Skip to main content

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपति शिवाजी

(१९ फेब्रुबारी १६३० – ३ एप्रिल १६८०). महाराष्ट्रातील मराठ्यांच्या राज्याचे संस्थापक आणि पहिले अभिषिक्त छत्रपती. त्यांचा जन्म मराठवाड्यातील भोसले या वतनदार घराण्यातील मालोजींचे पुत्र शहाजी आणि सिंदखेडकर जाधवराव यांच्या कन्या जिजाबाई या दांपत्यापोटी ⇨शिवनेरी किल्ल्यावर (जुन्नर तालुका – पुणे जिल्हा) झाला. त्यांच्या जन्म-तिथीविषयी एकमत नाही. मराठी बखरींच्या आधारावरून त्यांचा जन्म १६२७ मध्ये झाला; पण जेधे शकावली, कवींद्र परमानंद याचे शिवभारत आणि राजस्थानात उपलब्ध झालेल्या जन्मपत्रिका, या विश्वसनीय साधनांवरून फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ म्हणजे १९ फेब्रुवारी १६३० ही तारीख बहुतेक इतिहाससंशोधकांनी आणि आता महाराष्ट्र शासनानेही निश्चित केली आहे.
शिवाजी महाराजांचे पूर्वज चितोडच्या सिसोदिया घराण्यातील होते, अशी लौकिक समजूत आहे. हे घराणे दक्षिणेतील होयसळ वंशातील आहे, असेही संशोधन पुढे आले आहे. मालोजी हे या घराण्यातील पहिले कर्तबगार पुरुष. त्यांना शहाजी व शरीफजी असे दोन मुलगे होते. मालोजी हे निजामशाहीतील एक कर्तबगार सरदार होते. मालोजी व त्यांचे बंधू विठोजी यांच्याकडे औरंगाबादजवळचे वेरुळ, कन्नड व देऱ्हाडी (देरडा) हे परगणे मुकासा (जहागीर) म्हणून होते. शहाजी पाच वर्षांचे असताना मालोजी मरण पावले. त्यांच्या नावाची जहागीर शहाजींच्या नावाने राहिली. निजामशाहीच्या दरबारातील खंडागळेच्या हत्तीच्या प्रकरणावरून शहाजी व लखूजी जाधव यांच्यात वितुष्ट आले, ते पुढे कायम राहिले. शहाजींनी १६२० पासून निजामशाहीच्या बाजूने आदिलशाहीविरुध्द लढण्यास सुरुवात केली होती; पण १६२४ मध्ये भातवडीच्या लढाईत पराक्रम करूनही त्यांचा सन्मान झाला नाही, म्हणून ते आदिलशाहीस मिळाले; पण इब्राहिम आदिलशहाच्या मृत्युनंतर ते पुन्हा निजामशाहीत आले.
निजामशाहीतील दरबारी कारस्थानात शहाजींचे सासरे लखूजी जाधव मारले गेले (१६२९). त्यामुळे नाराज होऊन त्यांनी निजामशाहीची नोकरी सोडली. त्या सुमारास त्यांचा मोठा मुलगा संभाजी यांचा विवाह शिवनेरीचा किल्लेदार विश्वासराव यांच्या मुलीशी झाला होता. त्या निमित्ताने शहाजींनी जिजाबाईस शिवनेरीवर ठेवले होते. विजापूर सोडून गेल्यामुळे मुहंमद आदिलशहा (कार. १६२७५६) हा शहाजींवर रुष्ट झाला होता. आदिलशाही विरुध्द गेलेली आणि लखुजींच्या मृत्युमुळे निजामशाही सुटलेली अशा अवस्थेत शहाजींना परागंदा होण्याची वेळ आली. अखेर आदिलशहाच्या बोलावण्यावरून ते १६३६ मध्ये त्याच्या नोकरीत शिरले. आदिलशहाने त्यांच्याकडे पुण्याची जहागीर बहाल केली व मोठा हुद्दा देऊन कर्नाटकाच्या मोहिमेवर पाठविले. विजापूरच्या सैन्याने १६३८ च्या अखेरीस बंगलोर काबीज केले. तेव्हा बंगलोर, कोलार इ. प्रदेशांची जहागीर शहाजींना मिळाली आणि ते बंगलोर येथे कायमचे राहू लागले.
बालपण शिक्षण -

Comments

Popular posts from this blog

शिवरायांच्या इतिहासातील कुप्रसिद्ध रांझ्याच्या पाटलाचं गाव.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केलीकी महाराजांसोबत औरंगजेब, शाहिस्तेखान आणि अफजलखान व अनेक स्वराज्याचे शत्रू पक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात ,त्यात अजून एक नाव म्हणजे 'रांझे गावचा पाटील'. रांझे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत बदअमल केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्या वर खटला चालवून चौरंग केला. (चौरंग करणे म्हणजे हात पाय कलम करणे). या संदर्भाचे २८ जानेवारी १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले. महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मनाला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे, व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड-शिवापूर गावा पासून अवघ्या ३ की.मी. वर असलेले सह्याद्रीच्या कुशीतील छोटंसं रांझे गाव. रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते. मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते.मंदिरात...

मिर्झा राजा जयसिंह आणि पुरंदरचा तह

औरंगजेबाने मुरब्बी व विश्वासू सेनापती मिर्झा राजा जयसिंह याची दक्षिणेत नेमणूक केली. शिवाजी महाराज त्यावेळी बिदनूर राज्यातील बसरुरच्या स्वारीवर गेले होते. त्यांनी हे समृध्द बंदर लुटले (फेब्रुवारी १६६५). परतताना गोकर्ण महाबळेश्वर, कारवार येथून ते दक्षिण कोकणात आले असताना जयसिंह हा मोठ्या सैन्यानिशी पुण्यात पोहोचला आहे (३ मार्च १६६५ रोजी), अशी बातमी त्यांना लागली. जयसिंहाने महाराजांची पूर्णपणे नाकेबंदी करण्याचे धोरण आखले. मोहिमेची सूत्रे संपूर्णपणे आपल्या हाती ठेवली. यात कुणाकडूनही हस्तक्षेप होऊ नये, अशी त्याने औरंगजेबाला अट घातली. शिवाय किल्ले आणि किल्लेदार यांजवर आपले नियंत्रण राहावे आणि माणसे फोडण्यासाठी व मोहिमेसाठी लागणारा पैसा सुभ्याच्या खजिन्यातून काढण्याची परवानगी असावी, या अटी जयसिंहाने बादशहाकडून मान्य करून घेतल्या. जयसिंहाच्या मोहिमेविषयीचा फार्सी पत्रव्यवहार उपलब्ध आहे. त्यातून तत्कालीन घटनांचे तपशीलवार उल्लेख आढळतात. महाराजांचा मैदानी प्रदेश मोगलांच्या ताब्यात होता. मोगलांनी कल्याण-भिवंडीपासून पुरंदरपर्यंत सीमेवर चौक्या आणि ठाणी बसविली होती. जयसिंहाने ठिकठिकाणी प्रबळ लष्कर...

रामदास-शिवाजी संबंध

शिवाजी महाराजांच्या हाती सातारा-चाफळ १६७३ मध्ये पडले. त्यानंतर महाराजांनी चाफळच्या राममंदिराची सर्व व्यवस्था केली आणि परळी (सज्जनगड) हे समर्थ रामदासांचे वास्तव्य ठिकाण ठरवून त्यांच्यासाठी मठ बांधून दिला. शिवाजी महाराजांना समर्थांविषयी पूज्यभाव होता; तथापि महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या कामात समर्थांचा प्रत्यक्ष संबंध किती होता, हे दाखविणारा पुरावा मिळत नाही. शिवराय-समर्थ भेट ही प्रथम राज्याभिषेकाच्या अवघी दोन वर्षे आधी म्हणजे १६७२ मध्ये झाली, असे पत्रव्यवहारावरून दिसते. शिवाजीराजांनी चाफळला दिलेल्या इनामाचे साल लक्षात घेता, हे दोन्ही थोर पुरुष परस्परांना ओळखत असावेत, हे निश्चित आहे. [ ⟶ रामदास].