Skip to main content

शिवचरित्रमाला भाग १०

क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते.
मोहम्मद आदिलशाहची
प्रकृती चांगली
नव्हती। शाह अर्धांगवायूसारख्या विकारानं
लुळापांगळा झाला होता. त्याची तबियत
ढासळत होती. त्याचवेळी
गोलघुमट या प्रचंड इमारतीचं बांधकाम
उंचउंच चढत होतं. लवकरच ते पूर्ण होणार होतं.
आपल्याला हे माहिती आहे ना ?
की गोलघुमट ही इमारत
म्हणजे याच मोहम्मद आदिलशाहची
कबर. मोहम्मद आदिलशाह तक्तनशीन
बादशाह झाला त्याचवेळी त्यानं
स्वत:साठी स्वत:च हे कबरस्तान
बांधावयास सुरुवात केली. निष्णात
वास्तुकारागिरांनी ही इमारत
बांधली. उच्चारलेल्या वा उमटलेल्या
ध्वनीचे अनेक प्रतिध्वनी या
घुमटात घुमत होते. पण आजारी
बादशाहच्या मनात एकच ध्वनी आणि
असंख्य प्रतिध्वनी उमटत होते
मऱ्हाठ्यांच्या बंडाचे. बादशाह बेचैन होता.
एक गोष्ट त्यानं केली त्याने चार वर्षांच्या
स्थानबद्धतेनंतर शहाजीराजांची
मुक्तता केली. शहाजीराजे
दक्षिण कर्नाटकात आपल्या जहागिरीवर
रवानाही झाले. म्हणजेच
शिवाजीराजांच्यावरचं असलेलं दडपण आणि
चिंता एकदम भिरकावली गेली.
स्वैर संचार करावयास हे ‘ शिवाजीराजे ‘
नावाचे वादळ मुक्त झाले अन् सुसाट सुटले. गेल्या चार
वर्षांत राजांनी आदिलशाही
विरुद्ध बोटही उचलले नव्हते. ते एकदम
पाच हजार स्वारांचं लष्कर घेऊन स्वराज्यातून
म्हणजेच राजगडावरून थेट कर्नाटकाच्या दिशेनं सुटले.
कर्नाटकाच्या उत्तर भागात मासूर या नावाचं एक जबर
लष्करी ठाणं होतं. शिवाप्पा नाईक देसाई हा
शाही ठाणेदार मासूरच्या किल्ल्यात होता.
शिवाजीराजांचा भयंकर वादळी
हल्ला या मासूरवर अचानक धडकला। त्या शिवाप्पा
नाईकाला स्वप्नातही कल्पना नसेल
की , ही मराठी
चित्त्यांची झडप आपल्यावर येईल। कारण
मासूरपायून शिरवळपर्यंत सर्व मुलुख
आदिलशाहीचा होता। या एवढ्या मोठ्या
प्रदेशात सर्वच ठाणी
आदिलशाहीची. सातारा , कराड ,
मिरज , कागल , चिकोडी , तेरदळ
इत्यादी सर्व ठाण्यांना टाळून
शिवाजीराजांनी थेट मासूर गाठलं
होतं. शिवाप्पाची अक्षरश: दाणादाण
उडाली. त्याची फौज
उधळली गेली. तो पळून गेला
आणि महाराज हा तडाखा देऊन तेवढ्याच झपाट्यानं
पुण्याकडे पसार झाले. मासूर त्यांनी आपल्या
ताब्यात ठेवलं नाही ? लुटलं
नाही ? मधल्या कोणच्याही
ठाण्यावर हल्ला किंवा कब्जा केला नाही ?
नाही!नाही! का ? राजांना
आदिलशाहीस हे दाखवून द्यायचं होतं
की , हा शिवाजीराजा भोसला
विसरभोळा नाही , गाफिल नाही ,
बावळट नाही। वडिलांच्या स्थानबद्धतेच्या
काळात माझं बळ आणि माझी
तरबेजी किती आहे हे
मी तुम्हाला दाखवून देतो आहे. माझ्या
वडिलांचा झालेला अपमान मी विसरलेलो
नाही. मासूरवरच्या हल्ल्याने
आदिलशाही दरबार थक्क झाला. आता
दरबारला चिंता होती पुढे काय काय होणार
याची.
महिने उलटत गेले। महाराजांचे हेर
मोगलाईतूनही खबरा आणीत
होते. दिल्लीचा शाह शहाजहान आग्ऱ्याच्या
किल्ल्यात आजारपण भोगीत होता. त्याचा
थोरला शाहजादा दारा दिल्लीत होता. दुसरा
पुत्र मुराद हा गुजराथेत सुभेदार होता. तिसरा पुत्र
औरंगजेब हा दक्षिणेत बिदरला होता. आणि चौथा
बंगालच्या बाजूस होता. त्याचं नाव सुजा.
शाहजानला इतर कोणच्याही वैऱ्यांपेक्षा
आपल्याच मुलांची
भीती वाटत होती.
त्यातला थोरला पुत्र दारा हा सुसंस्कृत होता.
बाकीचे सगळे क्रूर
श्वापदाहूनही क्रूर प्राणी
होते. सगळे टपले होते दिल्लीच्या
तख्तावर. बहुतांशी सर्व राजपूत सरदार
औरंगजेबाला अनुकूल होण्याची शक्यता
होती. शाहजहान
मरण्याचीही कुणी
वाट पाहणार नव्हता. बंडासाठी जो तो तोफा
बंदुका ठासून तयार होता. खरं म्हणजे
परिस्थिती अशी
होती की , दारूगोळ्याचं कोठारच
उडवावं तसं बंड करून राजपुतांना दिल्लीच
ताब्यात घेता आली असती.
क्रांती! पण या राजपुतांना
क्रांतीपेक्षा बादशाहाशी
असलेली आपली
नाती जास्त मोलाची वाटत
असावीत. राजपुतांच्या मनात
क्रांतीचे म्हणजेच स्वातंत्र्याचे विचार
येतच नव्हते. त्यांच्या अंत:करणात
क्रांतीचे विचार प्रेरित करणारी
एकही जिजाबाई राजस्थानात जन्माला
आलेली नव्हती. इतर कुठून
ही क्रांती यावी ?
क्रांतीची आयात आणि निर्यात
कधी करता येत नाही.
ती उगवावी लागते स्वत:च्याच
मेंदूत मग ती उतरते हृदयात , मग
ती शिरते मनगटात , अन् मग
ती प्रकट होते तलवारीच्या
पात्यातून. शिवाजीराजांना ही
उत्तरेची ओळख पुरेपूर
झालेली होती.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
Image may contain: night

