Skip to main content

शिवचरित्रमाला भाग २

संजीवनी लाभू लागली…
आदिलशहाने पुणे परगण्याची जहागिरी शहाजीराजांच्या नावाने दिली होती. शहाजीराजांना दक्षिण कर्नाटकातही आदिलशहाने जहागिरी दिली आणि त्यांची रवानगी दक्षिणेकडे केली. त्याचवेळी शहाजीराजांनी पुणे जहागिरीचा सर्व कारभार ‘ शिवाजीराजे यांसी अर्जानी मोकास ‘ दिला. शिवाजीराजे पुणे जहागिरीचे पोटमोकासदार झाले. म्हणजेच प्रत्यक्ष कारभार जरी शिवाजीराजांच्या नावाने झाला , तरी वडीलकीच्या नात्यानं तो कारभार जिजाऊसाहेब पाहू लागल्या. त्यांची मायाममता मोठी. जरबही मोठी. स्वप्नही मोठे. जी माणसं कारभार पाहण्याकरता म्हणून पुणे जहागिरीकडे शहाजीराजांनी नेमून दिली तीही फार मोठ्या योग्यतेची दिली.
शिस्तीनं , काटेकोरपणे हुकुमांत वागणारी. कारभार चोख करणारी. निष्ठावंत आणि प्रामाणिक. अशी माणसं असली की , उत्कर्षच होत असतो. मग ते छोटे संसार असोत की मोठी साम्राज्ये असोत. उत्तम अनुशासन ही हुकमी शक्तीच असते. पुण्याच्या जहागिरीचा कारभार पाहणारे सगळेच कारभारी अनुभवी , भारदस्त , वयानेही बहुतेक साठी-सत्तरी ओलांडलेले. बाजी पासलकर , दादोजी कोंडदेव , गोमाजी नाईक , पानसंबळ नूरखानबेग , बंकीराव गायकवाड , येसबा दाभाडे , नारोपंत मुजुमदार आणि असेच तजरुबेकार आणखी काही. ‘ ज्यास जे काम सांगितले , ते त्याने चोख करावे ‘ ऐश्या ताकदीचे आणि युक्तीबुद्धीच्या ऐपतीचे हे सारे होते.
जिजाऊसाहेबांची तडफ वेगळीच होती. कर्तबगारीचे आणि समतोल न्यायबुद्धीचे संस्कार त्यांच्यावर नेमके कुणी केले ? इतिहासाला त्यांची नावे माहीत नाहीत. पण कथा कीर्तनातील पौराणिक स्त्रियांची चरित्रं सर्वांप्रमाणे त्यांच्याही मनावर नक्कीच संस्कार करीत होती. प्रत्यक्ष नजिकच्या काळात शाही घराण्यात कर्तृत्व गाजविलेल्या स्त्रियांची एकेक हकीकत जुन्या लोकांकडून त्यांच्याही कानांवर जात असणारच. आदिलशाहीतील बेगम बबुवाजीखानम , अहमदनगरची शाहजादी चाँदबिब्बी अन् त्यापेक्षाही प्रत्यक्ष भेटणाऱ्या मावळमुलुखातील कितीतरी मराठ्यांच्या लेकीसुना त्यांना दिसत होत्या ना ! कारीच्या कान्होजी जेध्यांची आई अनसाऊ जेधे ही त्यातलीच.
आसवलीच्या ढमाळपाटलांची आई रुपाऊ अन् अशा अनेक कितीजणी यमदूतांच्या नजरेला नजर भिडवून जगत आलेल्या बायका आऊसाहेबांना दिसत होत्या. आपणहून माणसांनी शिकायचं असतं ते हेच! असंच. मराठी रक्तात जन्मता:च असणार शौर्य आणि धैर्य आऊसाहेबांच्या रक्तात होत. एका बखरकारांनी लिहून ठेवलंय की , ‘ जिजाऊ सारखे कन्यारत्न ईश्वरानेच निर्माण केले ‘ कितीही कठीण संकटं पुढं आली , तरी तिळमात्रही न डगमगता धैर्यानं तोंड देणारी होती ही मराठ्याची मुलगी. आऊसाहेबांना आपला शिवबा उदात्त , उत्कट आणि उत्तुंग यशाचा मानकरी करायचा होता. याचं द्योतक म्हणजे शिवाजीराजांची तयार झालेली राजमुदा.
