विकृती, प्रकृती आणि संस्कृती

विकृती, प्रकृती आणि संस्कृती ह्या तीनही संकल्पना तशा एकाच मुल तत्वावर आधारीत आहेत. व ते मुल तत्व म्हणजे निसर्गनियम होय. वेगवेगळ्या संदर्भात ह्या संकल्पनांची उकल करता येईल. दोन तीन वर्षापुर्वी आमच्या घरच्या झाडाचे आंबे उतरवायचे काम सुरु होते. मी झाडावर चढलो होतो व टिपुन एकेक आंबा काढत होतो. झाडाच्या एका फांदीला आता शंभरेक आंबे शिल्लक होते. इतक्यात आई म्हणाली आता बास झाले. राहीलेले आंबे झाडाला तसेच राहुदे. मी का असे न विचारताच झाडावरुन खाली उतरलो. व आंबे पिकवण्याची आढी लावुन झाल्यावर आईला विचारले झाडाला आंबे ठेवायला का सांगितलेस तु मला? त्यावर आई म्हणाली की आपण सगळेच्या सगळे आंबे काढायचे नसतात. झाडावर येणा-या पक्षांना प्रसंगी प्राण्यांना खाण्यासाठी हे आंबे असेच ठेवायची पध्दत पुर्वापार असेल खेड्यापाड्यात. यात संस्कृती पाहायला मिळते. सर्वच्या सर्व आंबे काढणे व ते खाणे किंवा विकणे ही विकृती आहे. व जेवढी भुक आहे तेवढेच आंबे काढुन खाणे ही प्रकृती आहे. पण या एका प्रसंगात संस्कृतीची खुण दिसते. ही संस्कृती देखील सह्याद्रीचे अंगभुत वैशिष्ट्य आहे. एखादा समाज किती सुसंस्स्कृत आहे हे पाहण्यासाठी त्या समाजात कोणत्या चालीरीती आहेत, कोणत्या कला कौशल्यांना त्या समाजात स्थान आहे , समाजात  कोणते छंद जोपासले जातात , त्या त्या समाजात संगीत, लेखण वाचन आदी विषयी कितपत ज्ञान आहे , या सर्वांवर त्या त्या समाजाचा सुसंस्कृतपणा किती उच्च दर्जाचा आहे हे समजते. भुमीस माता म्हणणारा आपला हा मावळातला समाज सांस्कृतिक दृष्ट्या अभ्यासाचा एक स्वतंत्र विषय आहे. आपल्या विविध चालीरीतींच्या मागे एक विज्ञान आहे. मी दहावी मध्ये असताना माझे इंग्रजीचे शिक्षक श्री गुलाबराव सपकाळ सरांनी मला एक अप्रतिम पुस्तक वाचण्यासाठी दिले. प्रा. सौ कांचनगंगा गंधे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे नाव ही भारी्च आहे. “आपले वृक्ष आपली संस्कृती”.
वटपोर्णिमा is a highly logical and ecological festival celebrated across India
वटपोर्णिमा is a highly logical and ecological festival celebrated across India
यात आपल्या विविध सणवारांमध्ये चालीरीती प्रथांमध्ये वापरल्या जाणा-या विविध वृक्ष वेलींचे सांस्कृतिक तसेच वैज्ञानिक महत्व त्यांनी सण व वृक्ष वार सविस्तर लिहिले आहे. म्हणजे आपल्या संस्कृतीला वैज्ञानिक आधार आहे व तो अगदी दुरदुर्गम अशा डोंगरद-यात राहणा-या आमच्या सह्याद्रीवासीयांना माहीत देखील होता. कोणत्याही संस्कृतीचे आणखी एक महत्वाचे अंग असते. ते म्हणजे सहजीवन. आधुनिक पाश्चात्य लेखक स्टीफन कॉव्हे याने त्याच्या एका सुपसिध्द पुस्तकात Interdependence is higher value than Independence असे तत्व मांडुन त्या तत्वास कॉर्पोरेट जीवनात यशाची गुरुकिल्ली असे म्हंटले. जाती पाती आणि उच्चनीच असा ओंगळवाणा वाटणारा प्रकार म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन वर म्हंटलेल्या परस्परालंबित्वाचे एक विकृत रुप आहे. जात हा शब्दास कारकुनी महत्व येण्याआधी आपल्याकडे बलुतेदार नावाची व्यवस्था कित्येक हजारोवर्षे वृध्दींगत होत गेली. त्याचे एक उदाहरण मला अगदी दोन तीन वर्षापुर्वी मोसे मावळ खो-यात फिरताना दिसले. बलुतेदारी संपली. पण काही ठिकाणी ती अजुन आहे. मी एकदा, पानशेत वरसगाव हुन मोटारीतुन मुठा खो-याकडे येत होतो. तसा हा भाग ही दुर्गमच. अजुन ही तासनतास ह्या रस्त्यावर एखाददुस-या वाहनापेक्षा जास्त काही दिसत नाही. तर या प्रवासात, कोंढुर गावाजवळ, एक व्यक्तिने माझ्या गाडीला हात केला व लिफ्ट मागीतली. उंचीने साडेचार ते पाच फुट उंच थोडासा जाड, गव्हाळ, पांढरा पायजमा, सदरा आणि टोपी घातलेला हा माणुस या गावातीलच असणार असे मला वाटले व माझा तर्क बरोबर निघाला. गाडीत बसल्यावर त्यांच्याशी गप्पा झाल्या. त्यात त्यांच्या मुलांचे इंजिनियरींग वगेरे शिक्षणाविषयी समजले. ते कुटुंब सध्या पुणे शहरात राहते. मी त्यांना विचारले की इतक्या उशीरा कसे काय निघालात पुण्याकडे तर ते म्हणाले की ते ज्ञाती ने न्हावी आहेत व गावात जोंधळे घ्यायला आले होते. दर शनिवारी व रविवारी ते गावी येतात व गावातील लोकांची दाढी डोकी (हजामत) करतात. त्यांच्याकडे स्वतची शेती नाही. पण ह्या बलुतेदारीतुन त्यांना त्या वर्षी २८ अठ्ठावीस पोती भात, तेवढीच ज्वारी मिळाले. व त्यांच्या जन्मापासुन त्यांना व त्यापुर्वी त्यांच्या वाड वडीलांना देखील ही बलुतेदारी होती. पुर्वी त्यातीलच काही विकुण मसाले,तेल, कपडे आदी विकत घेत. म्हणजे गावातील गावकी मध्ये प्रत्येक घटकास सामावुन घेण्याची क्षमता होती व त्या प्रत्येक घटकाच्या पालनपोषणाची जबाबदारी समाज घेत होता. असेच पुर्वी इतर बलुतेदारांचे ही असायचे. व संस्कृतीच्या ह्या खाणा खुणा सह्याद्रीच्या कानाकोप-यात आज ही पहावयास मिळतील.
SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment