सिद्दी मसूद दौडत पाठलागावर निघाला. २००० घोडदळ व मागोमाग १००० पायदळ
निघाले. पुन्हा तिच वाट. तोच चिखल. तेच शेवाळे. अंधार आणि आडथळे.उजाडले !
आषाढ वद्य प्रतिपदा उगवली.आणी आली ! सिद्दी मसूदच्या घोडेस्वारांची आरोळी
आली. मावळ्यांची, बाजींची आणि महाराजांची उलघाल उडाली. मोठ्या मेटाकुटीने
त्यांनी गजापूरची घोडखिंड गाठली. विशाळगड ४ कोस दूर होता.वख्त बाका होता.
बाजींनी महाराजांना हट्टाने विशाळगडला जायला लावले. आणी निम्म्या
सैन्यानिशी घोडखिंडीच्या तोंडावर शत्रूला
अडवायला बाजी उभे राहिले. महाराज गडावर पोहोचून इशारती होईपर्यंत बाजी खिंड
झुंजवणार होते ! सिद्दी आलाच. भयंकर रणकंदन सुरू झाले.खळाळणार्या
आषाढधारात मावळ्यांचे रक्त मिसळत होते. लौकरात लौकर गडावर जाऊन इशारतीच्या
तोफा उडविण्यासाठी महाराज धांवत होते. महाराजांनी विशाळगडचा पायथा गाठला
आणि घात झाला. सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव दळवी महाराजांवर चालून निघाले.
हे आमचेच लोक, पण बादशाही चाकरीत स्वराज्याशी वैर करणारे पापग्रह. सुर्वे व
दळवी यांनी महाराजांची वाट आडवली. झुंज सुरू झाली. घोडखिंड लगीनमंडपासारखी
गाजत होती. बाजी वाट बघत होते मुहुर्ताच्या तोफेची.दिवस सरला. खिंडीत
अद्यापही झुंज चालू होती. गेले २१ तास सारेजण अविश्रांत श्रमत होते. आधी
धावताना व नंतर लढताना. संध्याकाळ झाली. अंधार वाढत चालला. आणी कोंडी फोडून
शिवाजी महाराज विशाळगडावर पोचले. भराभरा तोफांची सरबत्ती सुरू झाली. अन्
आनंदाचा कल्लोळ बाजींच्या मनी उठला. कामगिरी फत्ते झाली होती. तेवढ्यात
खाडकन् घाव बाजींच्या छातीवर बसला ! बाजी कोसळले ! छाती फुटली ! तरिही बाजी
आनंदातच होते. "स्वामी कार्यी खर्च जाहलो. आतां सुखे जातो." हाच तो आनंद
होता. गजापूरची खिंड पावन झाली होती. (दि. १३ जुलै १६६०, सायंकाळी सुमारे
७.३० वाजता)
संदर्भ:- "सह्याद्रीचे अग्निकुंड"
लेखक:-सूरज बबन थोरात
संदर्भ:- "सह्याद्रीचे अग्निकुंड"
लेखक:-सूरज बबन थोरात
0 comments:
Post a Comment