‘विद्यार्थी मित्रांनो, आपण आता
तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करणार आहोत. जयंती साजरी करणे, म्हणजे केवळ
पोवाडे लावणे किंवा एखादा गाण्याचा कार्यक्रम करणे एवढ्यापुरते मर्यादित
आहे का ? खर्या अर्थाने शिवजयंती साजरी करणे, म्हणजे शिवरायांचे
गुण आपल्या अंगी बाणवण्याचा निश्चय करणे होय. सध्या याला एका उत्सवाचे
स्वरूप आले आहे. आपल्याला यामध्ये पालट करायचा आहे; कारण शिवरायांसारखे
आदर्श जीवन जगणे, ही आजच्या काळाची आवश्यकता आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या आदर्श युगपुरुषाला घडवणारी त्यांची जीवनपद्धत आणि आपली जीवनपद्धत
खेळ खेळणे
मर्दानी खेळांमुळे लढाऊवृत्ती निर्माण होणे :
शिवराय पटांगणात खेळ खेळत. कुस्ती, दांडपट्टा, घोड्यावर स्वार होणे, तलवार
चालवणे अशा खेळांमुळे त्यांच्यात निर्भयता, क्षात्रवृत्ती, अन्यायाविरुद्ध
चीड, लढाऊवृत्ती, तसेच नेतृत्वगुण असे अनेक गुण निर्माण झाले.
मित्रांनो, गुणच आपल्या जीवनाचा पाया आहे; म्हणून आपण प्रत्यक्ष मर्दानी खेळ खेळलो, तरच आपल्यात गुण येतील.
काल्पनिक खेळांमुळे विध्वंसकतेकडे वाटचाल होत असल्याने त्यांवर बहिष्कार टाकणे आवश्यक : सध्या मुले संगणकावर काल्पनिक खेळ
खेळतात. ते खेळ विध्वंसक आणि विकृत विचार निर्माण करणारे असतात, उदा.
विकृत पद्धतीने गाडी चालवणे, कुणालाही बंदुकीने मारणे, एकमेकांना मारणे
इत्यादी.
मित्रांनो,
अशा खेळांतून मुले मनाने दुर्बळ होऊन विकृत होतात. हे खेळ काल्पनिक
असल्याने मुले वास्तवात न जगता कल्पनेच्या विश्वात वावरतात आणि त्यामुळे
मुलांना वास्तव जीवन जगणे कठीण जाते. ती आत्मकेंद्रित बनल्याने ‘मला या
राष्ट्रासाठी जगायचे आहे’, हा व्यापक विचार त्यांच्या मनात येत नाही. अशा
मुलांमध्ये राष्ट्रप्रेमच
निर्माण होत नसल्याने ती मुले राष्ट्राचे रक्षण करतील का ? मित्रांनो, आता
तुम्हीच सांगा की, आपल्याला संगणकावरील खेळ खेळून विकृत व्हायचे कि
छत्रपती शिवरायांसारखे क्षात्रवृत्ती जागृत करून राष्ट्र आणि धर्म
यांच्या रक्षणासाठी सिद्ध व्हायचे ? आता आपण निश्चय करूया की, संगणकावरील
खेळांवर बहिष्कार टाकायचा आणि प्रत्यक्ष खेळ खेळायचा. हीच खरी शिवजयंती
आहे. मग कराल ना ?
गोष्टी वाचणे आणि ऐकणे
उत्तम संस्कार करून घेणे : शिवराय नेहमी राम–कृष्ण
यांच्या गोष्टी वाचत आणि ऐकत. प्रत्यक्ष घडलेल्या आणि ज्यांमधून देवभक्ती,
राष्ट्रप्रेम अन् अन्यायाविरुद्ध चीड निर्माण होईल, अशा गोष्टींचे वाचन
केल्यामुळे त्यांच्यातील राष्ट्रप्रेम जागृत झाले. त्यांनी अन्यायी
मोगलांना पायबंद घातला.
काल्पनिक आणि खोट्या गोष्टींमुळे विकृती बळावणे :
सध्या मुले ‘टॉम अँड जेरी’ यांसारख्या काल्पनिक आणि खोट्या गोष्टी वाचतात
अन् ऐकतात. त्यामुळे मुले कल्पनेच्या जगतात वावरतात. त्यांच्यात
राष्ट्रप्रेम आणि राष्ट्राभिमान असे गुण निर्माण होत नाहीत. पर्यायाने ती
मनाने दुर्बळ होतात.
मुलांनो, मला सांगा की, आपल्याला रामायण,
महाभारत यांमधील वास्तव गोष्टी समजून घेऊन शिवरायांसारखे राष्ट्रप्रेमी
व्हायला आवडेल कि ‘टॉम अँड जेरी’सारख्या काल्पनिक गोष्टी पाहून मनाने
दुर्बळ व्हायला आवडेल ? शिवरायांना सांगूया की, आम्हाला आपल्यासारखे होऊन
आदर्श राज्य घडवायचे आहे, यासाठी आम्ही आजपासून वास्तव गोष्टी ऐकू आणि वाचू.
आई-वडिलांना नमस्कार करणे
उद्धटपणा टाळून विनम्रता जोपासणे : शिवाजी महाराज प्रतिदिन आईला नतमस्तक होऊन नमस्कार
करत. त्यामुळे त्यांच्यात ‘विनम्रता’ हा गुण आपोआपच आला. जिथे नम्रता
असते, तिथेच सरस्वती वास करते; म्हणून त्यांनी अनेक कला आत्मसात केल्या
होत्या.
आपल्याला
शिवरायांसारखे व्हायचे असेल, तर आपण प्रतिदिन आपल्या आई-वडिलांना नमस्कार
करायला हवा. सध्या काही मुले आपल्या आईशी उद्धटपणे बोलतात. त्यामुळे
आपल्यात विनम्रता कशी येणार ? आपण शिवरायांना सांगायला हवे, ‘महाराज, आपले
गुण आम्ही विसरलो. आम्हाला क्षमा करा. आम्ही आजपासून प्रतिदिन आईला नमस्कार
करू आणि आमच्यात ‘नम्रता’ हा गुण आणू.’ मित्रांनो, असे कराल ना ? असे करणे
हीच खरी शिवजयंती आहे.
योग्य आदर्श ठरवणे
राम-कृष्ण यांचा आदर्श ठेवणे : शिवरायांचे
आदर्श होते, राम आणि कृष्ण. मुलांचे जसे आदर्श असतात, तशी मुले घडतात.
आपले आदर्श चांगले असतील, तर आपणसुद्धा तसेच घडू. आपल्या जीवनाचा योग्य
आदर्श ठरवणे फार महत्त्वाचे आहे.
चित्रपटातील नायकांचा आदर्श ठेवणे सर्वथा अयोग्य :
सध्या चित्रपटातील एखादा नायक, उदा. सलमान, शाहरुख, तसेच ब्रुस ली, रॉक
असे मुलांचे आदर्श असतात. मित्रांनो, आदर्शाप्रमाणे ती व्यक्ती घडत असते.
वरील आदर्शांमध्ये कोणता गुण आहे की, जो राष्ट्र आणि समाज यांना हितकर आहे ?
मित्रांनो, हे पडद्यावर खोटे नाटक करतात; पण त्यांचे वास्तवातील वर्तन
आदर्श नसते.
आपण
आपला आदर्श असा ठरवावा की, ज्याच्यात सर्व गुण आहेत. जो जसा बोलतो, तसा
वागतो. मित्रांनो, शिवाजी महाराज असेच होते; म्हणून त्यांनाच आपला आदर्श
म्हणून मानूया.
उपासना
कुलदेवतेची उपासना करणे :
उपासना हा शिवाजी महाराजांच्या जीवनाचा प्राण होता. ते प्रतिदिन आपल्या
कुलदेवतेचा नामजप आणि राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणासाठी प्रार्थना करत.
‘राष्ट्र हेच माझे कुटुंब आहे’, असे शिवराय मानत असल्याने श्री भवानीमातेने
त्यांना तलवार दिली होती.
उपासनेला महत्त्व न देणे : सध्या मुले उपासनेला महत्त्व देत नाहीत. पर्यायाने त्यांच्या जीवनात निर्भयता, आनंद, तसेच मनात व्यापक विचार येत नाहीत. मुले ‘शुभं करोति’ म्हणणे, तसेच नामजपाला बसणे इत्यादी गोष्टी टाळतात. त्या वेळेत कार्टून, विकृत चित्रपट किंवा मालिका पहातात.
उपासनेला
पर्याय नसल्याने आजपासून आपण उपासना करण्याचा निश्चय करूया. तेच शिवाजी
महाराजांना आवडेल आणि खर्या अर्थाने शिवजयंती साजरी केली, असे होईल.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त करावयाची प्रतिज्ञा
अ. मी प्रतिदिन कुलदेवतेचा नामजप करीन आणि ‘माझे राष्ट्र आदर्श व्हावे’, अशी प्रार्थना करीन.
आ. रामायण, महाभारत यांमधील गोष्टी वाचीन.
इ. प्रतिदिन आईला नमस्कार करीन.
ई. छ. शिवाजी महाराजांना आदर्श म्हणून पाहीन.
उ. दूरदर्शनवरील राष्ट्रप्रेम जागृत करणार्या मालिका, उदा. छ. शिवाजी महाराज, झाशीची राणी इत्यादी पाहीन आणि ‘राष्ट्र माझे कुटुंब आहे’, असा विचार करीन.
ऊ. मित्रांना वाढदिवसाची भेट म्हणून शिवरायांचे चित्र देईन.
ए. शिवरायांच्या बालपणीच्या शौर्यकथा वाचीन.
ऐ. स्वसंरक्षणासाठी कराटे किंवा लाठीकाठी यांचे प्रशिक्षण घेईन.
ओ. प्रतिदिन ‘बालसंस्कार डॉट कॉम’ पाहीन.
चला मित्रांनो, खालील गोष्टी टाळूया आणि राष्ट्ररक्षणासाठी सिद्ध होण्याचे छ. शिवाजी महाराजांना वचन देऊया !
अ. मी आईशी उद्धटपणे बोलणार नाही.
आ. इंग्रजांसारखा पेहराव परिधान करणार नाही.
इ. ‘शेकहँड’ करणार नाही.
ई. मी आजपासून कार्टून पहाणार नाही.
उ. संगणकावर विकृत खेळ खेळणार नाही.
मित्रांनो,
आजपासून वरील प्रत्येक कृती आचरणात आणण्याचा आपण प्रयत्न केल्यास खरी
शिवजयंती साजरी केल्याप्रमाणे होईल. हे सर्व कृतीत आणले, तर शिवरायांना
अपेक्षित असे आदर्श राज्य निर्माण होईल.
आमच्या
वास्तव स्थितीची आम्हाला जाणीव करून दिली आणि उपाय सांगितले, यासाठी
ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करूया. ‘हे भवानीमाते, आम्हा सर्वांना हे कृतीत
आणण्याची शक्ती आणि बुद्धी दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना !’
– श्री. राजेंद्र पावसकर (गुरुजी),पनवेल
0 comments:
Post a Comment