प्रतिश्चंदालेखे वधिर्र्ष्णुविश्ववंदिता साहसूनो शिवस्येषा मुदा भदाय राजते
केवढा उत्तुंग आणि उदात्त ध्येयवाद सांगितलाय या राजमुदेत! सदैव प्रतिपदेच्या चंदासारखी विकसित होत जाणारी ही शिवमुदा विश्वाला वंद्य आणि लोककल्याणकारी ठरो. संजीवनी नावाचा एक विलक्षण मंत्र विश्वाच्या कल्याणासाठी कचाने मिळविला म्हणे! तोच हा मंत्र असेल का ? शिवाजीराजांच्या आज्ञापत्रांवर हाच मंत्र राजमुदा म्हणून झळकू लागला आणि शिवाजीराजांचा वावर सुरू झाला. मावळातल्या शेतकरी सवंगड्यात कुणी मराठा , कुणी माळी , कुणी साळी , कुणी तेली , कुणी रामोशी , कुणी महार , कुणी धनगर , कुणी ब्राह्माण तर कुणी मुसलमानही. अन् आदिलशहाच्या कानाशी कुजबुजत तक्रारी जाऊ लागल्या की , हा शहाजीराजाचा पोरगा हलक्या लोकांच्यात वावरतो. मुहम्मद आदिलशहाने ही कुजबुज हसण्यावारी नेली. त्याचा विश्वासच बसेना की , शहाजीराजाचा एवढासा पोरगा मावळी डोंगरात बंड पुकारील! या आदिलशाही विरुद्ध ? कसं शक्य आहे ? पण ते सत्य होतं. खरोखरच बंडाची राजकारणं शिवबाच्या डोक्यात घुमत होती.
पण खरंच शक्य होतं का ? अशक्यच होतं. शिवाजीराजांच्या समोर केवळ आदिलशाही होती का ? नाही. दीडदोन लाखाची फौज सहज उभी करू शकणाऱ्या आदिलशहाशिवाय पलीकडे गोवळकोंड्याचा कुतुबशहाही होता. भीमा नदीच्या उत्तरेला भीमेपासून थेट हिमालयापर्यंत प्रचंड साम्राज्य आपल्या तळहातावर नाचवणारा मुघल बादशहा शाहजहान दिल्लीत होता. कोकणच्या किनाऱ्यावर खाली पोर्तुगीज होते. वर जंजिऱ्याचा सिद्दी होता. अन् शिवाय इथल्या कुठल्याही चांगल्या कामाल कडाडून विरोध करीत या सर्व शत्रूंना मदत करणारे आमचे लोकही होतेच.
एवढ्या मोठ्या बळाला तोंड देण्याइतका शिवाजीराजांपाशी काय होतं ? सैन्य ? तोफखाना ? आरमार ? खजिना ? काहीच नव्हतं. पण या सर्वांहुनही एक बलाढ्य गोष्ट त्यांच्या काळजांत होती. कोणती ? आत्मविश्वास! कठोर ध्येयनिष्ठा! अन् नितांत श्रद्धा! अंधश्रद्धा नव्हे. भाबडी अश्रद्धाही नव्हे. बुध्दीनिष्ठ श्रद्धा. अभ्यासपूर्ण श्रद्धा. अन् याच भावनांनी भारावलेली मावळी भावंडे. अशाच असंख्य भावंडांना ते हाका मारीत होते. न बोलत्या शद्बांत. कारण त्यांचे शद्ब इतिहासाच्या कागदपत्रांवर फारसे उमटलेच नाहीत. पण ते नक्की एकेकाला बोलावत होते. त्यांचा एकेक शब्द मंतरलेला होता. महाराजांचं मनुष्यबळ बोटं मोजावीत इतक्याच मोजमापात वाढत होतं. शत्रू परातभर होता. मावळे चिमूटभर होते. पण वडिलांनी वापरलेला अन् सह्यादीने शिकवलेला एक महामंत्र महाराजांच्या मस्तकात सदैव जागा होता. कोणता ? गनिमी कावा!
शत्रूच्या जास्तीत जास्त फौजेचा आपल्या कमीतकमी फौजेनिशी आणि कमीत कमी युद्धसाहित्यानिशी , कमीतकमी वेळांत पूर्ण पराभव करण्याची शक्ती होती या गनिमी काव्यात।
-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