Comments

Popular posts from this blog

शिवरायांच्या इतिहासातील कुप्रसिद्ध रांझ्याच्या पाटलाचं गाव.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केलीकी महाराजांसोबत औरंगजेब, शाहिस्तेखान आणि अफजलखान व अनेक स्वराज्याचे शत्रू पक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात ,त्यात अजून एक नाव म्हणजे 'रांझे गावचा पाटील'. रांझे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत बदअमल केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्या वर खटला चालवून चौरंग केला. (चौरंग करणे म्हणजे हात पाय कलम करणे). या संदर्भाचे २८ जानेवारी १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले. महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मनाला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे, व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड-शिवापूर गावा पासून अवघ्या ३ की.मी. वर असलेले सह्याद्रीच्या कुशीतील छोटंसं रांझे गाव. रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते. मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते.मंदिरात...

५. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ब्राह्मणांचे स्थान !

‘काही वर्षांपूर्वी जेम्स लेन नावाच्या पाश्‍चात्त्य लेखकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राविषयी एक आक्षेपार्ह पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे कलह निर्माण झाला आणि ब्राह्मण समाजाला टीकेचे लक्ष्य करण्यात आले. अलीकडेच पुण्यात जात्यंध मराठा संघटनांनी ब्राह्मणद्वेषाचा कळस गाठून लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मध्यरात्री हटवण्याचे दुष्कृत्य केले. ‘छत्रपतींच्या जीवनात ब्राह्मणांचे कोणते स्थान होते’, हे जर ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पाहिले, तर ‘छत्रपतींच्या नावाचा वापर करून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद वाढवणे’, ही ‘महाराजांची क्रूर थट्टा आहे’, ही गोष्ट लक्षात येईल ! या सूत्राच्या पुष्ठ्यर्थ ‘अखिल भारतीय मराठा विकास परिषदे’ने प्रकाशित केलेल्या ‘समाज जागृती पुस्तिके’तील निवडक लिखाण पुढे दिले आहे. कधी नव्हे एवढी आज हिंदुऐक्याची आवश्यकता निर्माण झाली असतांना हिंदु जातीजातींत विभागणे उचित ठरणार नाही, यासाठी लेख प्रसिद्ध करत आहोत. १. छत्रपतींच्या गुणांचे त्यांच्या हयातीत वर्णन करणारे पहिले तीन कवी ब्राह्मणच ! अ. ‘छत्रपती शिवाजी महाराज हयात असतांना त्यांच्या गुणांचे मुक्त...

मिर्झा राजा जयसिंह आणि पुरंदरचा तह

औरंगजेबाने मुरब्बी व विश्वासू सेनापती मिर्झा राजा जयसिंह याची दक्षिणेत नेमणूक केली. शिवाजी महाराज त्यावेळी बिदनूर राज्यातील बसरुरच्या स्वारीवर गेले होते. त्यांनी हे समृध्द बंदर लुटले (फेब्रुवारी १६६५). परतताना गोकर्ण महाबळेश्वर, कारवार येथून ते दक्षिण कोकणात आले असताना जयसिंह हा मोठ्या सैन्यानिशी पुण्यात पोहोचला आहे (३ मार्च १६६५ रोजी), अशी बातमी त्यांना लागली. जयसिंहाने महाराजांची पूर्णपणे नाकेबंदी करण्याचे धोरण आखले. मोहिमेची सूत्रे संपूर्णपणे आपल्या हाती ठेवली. यात कुणाकडूनही हस्तक्षेप होऊ नये, अशी त्याने औरंगजेबाला अट घातली. शिवाय किल्ले आणि किल्लेदार यांजवर आपले नियंत्रण राहावे आणि माणसे फोडण्यासाठी व मोहिमेसाठी लागणारा पैसा सुभ्याच्या खजिन्यातून काढण्याची परवानगी असावी, या अटी जयसिंहाने बादशहाकडून मान्य करून घेतल्या. जयसिंहाच्या मोहिमेविषयीचा फार्सी पत्रव्यवहार उपलब्ध आहे. त्यातून तत्कालीन घटनांचे तपशीलवार उल्लेख आढळतात. महाराजांचा मैदानी प्रदेश मोगलांच्या ताब्यात होता. मोगलांनी कल्याण-भिवंडीपासून पुरंदरपर्यंत सीमेवर चौक्या आणि ठाणी बसविली होती. जयसिंहाने ठिकठिकाणी प्रबळ लष्कर...