रझिया सुलतान (१२३६- १२४०)
दिल्लीचा सुलतान शमसुद्दीन इल्टमश याच्या मृत्यूनंतर त्याचा वडील मुलगा रुकनुद्दीन फिरोजशहा १२३६ मध्ये गादीवर आला.तो अत्यंत दुरवर्तनी, विलासी होता.त्याच्या ऐवजी त्याची दृष्ट आई राज्यकारभार करत होती.त्यामुळे वैतागलेल्या दरबारातील लोकांनी त्या मायलेकांना कैदेत टाकून लष्करी अधिकाऱ्यांच्या मदतीने इलत्मशची मुलगी रझिया हिच्या हाती राज्यकारभार दिला.पुढे त्या मायलेकांचा कैदेत असतानाच मृत्यू झाला.
दिल्लीच्या तख्तावर बसलेली रझिया एकमेव स्त्री सुलतान होती.राझियाचा जन्म १२०५ साली झाला.तिच्याकडे राज्यकारभार कौशल्य,हुशारी,नेतृत्व, आणि मुसद्दीपणा हे गुण होते.ती मर्दानी पोशाख करून हत्तीवर स्वार होऊन प्रत्यक्ष युद्धात सैन्याचे नेतृत्व करी.तिला कारभार हाती घेतल्यावर अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. बदाऊन,सुलतान,हान्सी आणि लाहोरच्या सुभेदारांनी, तसेच वजीर निजाम-उल-मुल्कने राझियाला राजपदावरून हटविण्याचे प्रयत्न सुरु केले.तिने यावर लगेच कार्यवाही सुरु करून पण लष्करातील कमकुवतपणा लक्षात घेऊन युद्धप्रसंग टाळला.तिने मलिक सलारी व कबीरखान यांच्याशी गुप्तपणे संधान बांधले.त्यांना राझियाने वझीर आणि मलिक कोची यांना तुरुंगात टाकण्याचे आश्वासन दिले. हि बातमी वझीर व कोची यांना कळल्यामुळे तसेच त्यांना मदतीला कुणी नसल्यामुळे ते दोघे राजधानी सोडून निघून गेले. अशा प्रकारे डावपेच खेळल्यामुळे राझियाचे दरबारातील वजन वाढले.तिने तिच्या बाजूच्या लोकांना म्हणजे नैब वझीर,ख्वाजा मुह्जजबुद्दीन सैफुद्दीन ऐबक,कबीरखान,लाखनौतीचा सुभेदार तुघरील तुघन खान ह्या मंडळींना वरिष्ठ पदांवर नेमले.दरबारातील तुर्की अमिरांचे वाढते वर्चस्व कमी करण्यासाठी तिने त्यांच्या जागांवर बिगर तुर्की लोकांना नेमायला सुरुवात केली. त्यातील जमालुद्दीन याकुत हा एक अबिसिनियन अधिकारीही होता.तिच्या अशा धोरणामुळे तुर्कि अमीर व मलिक तिला वचकून राहू लागले.
राझियाने आपल्या वडिलांप्रमाणे स्वतंत्र कारभार करण्यास सुरुवात केली. तिने अनियंत्रित सत्ता स्थापन केली. राजाला आवश्यक असे सर्व गुण तिच्या ठिकाणी होते.ती बुद्धिमान,धीट,व्यवहारचतुर होती.तिच्या अंगी पुरुषी गुण होते.वडील इलत्मश जेव्हा राजधानी सोडून दूर जात तेव्हा तेव्हा तिने राज्यकारभार पाहिला होता.हा अनुभव पुढे तिच्या कामी आला.पूर्वीच्या अनिष्ट प्रथा तिने बंद केल्या.कायद्यात सुधारणा केल्या. उमरावांना तिने संतुष्ट ठेवले होते. तिची कर्तृत्वशक्ती,न्यायचातुर्य व कार्यक्षमताअफाट होती.दरबारात ती मर्दानी पोशाख करून बसत असे आणि प्रत्येक काम स्वतः पाहून त्याचा निकाल लावी.राझियाने 'राझियासुद्दीन' म्हणजे 'धर्मभक्त' असा किताब धारण केला होता.तिच्या शेवटी झालेल्या युद्धात तिचा भाऊ शहजादा बहराम तिच्याविरुद्ध लढला होता.
दिल्लीतील मुस्लिम सरदारांना एका स्त्रीने आपल्यावर राज्य करावे ही कल्पना सहन होत नव्हती.त्यामुळे ते सतत तिच्याविरुद्ध कारस्थाने व बंड करत राहिले.एका हबशी गुलामावर तिचे प्रेम होते.त्याला दरबारी लोकांचा विरोध होऊन त्यांनी बंड केले.त्यात तो गुलाम मारला गेला. मग लोकांनी तिला आलटुनिया नावाच्या सरदाराच्या बंदोबस्तात ठेवले.शेवटी १२४० साली झालेल्या एका बंडात सरदारांनी १३ ऑक्टोबर १२४० रोजी राझियाला व तिच्या नवऱ्याला ठार मारले.राझियाने अवघ्या साडेतीन वर्षात आपले साम्राज्य निर्माण केले.मुसलमानी अमदानीत अवघ्या तीन स्त्रियांनी राजपद सांभाळले.त्यातील 'सुलताना रझिया' हि पहिली सुलतान होती.दुसरी राजारुद्दर हि सन १२५० मध्ये इजिप्तची राणी होती तर तिसरी आबिश हि तेराव्या शतकात इराणमध्ये राज्य करत होती.
संदर्भ:- मुसलमानी रियासत,खंड -१,- गो.स.सरदेसाई
मध्ययुगीन भारत(1202 ते 1857),पुस्तक पहिले-सल्तनत ते विजयनगर (1202 ते 1526),
लेखक-प्रा.डॉ.सौ.सरल धारणकर - प्रणव कुलकर्णी
लेखक-प्रा.डॉ.सौ.सरल धारणकर - प्रणव कुलकर्णी
0 comments:
Post a Comment