राज्यविस्तार

पुढील सहा वर्षांत शिवाजी महाराजांनी जहागिरीचा सगळा बंदोबस्त आपल्याकडे घेतला. पुणे, सुपे, इंदापूर, चाकण ही या जहागिरीतील प्रमुख स्थळे. १६५४ च्या सुमारास महाराजांनी पुरंदरचा किल्ला महादजी नीळकंठराव किल्लेदार याच्या मुलांकडून हस्तगत केला आणि पुणे प्रांताची सुरक्षितता मजबूत केली.
पुढे महाराजांनी जावळीवर स्वारी केली. सहा महिन्यांच्या या मोहिमेत चंद्रराव मोरे आणि त्यांचे भाऊबंद मारले गेले आणि जावळीचा मुलूख त्यातील रायरीच्या किल्ल्यासकट महाराजांच्या ताब्यात आला (१६५६). विजापूरहून कोकणपट्टीकडे जाणाऱ्या मार्गावरील ही महत्त्वाची ठिकाणे. जावळी खोरे ताब्यात आल्याबरोबर महाराजांनी मोरो त्रिंबक पिंगळे यास प्रतापगड किल्ला बांधून घेण्यास आज्ञा दिली (१६५६).
राष्ट्राचे संरक्षण दुर्गाकडून, राज्य गेले तरी दुर्ग आपल्याकडे असल्यास राज्य परत मिळविता येते, दुर्ग नसल्यास हातचे राज्य जाते, हे महाराजांचे धोरण. त्यांनी अनेक किल्ले बांधले, अनेकांची डागडुजी केली. प्रतापगडचा किल्ला म्हणजे कोकणच्या वाटेवरचा पहारेकरी. त्यामुळे आदिलशहाचे कोकणातील अधिकारी आणि लहानमोठे जमीनदार या सर्वांनाच मोठा शह बसला. तसेच विजापूरशी संपर्कही कमी होऊ लागला. पोर्तुगीज अंमलाखाली असलेला ठाणे, वसई हा भाग वगळता जव्हारपासून गोव्यापर्यंतचा बहुतेक कोकण प्रदेश विजापूरच्या आदिलशाहीकडे होता.
मुहंमद आदिलशहाच्या मृत्युनंतर (४ नोव्हेंबर १६५६) त्याचा मुलगा दुसरा अली आदिलशहा गादीवर आला. तो औरस पुत्र नाही किंवा त्याचे कुल अज्ञात आहे, अशी सबब पुढे करून मोगलांच्या सैन्याने विजापूरच्या ईशान्येकडील कल्याणी आणि बीदर ही स्थळे काबीज केली (१६५७). शिवाजी महाराजांनीही मोगलांचे जुन्नर शहर लुटले आणि अहमदनगरच्या पेठेवर हल्ला केला. ही धावपळीची लढाई चालू असतानाच महाराजांनी औरंगजेबाशी संपर्क ठेवला होता. विजापुरातील बदलती परिस्थिती लक्षात घेऊन कोकणात आपल्या पदरात काय पडेल, ते मोगलांकडून मिळवावे, असा विचार महाराजांनी केला होता. विजापूरशी लवकर तह करावा, अशी मोगल बादशहा शाहजहानने आज्ञा केली.
१६५७ मध्ये मोगलांनी घेतलेले बीदर, कल्याणी हे प्रदेश आपल्याकडे ठेवून घ्यावेत, मागच्या तहात मोगलांनी दिलेले कल्याण, भिवंडी आणि पुणे प्रांत हे विजापूरने परत करावेत, शिवाय खंडणी देत जावी, या अटींवर हे युद्ध संपले. या सुमारास शाहजहान हा अतिशय आजारी पडला (१६५७). हे वृत्त विजापूरलाही कळले होते. त्यामुळे विजापूरने हा तह संपूर्णपणे पाळण्यास टाळाटाळ केली. शाहजहानचा आजार आणि औरंगजेबाचे उत्तरेकडे लागलेले लक्ष, हे पाहून महाराजांनी सरळ कल्याण व भिवंडी ही स्थळे हस्तगत केली (२४ ऑक्टोबर १६५७).
पुढे १६५८ मध्ये माहुलीचा किल्लाही काबीज केला. नंतर औरंगजेबाकडे आपला दूत पाठवून त्याच्याशी सलोख्याचे बोलणे सुरू केले. मोगल मुलुखावर आपण हल्ला करीत नाही; पण कोकणातील आपले हक्क सुरक्षित ठेवावेत, म्हणून मी हे करीत आहे, असे त्यास कळविले. फेब्रुवारी १६५८ मध्ये औरंगजेब औरंगाबादेहून आगऱ्याकडे जाण्यास निघाला आणि २१ जुलै १६५८ मध्ये तो दिल्लीच्या तख्तावर बसला.
SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment