Skip to main content

शिवचरित्रमाला भाग १

*अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं!*
उदात्त आणि उत्कट महत्वाकांक्षी
गरुडझेपेपुढे आकाशही ठेंगणं ठरलेलं
इतिहासानं पाहिलं। साडेतीनशे
वर्षांपूवीर् या मराठी मातीवर नांगराला
गाढवं जुंपून तो इथं फिरवला। आदिलशाही
फौजा घोडे उधळीत चारही वेशींवरून
पुण्यात घुसल्या. घरंदारं पेटली. किंकाळ्या
उठल्या , सैरावैरा धावणाऱ्यांची प्रेतं
पडली. शाही फौजांनी पुण्याचा कसबा
बेचिराख केला. फुटक्या कवड्या आणि
तुटक्या वहाणांची तोरणं लटकवून अन् एक
भली मोठी लोखंडी पहार भर रस्त्यात
ठोकून शाही फौजा विजापुरास
परतल्या. उरलं कुत्र्यांचं रडणं अन् घारी ,
गिधाडांचं आभाळात भिरभिरणं. पुण्याचं
स्मशान झालं. अशी सहा वर्षं लोटली.
शहाजीराजे भोसल्यांच्या पुणे
जहागिरीचा उकिरडा झाला आणि सहा
वर्षांनंतर पुण्यात शहाजीराजांची राणी
आणि मुलगा मावळी घोडेस्वारांच्या
तुकडीनिशी प्रवेशले. (इ. स. १६ 3 ७ , बहुदा
उन्हाळ्यात) पुणं भकासच होतं. दहा-पाच
घरं जीव धरून जगत होती.
पुण्याची ही मसणावट झालेली पाहून
आऊसाहेबांचं काळीज करपलं। पुण्याच्या
मालकिणीला राहण्यापुरतीही स्वत:ची
ओसरी उरली नव्हती. झांबरे पाटलांच्या
वाड्यांच्या वळचणीला या
राजगृहिणीला बिऱ्हाड थाटावं लागलं.
पण त्या क्षणालाच जिजाऊसाहेबांच्या
व्याकुळ काळजातून अबोल संकल्प उमलू
लागले. या पुण्याचं आणि परगण्याचं रूपांतर
आम्ही करू!
चार दिस , चार रात्री उलटल्या आणि
आऊसाहेबांनी सण साजरा करावा तशी
पहिली ओंजळ वाहिली , ती पुण्यातल्या
मोडून-तोडून गेलेल्या कसबा गणपतीच्या
देवळात। पहिला जीणोर्द्धार सुरू झाला ,
तो या गणेशाच्या मंदिरापासून.
पुण्यातली भाजून पोळून निघालेली आठ
घरं अन् बारा दारं किलकिली झाली.
त्यांची आशा पालवली. घरातली माणसं
रस्त्यावर आली. कसबा गणपती
दुर्वाफुलांनी प्रथमच इतका सजला-
पुजलेला पाहून आयाबायांना नक्कीच असं
वाटलं की , ही मायलेकरं म्हणजे
गौरीगणपतीच पुण्यात आले.
जिजाऊसाहेबांनी आज्ञा करावी अन्
सर्वांनी हौसेनं ती झेलावी , असा
भोंडला पुण्यात सुरू झाला। पुणं पुन्हा सजू
लागलं. आऊसाहेबांच्या खास नजरेखाली
एकेक नवानवा सजवणुकीचा डाव मुठेच्या
वाहत्या काठावर रंगू लागला. पुण्यातली
लोखंडी शाही पहार केव्हाच उखडली
गेली आणि एक दिवस हलगी-ताशांच्या
कडकडाटात नांगराने बैल सजले. नांगर
जुंपण्यात आला. नांगराला फाळ लावला
होता , सोन्याचा. खरं खरं सोनं