Comments

Popular posts from this blog

५. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ब्राह्मणांचे स्थान !

‘काही वर्षांपूर्वी जेम्स लेन नावाच्या पाश्‍चात्त्य लेखकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राविषयी एक आक्षेपार्ह पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे कलह निर्माण झाला आणि ब्राह्मण समाजाला टीकेचे लक्ष्य करण्यात आले. अलीकडेच पुण्यात जात्यंध मराठा संघटनांनी ब्राह्मणद्वेषाचा कळस गाठून लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मध्यरात्री हटवण्याचे दुष्कृत्य केले. ‘छत्रपतींच्या जीवनात ब्राह्मणांचे कोणते स्थान होते’, हे जर ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पाहिले, तर ‘छत्रपतींच्या नावाचा वापर करून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद वाढवणे’, ही ‘महाराजांची क्रूर थट्टा आहे’, ही गोष्ट लक्षात येईल ! या सूत्राच्या पुष्ठ्यर्थ ‘अखिल भारतीय मराठा विकास परिषदे’ने प्रकाशित केलेल्या ‘समाज जागृती पुस्तिके’तील निवडक लिखाण पुढे दिले आहे. कधी नव्हे एवढी आज हिंदुऐक्याची आवश्यकता निर्माण झाली असतांना हिंदु जातीजातींत विभागणे उचित ठरणार नाही, यासाठी लेख प्रसिद्ध करत आहोत. १. छत्रपतींच्या गुणांचे त्यांच्या हयातीत वर्णन करणारे पहिले तीन कवी ब्राह्मणच ! अ. ‘छत्रपती शिवाजी महाराज हयात असतांना त्यांच्या गुणांचे मुक्त...

छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती आणि शेतकऱ्यांविषयीचे धोरण.

(लेखात शिवाजी महाराजांचे अस्सल पत्र दिलेले आहे. सर्वांनी वाचावे हि आग्रहाची विनंती.) शिवाजी महाराजांनी जमिनीची पहिल्यांदा मोजणी आणि प्रतबंदी केली. प्रचितगड, राजापूर, रायगड, सुवर्णदुर्ग, अंजनवेल रत्नागिरी आणि विजयदुर्ग ह्या भागांतील प्रत्येकी दोन गावे निवडून तेथील उत्पन्नाचा तीन वर्षांचा अंदाज शिवाजी महाराजांनी काढला. मिळालेल्या माहितीच्या आधारावर महाराजांनी धाऱ्याचे दर निश्चित केले. धाऱ्यापैकी निम्मा हिस्सा महाराज धान्यरूपाने घेत आणि निम्मा हिस्सा पैश्याच्या रूपाने घेत. ज्या ज्या तालुक्यांत धान्याचा जो भाव असेल तो भाव जमेस धरून त्याच्या आधारे रोकड साऱ्याची आकारणी महाराज करीत असत. भात आणि ताग यांचे जमिनीचे १२ वर्ग पाडण्यात आले होते. अव्वल हि पहिली प्रत, दुय्यम हि दुसरी, सिम हि तिसरी, आणि चार सिम हि चौथी प्रत. पहिल्या प्रतीचे १२ मन, दुसऱ्या प्रतीचे १० मन, तिसऱ्या प्रतीचे ८ मन, आणि चौथ्या प्रतीचे साडेसहा मन. ( सोळा पायल्या = एक मण आणि वीस मनाचे - एक खंडी) वाचकांस बाकीच्या प्रतींची माहिती असावी म्हणून फक्त नावे सांगतो. ५. राउपल- झुडपांची जमीन, ६. खारवट- समुद्र व नदीच्या...

शिवरायांच्या इतिहासातील कुप्रसिद्ध रांझ्याच्या पाटलाचं गाव.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केलीकी महाराजांसोबत औरंगजेब, शाहिस्तेखान आणि अफजलखान व अनेक स्वराज्याचे शत्रू पक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात ,त्यात अजून एक नाव म्हणजे 'रांझे गावचा पाटील'. रांझे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत बदअमल केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्या वर खटला चालवून चौरंग केला. (चौरंग करणे म्हणजे हात पाय कलम करणे). या संदर्भाचे २८ जानेवारी १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले. महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मनाला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे, व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड-शिवापूर गावा पासून अवघ्या ३ की.मी. वर असलेले सह्याद्रीच्या कुशीतील छोटंसं रांझे गाव. रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते. मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते.मंदिरात...