिकच विभागणी झाली. वाईला आपल्याजवळ असलेले सैन्य पुरे पडेल, याची त्याला खात्री वाटत नसावी. प्रतापगडसारख्या तळावर जाऊन लढा द्यावा, तर तो यशस्वी होईल किंवा नाही आणि ही मोहीम लवकर आटोपेल की नाही, याची त्याला खात्री वाटेना; म्हणून त्याने महाराजांच्याकडे निर्वाणीचा खलिता पाठवून त्यांच्यावर दडपण आणण्याचे प्रयत्न केले.
अफझलखानाने पाठविलेले पत्र आणि त्याला महाराजांनी दिलेले उत्तर ही दोन्ही कवींद्र परमानंदाने आपल्याशिवभारत काव्यात संस्कृतमध्ये अनुवाद करून दिली आहेत. पत्रांवरून विजापूरचे शासन हे मोगलांच्या आदेशाप्रमाणे वागत असावे, याबद्दल संशय रहात नाही. अफझलखानाने महाराजांना कळविले, तुम्ही राजचिन्हे धारण करीत आहात. तुम्ही शत्रूला अगदी अजिंक्य अशा चंद्रराव मोऱ्यांच्या जावळी या विस्तीर्ण राज्यावर हल्ला करून ते बलाने काबीज केलेत आणि जावळी घेऊन मोऱ्यांना सत्ताहीन केले. निजामशाहीच्या अस्तानंतर आमच्या आदिलशहांनी निजामशाहीच्या ताब्यातील मुलूख हस्तगत केला होता, तोही तुम्ही आपल्या अखत्यारित आणला आहे.
कल्याण, भिवंडीचा प्रांत आम्ही मोगलांकडे परत केला होता, तो हे शहाजी राजांच्या पुत्रा, तुम्ही बळकाविला आहे आणि तेथील मुस्लिम धर्माशास्त्री आणि प्रतिष्ठित लोक यांना तुम्ही त्रास देत आहात. त्यांच्या धर्मस्थळांनाही तुम्ही नष्ट केले, असेही म्हटले जाते. आम्ही मोगलांना दिलेला पुणे प्रांत हाही तुम्ही अद्याप ताब्यात ठेवला आहे. तेव्हा हा बंडखोरपणा सोडून द्यावा. मोगालांना पुणे, कल्याण, भिवंडी आदी प्रदेश देऊन टाकावेत. चंद्रराव मोऱ्यांकडून जबरदस्तीने घेतलेली जावळी मोऱ्यांना परत करावी आणि आदिलशहाला शरण यावे. आदिलशहा तुम्हाला अभय देऊन तुमच्यावर कृपा करतील तेव्हा हे राजा, माझ्या आज्ञेप्रमाणे संधीच कर आणि सिंहगड व लोहगड हे मोठे किल्ले, तसेच प्रबळगड, पुरंदर, चाकण नगरी आणि भीमा व नीरा यांच्यामधला प्रदेश महाबलाढ्य अशा दिल्लीच्या बादशहास शरण जाऊन किल्ले व मुलूखही देऊन टाक.
पुढे अफझलखानाने आपल्या लष्करी बलाची क्षमता व प्रौढी सांगताना त्यात लिहिले होते, आदिलशहाच्या आज्ञेवरून माझ्याबरोबर आलेले सहा प्रकारचे सैन्य मला ताबडतोब (युद्धास) उद्युक्त करीत आहे. तुझ्याशी युद्ध करण्यास उत्सुक असलेले व जावळी काबीज करू इच्छिणारे मूसाखान इत्यादी (सरदार) मला या कामी प्रोत्साहन देत आहेत.
या पत्राची ही भाषा विजयाची खात्री असणाऱ्या माणसाची (योद्ध्याची) वाटत नाही.
हाराजांनी खानाला प्रतापगडाकडे आणण्यासाठी मोठ्या मुत्सद्दीपणाने त्याला कळविले, की आपण प्रतापी, आपला पराक्रम थोर, आपण माझ्या वडिलांचे ऋणानुबंधी; त्यामुळे आपणही माझे हितचिंतक आहात. आपल्या तळावर येऊन आपल्याला भेटणे हे सध्याच्या वातावरणात मला सुरक्षितपणाचे वाटत नाही. उलट आपण प्रतापगडास यावे. माझा पाहुणचार स्वीकारावा. मी आपले सर्व काही, माझा खंजीरसुद्धा आपल्यापाशी ठेवून देईन.
हाराजांचा हा डावपेच अफझलखानाला कळला नाही. युद्धावाचूनच शिवाजी आपल्या हातात येणार, या भ्रमात तो राहिला. प्रत्यक्षात महाराजांना कैद करून अगर ठार मारून ही मोहीम निकालात काढावी, असा त्याचा हेतू होता. महाराज आणि अफझलखान हे दोघेही परस्परांच्या हेतूंविषयी साशंक होते, असे विविध साधनांवरून दिसते. महाराजांनी सैन्याची मोठी तयारी केली होती.