बावनकशी. आणि पुण्याच्या भुईवर
सोन्याचा नांगर पाचपन्नास पावलं
नांगरण्यासाठी फिरला. याच भुईवर सहा
वर्षांपूवीर् विजापूरच्या वजीर
खवासखानाच्या हुकुमानं गाढव जुंपलेला
नांगर फिरला होता. तरुणांच्या
महत्वाकांक्षा जणू ढोल-लेझिमीच्या
तालावर सहा वर्षांच्या शिवबाच्या
आणि आऊसाहेबांच्या सोन्याच्या
नांगराभोवती फेर धरून उसळत नाचत
होत्या. ती सुखावलेली मराठी जमीन जणू
म्हणत होती , ‘ पोरांनो मनांत आणा ,
तुम्ही वाट्टेल ते करू शकाल. या मातीत मन
मिसळलंत की , मोती पिकतील ‘.
अन् खरंच पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू
लागलं। माणसं आपण होऊन कामाला
लागली. बारा बलुतेदार अन् गावकामगार
स्वत:चा संसार सजवावा तसं घाम गाळीत
काम करू लागले. न्यायनिवाडे करायला
स्वत: आऊसाहेब जातीनं सदरेवर बसू
लागल्या. न्याय अगदी समतोल. तराजूच्या
काट्यावर माशीही बसत नव्हती.
आऊसाहेबांनी या काळात दिलेल्या
न्यायनिवाड्याचे दस्तऐवज गवसलेत!
पुण्याच्या पर्वती गावालगतचा आंबिल
ओढा फारच बंडखोर। पावसाळ्यात असा
तुफान भरून वाहायचा की ,
अवतीभवतीची शेती अन् झोपड्या , खोपटं
पार धुवून घेऊन जायचा। हे दुखणं पुण्याला
कायमचंच होतं. आऊसाहेबांनी
पर्वतीच्याजवळ (सध्याच्या स्वातंत्र्यवीर
सावरकर पुतळ्याच्या पश्चिमेस) या
ओढ्याला बांध घातला. चिरेबंदी , चांगला
सहा हात रुंद , सत्तर हात लांब अन् पंचवीस
हात उंच. आंबोली ओढ्याचा प्रवाह
कात्रजच्या घाटातून थेट उत्तरेला पुणे
शहराला खेटून नदीला मिळत असे. हा
प्रवाह या बांधामुळे वळवून घेऊन पश्चिमेकडे
( सध्याच्या दांडेकर पुलाखालून) मुठा
नदीत सोडण्यात आला.
पुण्याच्या अवतीभवती सगळे मावळी
डोंगर। जंगल अफाट। गेल्या सहा वर्षांत
वाघांचा , बिबट्यांचा अन् लांडग्या-
कोल्हांचा धुमाकूळ बादशाही
सरदारांच्यापेक्षाही थैमान घालीत
होता. ही रानटी जनावरं मारून काढून
शेतकऱ्यांना निर्धास्त करायची फार गरज
होती. आऊसाहेबांच्या लालमहालानं
लोकांकरवी ही कामगिरी करवून घेतली.
रानटी जनावरांचा धुमाकूळ थांबला.
पण प्रतिष्ठित गावगंडांचा धुमाकूळ
थांबविणं जरा अवघडच होतं.
आऊसाहेबांच्याच हुकुमानं कृष्णाजी नाईक
, फुलजी नाईक , बाबाजी नाईक पाटील ,
इत्यादी दांडग्यांना जबर शिक्षा करून
जरबेत आणलं , कुणाकुणाचे हातपायच
तोडले. काय करावं ? प्रत्येकाला कुठे अन्
किती शहाणं करीत बसावं ? तोही
मूर्खपणाचं ठरतो. लालमहालातील
मायलेकारांची स्वप्न आणि आकांक्षा
गगनाला गवसण्या घालीत होत्या....!!

Comments

Popular posts from this blog

५. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ब्राह्मणांचे स्थान !

‘काही वर्षांपूर्वी जेम्स लेन नावाच्या पाश्‍चात्त्य लेखकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राविषयी एक आक्षेपार्ह पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे कलह निर्माण झाला आणि ब्राह्मण समाजाला टीकेचे लक्ष्य करण्यात आले. अलीकडेच पुण्यात जात्यंध मराठा संघटनांनी ब्राह्मणद्वेषाचा कळस गाठून लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मध्यरात्री हटवण्याचे दुष्कृत्य केले. ‘छत्रपतींच्या जीवनात ब्राह्मणांचे कोणते स्थान होते’, हे जर ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पाहिले, तर ‘छत्रपतींच्या नावाचा वापर करून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद वाढवणे’, ही ‘महाराजांची क्रूर थट्टा आहे’, ही गोष्ट लक्षात येईल ! या सूत्राच्या पुष्ठ्यर्थ ‘अखिल भारतीय मराठा विकास परिषदे’ने प्रकाशित केलेल्या ‘समाज जागृती पुस्तिके’तील निवडक लिखाण पुढे दिले आहे. कधी नव्हे एवढी आज हिंदुऐक्याची आवश्यकता निर्माण झाली असतांना हिंदु जातीजातींत विभागणे उचित ठरणार नाही, यासाठी लेख प्रसिद्ध करत आहोत. १. छत्रपतींच्या गुणांचे त्यांच्या हयातीत वर्णन करणारे पहिले तीन कवी ब्राह्मणच ! अ. ‘छत्रपती शिवाजी महाराज हयात असतांना त्यांच्या गुणांचे मुक्त...

छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती आणि शेतकऱ्यांविषयीचे धोरण.

(लेखात शिवाजी महाराजांचे अस्सल पत्र दिलेले आहे. सर्वांनी वाचावे हि आग्रहाची विनंती.) शिवाजी महाराजांनी जमिनीची पहिल्यांदा मोजणी आणि प्रतबंदी केली. प्रचितगड, राजापूर, रायगड, सुवर्णदुर्ग, अंजनवेल रत्नागिरी आणि विजयदुर्ग ह्या भागांतील प्रत्येकी दोन गावे निवडून तेथील उत्पन्नाचा तीन वर्षांचा अंदाज शिवाजी महाराजांनी काढला. मिळालेल्या माहितीच्या आधारावर महाराजांनी धाऱ्याचे दर निश्चित केले. धाऱ्यापैकी निम्मा हिस्सा महाराज धान्यरूपाने घेत आणि निम्मा हिस्सा पैश्याच्या रूपाने घेत. ज्या ज्या तालुक्यांत धान्याचा जो भाव असेल तो भाव जमेस धरून त्याच्या आधारे रोकड साऱ्याची आकारणी महाराज करीत असत. भात आणि ताग यांचे जमिनीचे १२ वर्ग पाडण्यात आले होते. अव्वल हि पहिली प्रत, दुय्यम हि दुसरी, सिम हि तिसरी, आणि चार सिम हि चौथी प्रत. पहिल्या प्रतीचे १२ मन, दुसऱ्या प्रतीचे १० मन, तिसऱ्या प्रतीचे ८ मन, आणि चौथ्या प्रतीचे साडेसहा मन. ( सोळा पायल्या = एक मण आणि वीस मनाचे - एक खंडी) वाचकांस बाकीच्या प्रतींची माहिती असावी म्हणून फक्त नावे सांगतो. ५. राउपल- झुडपांची जमीन, ६. खारवट- समुद्र व नदीच्या...

शिवरायांच्या इतिहासातील कुप्रसिद्ध रांझ्याच्या पाटलाचं गाव.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केलीकी महाराजांसोबत औरंगजेब, शाहिस्तेखान आणि अफजलखान व अनेक स्वराज्याचे शत्रू पक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात ,त्यात अजून एक नाव म्हणजे 'रांझे गावचा पाटील'. रांझे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत बदअमल केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्या वर खटला चालवून चौरंग केला. (चौरंग करणे म्हणजे हात पाय कलम करणे). या संदर्भाचे २८ जानेवारी १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले. महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मनाला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे, व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड-शिवापूर गावा पासून अवघ्या ३ की.मी. वर असलेले सह्याद्रीच्या कुशीतील छोटंसं रांझे गाव. रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते. मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते.मंदिरात...