प्लासीचे युद्ध आणि पुण्याचा त्रिशुंड गणपती !

आज आषाढ शुद्ध षष्ठी,
२६१ वर्षापुर्वी आजच प्रसिद्ध प्लासीचे युद्ध झाले आणि इंग्रजी सत्तेचा पाया भारतात मजबूत झाला.
पुण्यातील सोमवार पेठेत असलेल्या त्रिशुंड गणपती मंदिर आणि बंगालमध्ये खेळलेली प्लासी (पलाशी) ची लढाई यात संबंध कसा, यासाठी हा लेखप्रपंच.
पुण्यात गोसावी लोकांची वस्ती नागेश्वर मंदिराजवळ होती. त्याला गोसावीपुरा म्हणत. हा व्यापारी व सावकारी करणारा समाज होता. त्यांच्या प्रथेप्रमाणे मृत व्यक्तीची समाधी किंवा शिवमंदिर बांधली जातात जी आजही सोमवार पेठेत बघायला मिळतात. असच एक शिवमंदिर (सद्या गणेश मंदिर) 'भीमगिरजी' या संपन्न गोसावी ने बांधले, त्यांची समाधी तळघरात आहे. या मंदिराची उभारणी १७५४ ला सुरु होउन १७७० ला पुर्ण झाली. संपुर्ण मंदिर एकसंघ दगडातुन तयार केलाय. गाभार्यात मयुरावर तीन सोंड असलेली सुंदर गणेश मुर्ती विराजमान आहे तर गाभार्यावरती संस्कृत-मराठी-फार्सी भाषेतील शिलालेख आहेत. एखाद्या लेण्याप्रमाणे वाटणारे हे मंदिर तसं उपेक्षीतच आहे. मंदिराचा सर्वात आकर्षक भाग म्हणजे प्रवेशदाराच्या भोवतीच सुरेख कोरीव काम आणि त्याचा पलाशीच्या युद्धाशी असणारा संबंध.
फक्त व्यापारासाठी भारतात आलेले इंग्रज राजकारणात डोकं खुपसायला लागले तेव्हा संस्थानांचा ताप वाढला. भाउबंदकी आणि मंत्र्याची कारस्थान याचा फायदा गोर्यांनी बर्याच वेळा घेतला. त्याची नांदी पलाशी च्या युद्धाने झाली. ईस्ट इंडिया कंपनीने 'Lord Clive' च्या नेतृत्वाखाली बंगालच्या नवाब 'सिरज-उद-दौला' चा पराभव करण्यासाठी पाठवल. 'Lord Clive' ने नवाबाचा सेनापती 'मिर जाफर' याला पैसे देउन आपल्याबाजुने वळवले, नवाब बनवण्याचे आश्वासनही दिले. याचा होयचा तो परिणाम झाला. मिर जाफरने सैन्यासह युद्धभुमीवर Clive ची बाजु घेतली आणि सिरज-उद-दौला चा पराभव झाला. इंग्रजांच्या राज्याची अधिकृतपणे सुरुवात झाली. (म्हणुन शंभर वर्ष सहन केल्यावर शताब्दी वर्षी क्रांतिकारकांनी बंड पुकारला '१८५७')
सगळी कट-कारस्थान बरीच आधी पासुन चालु होती. सिरज-उद-दौला चा बाप अल्वरदी खान याने इंग्रजांशी कडक व्यवहार ठेवला होता. मराठ्यांनी १७४७ ला रघोजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली बंगालवर यशस्वी हल्ला चढवला आणि तिथला प्रदेश जिंकला. सेनापती 'मिर जाफर' याने त्यातुन माघार घेतल्याचं ऐकल्यावर त्याला हाकलुन दिल, ज्याने पुढे घात केला. फ्रेंच आणि इंग्रजांशी नवाब अल्वरदी निकारेने लढला पण अखेर ८० व्या वर्षी त्याच निधन झाल आणि सगळी सुत्र नातू 'सिरज-उद-दौला' कडे आली, जी वर्षभरच टिकली. या सगळ्या बातम्या भारतभर पोहोचतच होत्या. मग त्या पेशव्यांपासुन थोडीच लपतील. व्यापारी गोसावींना याची माहिती होती. आसाम-बंगाल प्रांतातील भिषण स्थिती लक्षात घेउन त्यांनी ती चित्तरण्याचा प्रयत्न त्रिशुंड मंदिर बांधताना केला.
मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ अनेक शिल्प आहेत, त्यात द्वारपाल, यक्ष, माकडे, पोपट, गजलक्ष्मी, घंटा व सर्वात वर शेषशायी विष्णु कोरले आहेत. पण लक्ष वेधुन घेत ते इथलं देवकोष्ठके आणि त्याखाली असलेले २ शिल्पसमुहाच्या पट्टी. यात वरच्या शिल्पपट्टीत आसाम-बंगालचे सांकेतिक रूप तिथल्या प्रसिद्ध गेंड्याच्या शिल्पाद्वारे दाखवले आहे. शेजारी ३ इंग्लिश शिपाई त्यांच्या आगळ्या वेशभूषेत हातात बंदूक घेऊन त्या गेंड्याला पकडण्यात यशस्वी झाले आहेत. खालच्या पट्टीत झुंजणारे किंवा एकमेकांना भिडलेले २ हत्ती कोरलेले आहेत. हे हत्ती महाराष्ट्रातील सत्तांचे प्रतिक ठरतात.
ईस्ट इंडिया कंपनी ही व्यापारी कंपनी आता राजकीय सत्ता होण्याच्या मार्गावर आहे आणि या गोष्टीकडे लक्ष दिले गेले नाही व मराठी सत्ताधीश आपापसात भांडत बसले तर आपल्या नशीबीही गुलामगिरी येइल असा इशारा देणारी ही शिल्पांकन आहेत. असे भविष्यवाणी व्यक्त करणारे चित्रण क्वचितच एखाद्या मंदिरावर केलेल दिसत.
ह्या ऐतिहासिक कलाकृतीला बघायला वाट वाकडी करून नक्कीच जायला हवं !
लेखनसीमा
- साकेत देव (भाटे)
आषाढ शुद्ध षष्ठी, शके १९४०
शिवराज्याभिषेक शके ३४५
(बुधवार, १८ जुलै २०१८)
फोटो - त्रिशूंड्या गणपती मंदिर व त्यावरील शिल्पांकन, सोमवार पेठ
संदर्भ -
(१) मुठेकाठचे पुणे - प्रा. प्र. के. घाणेकर
(२) हरवलेले पुणे - डाॅ. अविनाश सोवनी
(३) पुणे शहरातील मंदिरे - डाॅ. शां. ग. महाजन
(४) The Temples of Maharashtra - Gopal Krishna Kanhere
Image may contain: 4 people, people smiling
SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment