ते हत्ती असतील तर तुम्ही सिंह

ते हत्ती असतील तर तुम्ही सिंह
मध्ययुगीन कालखंडात संपूर्ण भारत देश परकीय आक्रमणाने होरपळून निघालेला असताना महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजा छत्रसाल यांनी दिलेल्या एकाकी झुंजीमुळे त्यांचे नाव अजरामर झालेले आहे.औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूपुढे उत्तर भारतातील बहुतांश राजांनी लोटांगण घातले असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या लढ्यामुळे औरंगजेबाचा सेवक असलेल्या राजा छत्रसालला त्याचे आश्चर्य वाटले. महाराजांचा आदर्श घेऊन राजा छत्रसालने मोगलांविरोधात बंडाचा झेंडा उभा करून बुंदेलखंडात स्वत:चे राज्य निर्माण केले.
छत्रसालच्या स्वराज्य उभारणीमागे राजांची प्रेरणा व संघर्ष या दोन्ही गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत.
उत्तर भारतातील बुंदेलखंडचा परिसर म्हणजे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि माळव्याचा ३००० चौ. मैलचा भाग या साम्राज्यात मोडत होता. चंबळ, यमुना, नर्मदा, टोंस केन, धसाळ, पार्वती, सिंधू, बेतवा, जामनेर या १० नद्यांचा प्रदेश म्हणजे बुंदेलखंड देवीपुढे आपले शिर कलम करून तिच्या आशीर्वादाने जे राज्य निर्माण केले त्याला बुंदेलखंड म्हटले जाते. या वेळी देवीच्या चरणावर जे बूंद म्हणजे थेंब पडले त्याला बुंदेल म्हटले गेले. छत्रसालचा पिता चंपतराय हा स्वाभिमानी असून मोगलांच्या विरोधात त्याने उघड संघर्ष केला. औरंगजेबाने त्याच्या भाऊबंदांना हाताशी धरून त्याचे राज्य घेतल्याने हताश होऊन चंपतरायने आपल्या पत्नीसह आत्महत्या केली.
या वेळी छत्रसालचे वय केवळ १२-१४ वर्षांचे होते. तेव्हा मामा साहेबसिंह धंधरे आणि भाऊ अंगदराय यांच्या नेतृत्वाखाली छत्रसालने सैनिक शिक्षण पूर्ण केले. पुढे देवासच्या पवार घराण्यातील देवकुंवारीशी विवाह होऊन त्यांना जगतराय आणि हरेदशाह ही दोन मुले झाली.
मोगलांशी बदला घेण्याची इच्छा असूनही स्वत:ची ताकत कमी असल्याने छत्रसालने मिर्झाराजे जयसिंहाच्या सैन्यात चाकरी धरली. आपल्या पराक्रमाने छत्रसालने औरंगजेबाला अनेक प्रांत मिळवून दिले. मिर्झाराजा हा औरंगजेबाचा मांडलिक असल्याने १६६५ ला बादशहाने त्याला छत्रपती शिवरायांच्या विरोधात पाठविले. त्यात छत्रसालही होता. या वेळी राजांना मोगलांपुढे शरणागती पत्करावी लागली होती. त्याचाच एक भाग म्हणजे राजांना आग्र्याला जावे लागले होते. मोगलांच्या कडक पहा-यातून महाराजांनी मोठ्या शिताफीने स्वत:ची सुटका करून घेतली होती. उत्तरेतील अनेक राजांनी मोगलांना स्वत:च्या मुली देऊन त्यांची चाकरी पत्करली होती. तेव्हा शिवाजी महाराज मात्र स्वत:च्या हिमतीवर औरंगजेबाशी दोन हात करत होते. या सर्व घटनांमुळे छत्रसाल फारच प्रभावित झाला होता. शिवरायांच्या पराक्रमामुळे छत्रसालच्या मनात नवीन विचार घोळायला सुरुवात झाली.
पुढे बादशहाने दिलेरखानाला शिवरायांच्या विरोधात पाठविले तेव्हा त्याही फौजेत छत्रसाल दक्षिणेत आला. महाराष्ट्राच्या मातीत आल्यानंतर आता मात्र छत्रसालच्या मनाने झेप घेतली. पावसाळ्याचे दिवस असल्याने नद्या-नाले पार करत छत्रसालने बायका-मुलांसह तीन महिन्यांचा प्रवास करत छत्रपती शिवरायांची छावणी गाठली. राजांचा मुक्काम या वेळी कृष्णा नदीच्या काठावर होता. छत्रसाल जेव्हा राजांच्या भेटीला आला तेव्हा गोरेलाल तिवारी हा छत्रसालच्या सोबत होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रसाल यांच्या भेटीतील प्रसंग ‘छत्रप्रकाश’ नावाच्या ग्रंथात गोरेलालने फारच सुंदर रचले आहेत.
राजांनी त्याला भेटीचे कारण विचारले तेव्हा छत्रसाल म्हणाला, महाराज! मला औरंगजेबाच्या चाकरीची शिसारी आली आहे. त्यामुळे मला आपण आपल्या चाकरीत सामावून घ्यावे. त्या वेळी राजांनी छत्रसालला धीर देत दिलेले उत्तर मोठे समर्पक आहे. राजे म्हणाले, मला तुमच्यासारखा छावा लाभला तर आनंदच आहे. तुम्ही पराक्रमी आहात. तुमचे पराक्रम हे आमच्या नावावर मोडतील तेव्हा एक ध्यानात घ्या, मी इथे जे केले ते तुम्ही तुमच्या प्रांतात जाऊन करा. छत्रसाल स्वत:चे राज्य निर्माण करा. याविषयी गोरेलालने केलेले वर्णन पुढीलप्रमाणे आहे.
सिवा किसा सुनि कैक ही, तुमी छत्री सिरताज।
जीत अपनी भूम कौ, करो देश कौ राज।
शिवरायांनी एक महिनाभर छत्रसालला आपल्याजवळ ठेवून घेतले. स्वत:ची समशेर देऊन त्याला पुढील कामगिरीसाठी आशीर्वाद दिले. राजांचा सहवास लाभल्याने छत्रसालच्या मनात एक ऊर्मी निर्माण झाली होती. मोगलांच्या विरोधात बंड करण्याच्या उद्देशाने त्याने आपला परिसर गाठला. तेथील भाऊबंद, छोटे-मोठे राजे यांना त्याने मोगलांविरोधात लढा उभा करण्याची विनंती केली. परंतु सर्वांनी त्याच्याकडे पाठ फिरविली तेव्हा छत्रसालचा लहानपणीचा एक मित्र महाबली तेलीने पुढे येऊन छत्रसालच्या खांद्याला खांदा लावण्याची शपथ घेतली. आपल्याजवळच्या तुटपुंज्या पैशावर त्याने ५ घोडेस्वार आणि २३ पायदळ सैनिकांसह १६७१ साली मोगल बादशहाच्या विरोधात बंड पुकारले. ग्वाल्हेर, टोंस यांसारख्या राजावर आक्रमण करून छत्रसालने मोठी संपत्ती हस्तगत करत शिवरायांचा धडा गिरवत ती आपल्या सैनिकांत वाटून टाकली. साहजिकच त्यामुळे सैनिकांचे मनोबल वाढल्याने दिवसेंदिवस छत्रसालला विजय मिळत गेले. त्यामुळे बुंदेलखंडात एक म्हण पडली होती.
छता तेरे राज में, धक-धक धरती होय।
जित-जित घोडा मुख करे, तित तित फत्ते होय।
औरंगजेब व त्याच्यानंतर त्याच्या मुलांनी आपले
अनेक सरदार छत्रसालवर पाठविले. परंतु छत्रसालने सर्वांचाच पराभव करत १६७४ साली स्वतंत्र बुंंदेल राज्याची स्थापना केली. पन्ना ही त्याची राजधानी ठेवण्यात आली. सह्याद्रीच्या डोंगराप्रमाणे बुंदेलखंडाचा प्रदेश हा गनिमी काव्यास पोषक असल्याने छत्रसालने त्याचा फायदा घेत आपला साम्राज्यविस्तार केला. परंतु हे सर्व करत असताना त्याच्यापुढे शिवरायांचा आशीर्वाद आणि आदर्श होता. एका बाजूला छत्रसालचा वाढत जाणारा उत्साह आणि दुस-या बाजूला क्षीण होत जाणारी मोगल सत्ता यामुळे त्याचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढत जाऊन त्याचा सालाना महसूल हा एक करोडवर जाऊन पोहोचला होता तर छत्रसालनंतर बुंदेलखंडाच्या तिजोरीत जवळपास १४ करोड रुपयांची संपत्ती शिल्लक होती. यावरून छत्रसालच्या साम्राज्य विस्ताराचा अंदाज येऊ शकतो. छत्रसालच्या पराक्रमावर ‘छत्रप्रकाश’ या ग्रंथातील पंक्ती पुढीलप्रमाणे आहेत-
इत यमुना, उत नर्मदा, इन चंबल, उत टोंस।
छत्रसाल सो लरण की, रही न काहु हौस।।
छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेऊन उत्तर भारतात राजा छत्रसालने स्वत:चे स्वतंत्र साम्राज्य उभे केले. ही इतिहासातील एक मार्गदर्शक घटना असून पुढे छत्रसालने शिवरायांची परत भेट घेतली किंवा नाही हे निश्चित-
पणे सांगता येत नसले तरी त्याने महाराजांना अनेक पत्रं पाठविल्याचे संदर्भ मात्र सापडतात. या दोघांना सांधणारा आणखी एक महत्त्वाचा सांधा म्हणजे कवि भूषण होत. शिवरायांना कधीही न पाहणारा भूषण होय. शिवरायांना कधीही न पाहणारा भूषण त्यांच्यावर भरपूर लिखाण करतो त्याचे कारण कदाचित राजा छत्रसाल असावे, कारण भूषणही बरेच दिवस छत्रसालच्या दरबारात वास्तव्यास होता.
छत्रपती शिवरायांनंतरही छत्रसालने मराठ्यांशी चांगले संबंध ठेवले होते. इ.स. १७२९ साली जेव्हा मोगलांचा सेनापती महंमद बंगश याने बुंदेलखंडावर आक्रमण केले तेव्हा छत्रसालचे वय ८० वर्षाचे असल्याने त्याच्या पराक्रमाला मर्यादा पडल्याने पुन्हा एकदा बुंदेलखंडावर मोगलांचे आक्रमण सोसण्याची वेळ येऊन ठेपली. परंतु त्या क्षणी छत्रसालला छत्रपती शिवरायांच्या पाठबळाची आठवण झाली. त्यानुसार छत्रसालने पहिले बाजीराव पेशवे यांना पत्र लिहून मदतीची याचना केली. यावेळी छत्रसालने बाजीरावांना लिहिलेले पत्र अत्यंत वाचनीय असून त्यातील ओळी बोलक्या आहेत.
जो गति ग्राह गजेंद्र की, सो गति भई है आज।
बाजी जात बुंदेल की, राखो बाजी लाज।
त्यानुसार बाजीरावांनी वेगाने हालचाली करत छत्रसालचे साम्राज्य वाचविले. छत्रसालने बाजीरावांच्या उपकाराची परतफेड म्हणून त्यांना आपला तिसरा पुत्र मानून आपल्या साम्राज्यातील तिसरा हिस्सा आणि ३३ लाख रुपये रोख दिले. यासोबतच त्याने बाजीरावांना मस्तानीच्या रूपाने एक अनोखी भेट दिली. छत्रसालने मराठ्यांच्या तीन पिढ्या पाहिल्या. वयाच्या ८२ व्या वर्षी जवळपास ५२ लढाया जिंकून त्याने १३ मे १७३१ रोजी जगाचा निरोप घेतला. शिवरायांनी छत्रसालला दिलेला एक मंत्र म्हणजे ‘मोगलांची ताकद जर हत्तीप्रमाणे असेल तर तुम्ही त्यांच्यावर सिंहाप्रमाणे तुटून पडा’ याचा त्याने पुरेपूर वापर करत एक नवा आदर्श निर्माण केला. विश्वासाचा हात पाठीवर पडल्यानंतर त्याची किंमत काय होते... हेच यातून प्रतित होते.
डॉ. सतीश कदम
SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment