पुढील सहा वर्षांत शिवाजी महाराजांनी जहागिरीचा सगळा बंदोबस्त आपल्याकडे घेतला. पुणे, सुपे, इंदापूर, चाकण ही या जहागिरीतील प्रमुख स्थळे. १६५४ च्या सुमारास महाराजांनी पुरंदरचा किल्ला महादजी नीळकंठराव किल्लेदार याच्या मुलांकडून हस्तगत केला आणि पुणे प्रांताची सुरक्षितता मजबूत केली. पुढे महाराजांनी जावळीवर स्वारी केली. सहा महिन्यांच्या या मोहिमेत चंद्रराव मोरे आणि त्यांचे भाऊबंद मारले गेले आणि जावळीचा मुलूख त्यातील रायरीच्या किल्ल्यासकट महाराजांच्या ताब्यात आला (१६५६). विजापूरहून कोकणपट्टीकडे जाणाऱ्या मार्गावरील ही महत्त्वाची ठिकाणे. जावळी खोरे ताब्यात आल्याबरोबर महाराजांनी मोरो त्रिंबक पिंगळे यास प्रतापगड किल्ला बांधून घेण्यास आज्ञा दिली (१६५६). “ राष्ट्राचे संरक्षण दुर्गाकडून, राज्य गेले तरी दुर्ग आपल्याकडे असल्यास राज्य परत मिळविता येते, दुर्ग नसल्यास हातचे राज्य जाते, हे महाराजांचे धोरण. त्यांनी अनेक किल्ले बांधले, अनेकांची डागडुजी केली. प्रतापगडचा किल्ला म्हणजे कोकणच्या वाटेवरचा पहारेकरी. त्यामुळे आदिलशहाचे कोकणातील अधिकारी आणि लहानमोठे जमीनदार या सर्वांनाच मोठा शह बसला. ...
Chhatrapati Shivaji Maharaj photos and history.