घोडदळ अधिकारी नेताजी पालकर आणि पायदळ अधिकारी मोरोपंत पिंगळे हे जय्यत तयारीनिशी येऊन महाराजांना मिळाले. प्रतापगडाभोवतालच्या डोंगरांत मराठ्यांची पथके ठिकठिकाणी मोक्यावर ठेवण्यात आली. वाईहून प्रतापगडकडे जाताना महाराजांनी अफझलखान आणि त्याचा सरंजाम यांची मोठी बडदास्त राखली. अफझलखानाने जड सामान वाईला ठेवले होते. प्रतापगडाजवळ येऊन पोहोचल्यावर भेटीबाबत वाटाघाटी झाल्या आणि प्रतागडाजवळ ठरलेल्या स्थळी शामियाने उभारून उभयतांच्या
भेटी व्हाव्यात असे ठरले. दोघांनीही बरोबर दहा शरीररक्षक आणावेत, त्यांना शामियानाच्या बाहेर ठेवावे, प्रत्यक्ष शामियान्यात दोघांचे वकील आणि दोन रक्षक असावेत असा करार झाला. भेटीपूर्वी भेट अयशस्वी झाली, तर काय करावे यासंबंधी शिवाजी महाराजांनी सर्वांना योग्य त्या सूचना दिल्या होत्या. परमानंदाने शिवभारतात महाराजांना अंबाबाईची कृपादृष्टी लाभली आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला इ. वर्णन केले आहे.
भवानी देवीची प्रेरणा व आशीर्वाद महाराजांना यश मिळवून देते, ही समजूत तत्कालीन श्रध्देमुळे मराठ्यांची सुप्तशक्ती जागृत करण्यास समर्थ ठरली. १० नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी महाराज आणि अफझलखान यांची भेट झाली. महाराजांच्या शरीरक्षकांत गायकवाड, सिद्दी इब्राहीम, जिवाजी महाले (सकपाळ) इ. मंडळी होती, तर अफझलखानाच्या शरीररक्षकांत सय्यद बंडा, शंकराजी मोहिते, पिलाजी मोहिते इ. मंडळी होती. महाराजांचा वकील पंताजी गोपीनाथ तर खानातर्फे कृष्णाजी भास्कर हेही बरोबर होते. भेटीपूर्वी दोघांनीही आपल्या तलवारी रक्षकांच्या हाती दिल्या होत्या. दोघांपाशी खंजीरी होत्या. अफझलखानाने शिवाजी महाराजांना घट्ट आलिंगन दिले. शत्रू हाती आला आहे, त्याचा निकाल लावावा असे खानाला वाटले असावे. त्याक्षणी महाराजांनी वाघनख त्याच्या पोटात खुपसले आणि त्याच्या मिठीतून सुटका करून घेतली आणि नंतर कट्यारीने वार केला. परमानंदाने कृपाण म्हणजे लांब खंजीर महाराजांपाशी असल्याचा उल्लेख केला आहे.
संभाजींच्या दानपत्रात शिवाजी महाराजांनी बिचवा खुपसल्याचा उल्लेख आढळतो. या भेटीत अफझलखान मारला गेला आणि त्याच्या शरीररक्षकांनी केलेला प्रतिकारही महाराजांच्या शरीररक्षकांनी मोडून काढला. भेटीपूर्वी ठरल्याप्रमाणे महाराजांनी पुढील हालचालींसाठी सैन्याला इशारा दिला. त्यांनी अफझलखाच्या बेसावध सैन्यावर चाल केली. त्यावेळी झालेल्या युद्धात खानाच्या सैन्याची लांडगेतोड झाली. महाराजांना या युद्धात हत्ती, घोडे, उंट, मूल्यवान वस्त्रे, अलंकार इ. संपत्तीची मोठी लूट प्राप्त झाली. अफझलखानाचे बरेच अधिकारी कैद  झाले. काहीजण पळून गेले.
शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अफझलखान भेटीचा प्रंसग हा मोठा आणीबाणीचा समजला जातो. प्रतापगडच्या युद्धात लष्करी डावपेच, सैन्याची हालचाल आणि व्यूहरचना तसेच अनुकूल रणांगणाची निवड आणि प्रसंगावधान हे शिवाजी महाराजांच्या युद्धकौशल्याचे महत्त्वाचे विशेष आढळतात. या प्रसंगी महाराजांचे धैर्य, सावधानपणा आणि धाडस हे गुण प्रकर्षाने प्रत्ययास आले. अफझलखानाचा वध ही महाराजांच्या शौर्यसाहसाची गाथा आहे; पण खानाच्या सैन्याचा धुव्वा उडविणे, हा त्यांच्या रणनीतीचा असामान्य विजय होय. अफझलखानाच्या मृत्यूने सगळा दक्षिण भारत हादरून गेला. [⟶ प्रतापगड].
SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment